शॉर्ट अॅण्ड क्रिस्प : वीड्स शॉर्ट फिल्म

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jul-2018   
Total Views |
 
 
 
कधी कधी काही लघुपटांमध्ये पात्र नसतात, तसं पाहिल्या गेलं तर एखादी कथाही नसते, संवादही नसतात, तरी तो लघुपट एक खूप सुंदर अनुभूती देणारा लघुपट ठरतो. आजचा हा लघुपट असाच एक लघुपट आहे. यामध्ये मानवी पात्र नाहीत, संवाद नाही, पटकथा नाही, मात्र एक सुंदर अनुभूती आणि एक वेगळा विचार नक्कीच आहे.
 
आजचा हा लघुपट आहे एका सूर्यमुखी फुलाच्या छोटुकच्या जीवनाबद्दल. रस्त्याच्या काठी एक छोटीशी हिरवळ असलेली जागा असते. फुटपाथवरच. मात्र एका बाजूला स्प्रिंकलर्समुळे खूप पाणी असतं, तर दुसऱ्या बाजूला रुक्ष. या रुक्ष भागात अनेक सूर्यमुखी फुलं लागलेली असतात. त्यातीलच एक फुल जगण्यासाठी झटपट करत असतं. आपल्या डोळ्यांसमोर इतर फुलांना मलूल होत पडलेलं त्यानं बघितलं असतं आणि दुसऱ्या बाजूला त्याला पाणी असणारी हिरवळ पण दिसत असते. आता झटपट सुरु होते एक नवीन आयुष्य मिळवण्याच, असलेलं आयुष्य सुंदर करण्याची, आणखी चांगलं करण्याची.
 
स्वत:ला गोळा करुन ते फुल निघतं. आपल्या गंतव्याच्या दिशेनं. पोहोचतं देखील अगदी काही पावलंच बाकी राहिलेली असतात, इतक्यात ते मलूल होतं, आणि पडतं. मात्र पडत असताना आपले कण इतरत्र सगळीकडे पसरवत ते कोसळंत. रात्र होते, काळोख पसरतो. आणि काही वेळानं उडेज पडतो.. आणि असं काही होतं, ज्यामुळे आपल्या सगळ्यांच्याच चेहऱ्यावर एक सुंदर हसू उमलतं, अगदी नवीन उमललेल्या सूर्यमुखीच्या फुलाप्रमाणेच.
 
 
 
 
गम्मत म्हणजे हा लघुपट केवळ २ मिनिटे ४८ सेकंदांचा आहे, मात्र त्यातून मिळालेला संदेश नकळत आपल्याला अशा लोकांची आठवण करून देतो, ज्यांच्या स्वत:च्या बलिदानामुळे आपल्याला नवीन आयुष्य मिळालेलं आहे, किंवा ज्यांनी आपलं सर्वस्व पणाला लावून आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी एक सुखी, सुंदर आणि सोपं आयुष्य निर्माण केलं आहे. हे फुल एक प्रतीक मात्र आहे. ही कथा तुमची आमची किंवा आपण सगळ्यांचीच आहे. सीजी मीटअप या यूट्यूब चॅनलतर्फे प्रदर्शित हा एक अॅनिमेटेड लघुपट आहे. या लघुपटाला ३ लाख ८० हजारांहून अधिक व्ह्यूज आहेत. केविन ह्यूडसन यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला हा लघुपट एकदा तरी अवश्य बघावा असा आहे.
 
- निहारिका पोळ  
@@AUTHORINFO_V1@@