शहरात साथीच्या रोगांची लागण

    29-Jul-2018
Total Views |



ठाणे : शहरात सर्व प्रकारच्या साथीच्या आजारांनी डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. मलेरिया, डेंग्यू, अतिसार, जुलाब, विषमज्वर, लेप्टोस्पायरोसिस, कावीळ यांसारख्या आजारांनी ग्रासलेल्या तब्बल ८१४ रुग्णांची गेल्या दोन महिन्यांत नोंद झाली आहे तर, अतिसाराची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या साडेचारशेवर पोहोचली आहे.

 

शहरातील बदलते वातावरण यामुळे विविध आजारांचे रुग्ण आढळत आहेत तर, गेल्या दोन महिन्यांत अतिसाराचे ४५३ रुग्ण, मलेरियाचे १०९ रुग्ण, जुलाबाचे ७० रुग्ण, विषमज्वराचे १५ रुग्ण, कावीळचे ४ रुग्ण, लेप्टोस्पायरोसिसचे २ रुग्ण आढळून आले आहेत. शहरात डेंग्यूचे १६१ संशयित रुग्ण आढळून आले असून त्यापैकी १७ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, या आजारांमुळे एकही रुग्ण दगावलेला नसल्याचे आकडेवारीतून दिसून येते.

 

पावसाळ्याच्या काळात साथीच्या आजारांचा फैलाव होऊ नये म्हणून शहरात विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळेच साथीचे आजार आटोक्यात असून त्याचबरोबर एकही रुग्ण दगावलेला नाही.  तसेच डास प्रतिबंधक उपाययोजना मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आली आहे, असा दावा महापालिकेकडून करण्यात येत आहे.