स्टार्टअप आणि घनकचरा व्यवस्थापनाचा जादूगार

    दिनांक  26-Jul-2018    

२००२ पासून श्रीकांत परब यांनी स्टार्टअप्समध्ये उडी घेतली. एका ओळखीच्या डॉक्टरांसोबत बोलताना त्यांना कळले की, ‘१६ डीपीए’ नावाची कच्ची सामुग्री संप्रेरकासाठी आवश्यक असते. पण, ही सामुग्री चीन आपल्या देशात निर्यात करते. याच विषयावर संशोधन करून ‘१६ डीपीए’ परब यांनी भारतात बनवायला सुरुवात केली. त्यासाठी काही इस्रायली गुंतवणूकदारसुद्धा मिळाले. एका ठराविक कालावधीनंतर तो प्रकल्प त्यांनी विकला.

 

सधारण सन २००० साल असेल. इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये जोरदार संघर्ष चालू होता. ‘परिंदा भी पर मार नही सकता,’ अशी काहीशी अवस्था असताना एक मराठी तरुण इस्रायलच्या सीमारेषेवर गाडीने उतरतो. त्याचं सामान खाली उतरवलं जातं. दुपारचं रणरणतं ऊन मी म्हणत असतं. हा तरुण बॅगा घेऊन इस्रायलच्या त्या सीमारेषेजवळ पोहोचतो. सीमारेषा पार करून ‘नो मॅन्स लॅण्ड’ झोनमध्ये येतो. मध्यावर आल्यानंतर पाहतो, तर मागे इस्रायलची सीमारेषा ओलांडलेली असते तर समोर पॅलेस्टाईनची सीमारेषा स्वागतासाठी सिद्ध असते. हा तरुण त्या ‘नो मॅन्स लॅण्ड’ मधून पुढे जातो. पॅलेन्स्टाईनची सीमारेषा ओलांडून पॅलेस्टाईनमध्ये पोहोचतो आणि तिथल्या वाहनात बसून आपल्या प्रोजेक्टच्या ठिकाणी जातो. इस्रायल आणि पॅलेस्टाईनचं हाडवैर हे अख्ख्या जगाला माहीत आहे. इस्रायलमधून पॅलेस्टाईनला येणं हे किती धोकादायक आहे याची कल्पना केलेलीच बरी. त्याने तो धोका पत्करला स्वत:च्या व्यवसायासाठी. स्वत:च्या उद्योगासाठी. धोक्यात जीव घालून आपल्या व्यवसायावर प्रेम करणारे हे उद्योजक म्हणजे श्रीकांत परब. श्रीकांतचे बाबा मधुकर परब, मूळचे वेंगुर्ल्याचे. मुंबईत आल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेत नोकरीस लागले. सांताक्रुझला आरबीआयच्या वसाहतीत राहू लागले. तिथेच श्रीकांतचा जन्म झाला. श्रीकांतची आई तशी गृहिणी. मात्र पापड, लोणची, लाडू असे घरगुती पदार्थ तयार करून विकायचा. त्यातून काही पैसे घरासाठी कमावता येतील, अशी त्यांची भावना. उद्योजकतेचं बाळकडू श्रीकांतला अशाप्रकारे आईकडून मिळालं तर बाबांकडून झोकून देऊन काम करणे आणि प्रामाणिकपणा हे दोन गुण मिळाले. या गुणांमुळेच श्रीकांत परब यांनी आयुष्यात खूप मोठी प्रगती साधली. मिठीबाई महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी मिळवली. त्याकाळी संगणकयुगाची भारतात नुकतीच सुरुवात झालेली. काळाची पावले ओळखून श्रीकांतने कॉम्प्युटर डिप्लोमा केला. १९९१ साली दुबईच्या एमिरेट्स एअरलाईन्समध्ये श्रीकांतला नोकरी लागली. पगार होता तीन हजार दिर्‍हॅम म्हणजेच भारतीय चलनात सांगायचं झाल्यास जवळपास २४ हजार रुपये. त्यावेळी सोन्याचा भाव साडेतीन हजार रुपये तोळा होता, यावरून पगाराची किंमत लक्षात आलीच असेल. दरम्यान आखाती युद्ध सुरू झालं होतं. संपूर्ण अरबजगत युद्धाच्या छायेत वावरत होते. त्यावेळी अरब देश सोडून सगळे कर्मचारी आपापल्या देशांत परतले होते. श्रीकांतचे मित्रदेखील भारतात निघून आले. एमिरेट्स एअरलाईन्सला त्यावेळी इन्शुरन्स कलेक्शनसाठी स्वयंसेवकांची गरज होती. श्रीकांतने आपलं नाव दिलं. एअरलाईन्समधलं काम आटोपून उरलेल्या वेळेत तो कलेक्शन करू लागला. २४ तासांपैकी फक्त चार तासच तो झोपायचा. १९९५ साली मित्राच्या साहाय्याने त्याने चहाचा व्यवसाय सुरू केला.

 

१९९८ साली भारतात परतल्यानंतर ओरॅकल कंपनीचा २० दिवसांचा त्यांनी एक अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यासाठी 1 लाख १५ हजार रुपये मोजले. ‘आयसीएफएआय’सारख्या संस्थेत लेक्चर्स देऊ लागले. इस्रायलमध्ये त्यांना प्रशिक्षण देण्याची संधी मिळाली. ‘रफायल’ नावाची एक मिसाईल बनविणारी कंपनी इस्रायलमध्ये आहे. त्या कंपनीत ओरॅकलचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. तो प्रॉब्लेम निव्वळ तीन तासांत परब यांनी सोडविला. त्या कंपनीचा श्रीकांतवर एवढा विश्वास बसला की, कदाचित ते पहिले भारतीय होते ज्यांनी त्या कंपनीमध्ये मिसाईल्स कसे बनतात ते ‘याचि देही याचि डोळा’ पाहिले.  २००२ पासून श्रीकांत परब यांनी स्टार्टअप्समध्ये उडी घेतली. एका ओळखीच्या डॉक्टरांसोबत बोलताना त्यांना कळले की, ‘१६ डीपीए’ नावाची कच्ची सामुग्री संप्रेरकासाठी आवश्यक असते. पण, ही सामुग्री चीन आपल्या देशात निर्यात करते. याच विषयावर संशोधन करून ‘१६ डीपीए’ परब यांनी भारतात बनवायला सुरुवात केली. त्यासाठी काही इस्रायली गुंतवणूकदारसुद्धा मिळाले. एका ठराविक कालावधीनंतर तो प्रकल्प त्यांनी विकला. यानंतर २००४ मध्ये सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात फूड प्रोसेसिंग कंपनी सुरू केली. साक्षात गगनगिरी महाराजांच्या सूचनेनुसार त्यांनी हा कारखाना सुरू केला होता. काजूप्रक्रिया या कारखान्यात व्हायची. ‘नटकिंग’ नावाचा काजूचा ब्रॅण्ड त्यांनी निर्माण केला होता. हा हा म्हणता या कंपनीचे मूल्य ५० कोटी रुपयांपर्यंत पोहोचले.  त्यानंतर २००७ मध्ये ते टेलिकॉम क्षेत्रात उतरले. नोकिया, सिमेन्स या मोबाईल कंपन्यांच्या २५०० कर्मचार्‍यांसाठी त्यांनी नेक्स्ट जनरेशन नेटवर्कचे प्रशिक्षण दिले होते. तिथे ते ’ट्रेन दी ट्रेनर’ हा प्रशिक्षणाचा कार्यक्रम घ्यायचे. २००८ मध्ये अमेरिकेतील एका बीपीओ कंपनीसाठी त्यांनी सेटअप उभारला. १५ कर्मचार्‍यांची क्षमता त्यांनी ७०० कर्मचार्‍यांपर्यंत विस्तारली. आपल्या मुंबईवर जो २६ नोव्हेंबरचा अतिरेकी हल्ला झाला, त्यावेळेस त्याची उकल करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने श्रीकांत परब यांची मदत घेतली होती. इस्रायलसोबत काम केल्याने त्या कामाचा त्यावेळेस फायदा झाला होता. २०१० मध्ये ते घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रात उतरले. ‘डिजीएचआय’ या कंपनीसोबत ते काम करू लागले. या कंपनीचे ते आशिया संचालक आहेत. डॉ. फिलीप थॉमस हे या संस्थेचे प्रमुख आहेत. हिलरी क्लिटंन अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा असताना ते त्यांचे सल्लागार होते.

 

सध्या श्रीकांत परब हे महाराष्ट्रामध्ये घनकचरा व्यवस्थापनाचा एक प्रकल्प उभारत आहेत. डम्पिंग ग्राऊंड हे एक सोन्याची खाण मानली जाते. डम्पिंग ग्राऊंडवर प्रक्रिया करण्यासाठी चीनमध्ये ११०० केंद्रे आहेत, पण भारतात अशी सुविधाच नाही. देवनारमध्ये २ कोटी मेट्रिक टन, कांजूरमार्ग येथे ३० लाख मेट्रिक टन एवढा कचरा आहे. डम्पिंग ग्राऊंडवरील कचर्‍यावर प्रक्रिया करून त्याच्यातून प्रचंड पैसा कमाविता येतो, हे अजून आपल्या भारतीयांच्या लक्षात आलेच नाही. कचरा प्रक्रिया करून कचर्‍याच्या झालेल्या वाळूचा बांधकामासाठी वापर करता येतो, इतकं तंत्रज्ञान पुढारलेलं आहे. श्रीकांत परब यांची डेल्टाक्लीन ग्रीन एन्व्हायर्नमेंट सोल्युशन्स प्रा. लि. कंपनी हा प्रकल्प सरकारच्या सहकार्याने राबविणार आहे. तब्बल दोन हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून डॉ. फिलीप थॉमस यांची डिजीएचआय थेट परकीय गुंतवणूक करणार आहे. थ्रील म्हणजे थरार. तो फक्त आपण चित्रपटांमध्ये पाहिला आहे. मात्र, श्रीकांत परब यांनी तो आपल्या आयुष्यात जगला आहे. भविष्यामध्ये घनकचरा व्यवस्थापनात श्रीकांत परब हे नाव अग्रणी असेल यात शंका नाही, पण कोणताही स्टार्टअप कसा सुरू करावा व तो नफ्यात कसा चालवावा, याचं मार्गदर्शन मराठी तरुणांना करण्यास ते सदैव तत्पर आहेत. अशा या थरारक व्यक्तिमत्वाला एकदा भेटणं हा एक वेगळाच अनुभव असतो.