मराठा आंदोलन : पुणे-सोलापूर महामार्गावर ४ एसटी बस फोडल्या

    दिनांक  30-Jul-2018

मराठा समाजाकडून आज सोलापूर बंदची हाक 

सोलापूर : सोलापूर जिल्हा मराठा क्रांती मोर्चाकडून आज सोलापूर बंदची हाक देण्यात आली असून या बंदला काही ठिकाणी हिंसक वळण प्राप्त झाले आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर काल मध्यरात्री मराठा आंदोलकांकडून चार एसटी बसची तोडफोड करण्यात आली असून आज जिल्ह्यातील नागरिकांकडून देखील या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

पंढरपूरच्या वारीसाठी राज्यभरातून आलेल्या भाविकांना त्रास होऊ नये, म्हणून सोलापूर जिल्हा मराठा क्रांती मोर्चाने मराठा आंदोलनातून आणि बंदमधून काही काळ दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. गुरुपौर्णिमेला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा अंतिम दर्शन सोहळा पार पडल्यानंतर सर्व पालख्या आणि वारकारी आता आपापल्या मूळ मुक्कामी परतले आहे. त्यामुळे क्रांती मोर्चाकाडून आज सोलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी देखील याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत जिल्ह्यात कडकडीत बंद पाळला आहे.दरम्यान काल मध्यरात्री पुणे-सोलापूर महामार्गावर आंदोलकांकडून काही ठिकाणी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यातूनच चार एसटी बसची देखील तोडफोड करण्यात आली होती.