चेहरा शोधतो मी... चेहरा शोधतो रे

    दिनांक  26-Jul-2018   
“मैं पंतप्रधान बनना चाहता हूँ,”ची जिथे-तिथे टेप वाजवणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्याच्या महत्त्वाकांक्षेलाच कदाचित तिलांजली दिल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कारण, काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीनंतर ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांच्या गोटातून मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी संपुआच्या मित्रपक्षांमधील एखादा ज्येष्ठ, अनुभवी चेहराही पंतप्रधानपदी स्वीकारण्याची मनोमन तयारी केल्याचे ऐकिवात आहे. पण, राहुलबाबांची एकच अट. त्या व्यक्तीचा संघाशी तिळमात्रही संबंध नसावा अथवा संघाचे त्याला समर्थन नसावे. म्हणजे, एकीकडे संघाने हिंदुत्व शिकविले, असे संसदेत जोरजोराने आव आणत कोकलायचे आणि दुसरीकडे मात्र संघाची सावलीही न पडलेला उमेदवार राहुल गांधींना हवा. ते म्हणतात ना, राजकारणात दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे. म्हणजे तसा राहुल गांधींचा संघद्वेष काही नवीन नाहीच, पण भाजप या काँग्रेसच्या थेट राजकीय प्रतिस्पर्धीपेक्षा संघावरच तोंडसुख घेण्यात गांधी परिवाराप्रमाणे यांचीही अख्खी हयात जाईल, पण हाती काहीच लागणार नाही. २०१४ ची लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी रंगली असली तरी काँग्रेसने अधिकृतपणे राहुल गांधी हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याचे तेव्हाही जाहीर केले नव्हेतच. कारण, स्पष्ट आहे. हरलो तर राहुलमुळे अशी नामुष्की नको आणि कार्यकर्त्यांची नाराजीही नको, जिंकलो तर पुढचे पुढे बघू, असा विचार काँग्रेसने करणे अधिक पसंत केले. पण, अपेक्षेप्रमाणे जनतेने मोदींना स्वीकारले आणि राहुलला नाकारले. पराभव पदरी पडूनही राहुल त्यातून काही शिकल्याचे दिसत तर नाहीच. पण, कदाचित संसदेतील मोदीमिठीच्या मूर्खपणानंतर आपला चेहरा पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणूनही जनतेत स्वीकार्ह होणार नाही, याची खात्री त्यांच्या अंतर्मनाला पटलेली दिसते. म्हणूनच, काँग्रेस पक्ष आता पंतप्रधानपदी वेळ आलीच तर इतर पक्षांतील नेत्यालाही बसवायला सरसावला आहे. कारण, याच पद्धतीने सोनिया गांधींनीही संपुआचे सरकार चालवून दाखविले होतेच की... काँग्रेसचे असले तरी मनमोहन सिंगांच्या सरकारला ‘रिमोट कंट्रोलचे सरकार’ म्हणून अवहेलनाही सहन करावी लागली. राहुलही आता आपल्याच मातोश्रींच्या पावलांवर पाऊल टाकून राजकीय डावपेचांचे बाळकडू घेताना दिसतात. त्यामुळे शोधून ठेवा एखादा चेहरा... तो लोकांसमोरही आणा. पण, तरीही उपयोग शेवटी शून्यच!

 

माया-ममतांचीही मनधरणी?

 

राजकीय चर्चांवर कितपत विश्वास ठेवायचा हाच मोठा प्रश्न असला तरी निवडणुकीच्या वातावरणात याच चर्चा सर्वाधिक भाव खाऊन जातात. लोकसभा निवडणुकीला एक वर्षापेक्षा कमी कालावधी उरला असला तरी आतापासूनच सर्वच राजकीय पक्षांनी आपापली मोर्चेबांधणी करायला सुरुवात केलेली दिसते. प्रत्येकाला आस आहे सर्वाधिक जागा जिंकायची आणि पंतप्रधानपदी विराजमान होण्याची. पण, ममता-मायावती-मुलायम किंवा नितीशकुमारही असो, त्यांच्या एकट्याच्या बळावर पंतप्रधानपदी विराजमान होणे तर दूरच, त्यांच्या राजकीय पक्षाच्या दखलपात्र जागा निवडून आणण्याचेही आव्हान त्यांना सध्या झेपेनासे झाले आहे. मायावतींचा हत्तीसारखा मोठा पक्ष, पण आज त्याचे लोकसभेत साधे अस्तित्वही नाही. आक्रस्ताळेपणा करत तावातावाने बोंबलणाऱ्या ममतादीदींनाही बंगालचा गड राखता राखता यंदा घाम फुटणार आहे. त्यामुळे पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा असलेल्या या प्रादेशिक नेत्यांना कोणत्या ना कोणत्या राष्ट्रीय पक्षाशी आघाडी केल्याशिवाय पर्याय नाहीच. भाजपच्या बाबतीत ते शक्य नसल्यामुळे काँग्रेसवरही अप्रत्यक्षपणे असाच राजकीय दबाव निर्माण करण्याचे प्रयत्न मग तिसऱ्या आघाडीसारख्या चर्चांतून होताना दिसतात. त्यातच राहुल गांधींची दिवसेंदिवस अधिकाधिक खालावत जाणारी प्रतिमा, पंतप्रधानपदी इतर स्वच्छ आणि अनुभवी चेहऱ्याचा अभाव यांचे आव्हान काँग्रेसलाही तितकेच भेडसावणारे. म्हणूनच, ‘पंतप्रधानपदाची जागा भरणे आहे’ अशी ‘पाहिजे आहे’ची चाचपणी काँग्रेसने सुरू केलेली दिसते. त्यातच विशेष म्हणजे, महिला उमेदवारांना पंतप्रधानपदासाठी प्राधान्य असल्याचा मुद्दाही याच राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. महिला पंतप्रधानपदाच्या उमेदवार म्हणूनच मग काँग्रेससमोर पर्याय आहे तो ममता आणि मायावतींचा. पण, त्या दोघीही मुरब्बी राजकारणी असल्याने काँग्रेसशी कितपत मिळतेजुळते घेतील, जागावाटपाचा मानापमानाचा विषय कसा सोडवतील, हा मोठा पेचप्रसंग निर्माण होऊ शकतो. असो. ही सगळी पुढची चर्चा. पण, एका राष्ट्रीय पक्षाला त्यांच्या परिवारातील नेत्याशिवाय पंतप्रधानपदाचा चेहराही मिळू नये, हीच या घराणेशाहीच्या तालावर नाचणाऱ्या जवळपास १३० वर्षांची परंपरा असलेल्या काँग्रेसची शोकांतिका म्हणावी लागेल.