मराठा आरक्षणामुळे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांचा राजीनामा

    दिनांक  25-Jul-2018
 
 
 
 
औरंगाबाद : मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी मागणीचा मुद्दा आता खूपच चिघळला आहे. गेले दोन दिवस यासाठी मुंबई बंद, आणि अनेक हिंसक घडामोडी घडल्या आहेत. मात्र यासांबंधी ठोस निर्णय न झाल्यामुळे शिवसेनेचे कन्नड येथील आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी आज राजीनामा विधानसभा अध्यक्षांना ई मेल केला असून उद्या ते थेट राजीनामा देणार आहेत.
 
 
 
 
मराठा आरक्षणाबाबत सरकारने तातडीने अध्यादेश काढून मराठा समाजाला आरक्षण द्यावे. असे न झाल्यास आपण आमदारकीचा राजीनामा देऊ, असा इशारा त्यांनी दिला होता. 'मी सरकारला आज सायंकाळी ४ वाजेपर्यंतची मुदत देतो. तोपर्यंत अध्यादेश निघाला नाही, तर मी आमदारकीचा राजीनामा देईन,' असेही ते म्हणाले होते.
 
आज विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना ई-मेलद्वारे राजीनामा पाठवला आहे. उद्या गुरुवारी विधानभवनामध्ये जाऊन राजीनाम्याची प्रत सादर करणार आहे. एक तर आरक्षण द्या, नाहीतर राजीनामा स्वीकारा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
 

 
 
 
अध्यादेश काढून मराठा समाजाला तात्काळ आरक्षण लागू करावे, काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत द्यावी, त्यांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी द्यावी, धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी, मेवाती समाजाला आरक्षण द्यावे, या प्रमुख मागण्यांसाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. विधानसभेचे अध्यक्ष त्यांचा राजीनामा स्वीकारणार की, नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोणत्याही परिस्थितीत आपण राजीनामा मागे घेणार नाही. मराठा आरक्षण मिळेपर्यंत सभागृहात पाय ठेवणार नसल्याचे जाधव यांनी यापूर्वीच सांगितले आहे.