औरंगाबादेत आणखी एका मराठा तरुणाची आत्महत्या

    दिनांक  30-Jul-2018
 
 
 
 
 
औरंगाबाद : मराठा समाजाला आरक्षण मिळावी, यामागणी औरंगाबादमध्ये आज आणखी एका मराठा तरुणाने आत्महत्या केली आहे. प्रमोद जयसिंगराव पाटील (होरे) असे या ३१ वर्षीय तरुणाचे नाव असून औरंगाबादेतील मुकुंदवाडी येथे या तरुणाने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली आहे. यामुळे आसपासच्या परिसरात एकच खळबळ उडाली असून मराठा आंदोलन देखील यामुळे आणखी आक्रमक होऊ लागले आहे.
 
आज सकाळी प्रमोदने आपल्या फेसबुक अकाऊंटवरून आपण आत्महत्या करत असल्याची पोस्ट शेअर केली होती. मराठा आरक्षणासाठी आणखी एक मराठा तरुण जात आहे, परंतु यामुळे संपूर्ण समाजाचे भले होईल, असे म्हणत त्यांनी रेल्वे खाली आपला जीव दिला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सर्व परिसरात एकाच खळबळ उडाली होती. यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत, मृतदेह ताब्यात घेतला. तसेच परिसरात कसल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली. दरम्यान प्रमोदच्या कुटुंबीयांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला असून या हत्येसाठी राज्य सरकारला जबाबदार धरले आहे.
 
कोण आहे प्रमोद पाटील ? 
 
प्रमोद हा मुळचा लातूरमधील आंबूलगा गावचा रहिवाशी आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून तो मुकुंदवाडीतील ज्ञानेश्वर कॉलनी येथे राहत होते. प्रमोदने कृषी शाखेची पदविका पूर्ण केली असून गेल्यापासून वर्षांपासून तो स्पर्धा परिक्षांची तयारी करत होता. तसेच गेल्या काही दिवसांपासुन तो मराठा आंदोलनामध्ये सक्रीय सहभागी झाला होता. 
 
दरम्यान या घटनेमुळे आसपासच्या परिसरात कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. या अगोदर गंगापूर येथे देखील काकासाहेब शिंदे नावाच्या एका मराठा युवकाने आरक्षणासाठी म्हणून गोदापात्रेत उडी टाकून आपला जीव दिला होता. यामुळे मराठा समाजाने ठोक मोर्चा काढत सर्व राज्यामध्ये चक्काजाम केला होता. आता प्रमोद पाटील याने उचललेल्या या पाऊलामुळे मराठा समाज काय करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.