अलिबागमध्ये गोमांसविक्री

27 Jul 2018 21:06:13



 

रायगड पोलिसांकडून तिघांना अटक

 

अलिबाग : गायींची कत्तल आणि गोमांसविक्रीचा विषय सध्या देशभरात चर्चेत असतानाच कोकणात अलिबाग शहरात गुरांची कत्तल करून गोमांस विकले गेल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. तसेच, रायगड पोलिसांकडून मांडवी मोहल्ला परिसरात छापा मारून तब्बल ७५ किलो गोमांस जप्ती आणि तिघांना अटकही करण्यात आली आहे.
 

अलिबागमध्ये गोमांसविक्री होत असल्याची माहिती रायगड पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी शुक्रवारी पहाटे सापळा रचून मांडवी मोहल्ला परिसरात घर क्र. १०१ आणि १०२ इथे छापा मारला. यावेळी अब्दुल सलाम शहागीर सैय्यद, शराफत नजीर फकी, इद्रीस फरीदान चौधरी अशा मांडवी मोहल्लामधीलच तिघा स्थानिक रहिवाशांना पोलिसांनी अटक केली. यावेळी प्लास्टिकच्या कापडात गुरांचे लहानमोठे तुकडे केलेले मांस, गुरांची खुरे आणि दोन मुंडकी यांच्यासह तब्बल ७५ किलो गोमांसही पोलिसांनी जप्त केले. सैय्यद, फकी आणि चौधरी हे तिघेही शहरात गोमांसविक्री करत होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख जे. ए. शेख यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी अलिबाग पोलीस स्थानकात भारतीय दंड विधान कलम ४२९ , सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमाचे कलम ५ (क), ९ आणि भारतीय प्राणी संरक्षण अधिनियमच्या कलम १० अन्वये पकडण्यात आलेल्या तिघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Powered By Sangraha 9.0