शिंदेच्या कुटुंबियांना सरकारकडून १० लाखांची मदत

    दिनांक  24-Jul-2018

 


औरंगाबाद : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे या तरुणाच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची मदत राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने याविषयी घोषणा केली असून पिडीत कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देखील देण्यात येईल, असे आश्वासन औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिले आहे.

'काकासाहेब शिंदे या तरुणाबरोबर झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून त्यांचा कुटुंबियांना सर्व प्रकारची मदत करण्यास सरकार आणि प्रशासन तयार आहे. त्यामुळे सरकारकडून शिंदे कुटुंबियांना रुपये १० लाखांची मदत करण्यात येणार आहे' असे चौधरी यांनी आज सांगितले. तसेच कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी म्हणून कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देखील देण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे त्यांनी जाहीर केले.

याचबरोबर मराठा क्रांती मोर्चाच्या बहुतांश मागण्या या राज्य सरकारने मान्य केल्या असून मराठा समाज आरक्षणासंबंधीचा अहवाल देखील लवकरच केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे मराठा समाजाला शांत राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.