ठोक मोर्चानंतर आता असहकार आंदोलन

    दिनांक  30-Jul-2018

९ ऑगस्टपर्यंत आरक्षण देण्याची मराठा समाजाची मागणी
लातूर : येत्या ९ ऑगस्टपर्यंत मराठा आरक्षण लागू न केल्यास राज्यभर सरकारविरोधात असहकार आंदोलन सुरु करण्यात येईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आला आहे. लातूर येथे क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय समन्वयक बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला असून सरकारने आरक्षणासंबंधी तत्काळ निर्णय घ्यावा, असे देखील क्रांती मोर्चाकडून सांगण्यात आले आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार नारायण राणे यांनी काल मुंबई येथे मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. परंतु या भेटीविषयी मात्र सरकारकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. चर्चेत सहभागी झालेल्या संयोजकांची नावे देखील सरकारने गुप्त ठेवल्यामुळे याविषयी राज्यात एक नवीन चर्चा सुरु झाली होती.

  
दरम्यान यानंतर लातूर येथे झालेल्या बैठकीमध्ये चर्चेला गेलेल्या संयोजकांशी क्रांती मोर्चाचा कसलाही संबंध नाही, अशी भूमिका या बैठकीत घेण्यात आली. तसेच सरकारने आरक्षणासंबंधी आता कसल्याही प्रकारची चर्चा न करता थेट निर्णय घ्यावा व ९ ऑगस्टपर्यंत आरक्षण लागू करावे, अन्यथा राज्यभर असहकार आंदोलन सुरु करण्यात येईल, असे देखील क्रांती मोर्चाने म्हटले आहे.