बीडमध्ये मुख्यमंत्र्यांविरोधात फिर्याद

24 Jul 2018 09:40:23



परळी (बीड) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील पोलीस ठाण्यामध्ये मराठा समाजातील एका युवकाकडून फिर्याद दाखल करण्यात आली आहे. औरंगाबाद येथे काकासाहेब शिंदे या तरुणाच्या मृत्यूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचे सांगत संबंधित तरुणाने मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच यासंबंधी लेखिल फिर्याद देखील पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या २२ जुलैला मराठा आरक्षण, विठ्ठल पूजा आणि शासनाने सुरु केलेली मेगा भरती याविषयी जाणूनबुजून केलेल्या वक्तव्यामुळे मराठा समाजातील तरुणांना मोठा धक्का बसल्याचे संबंधित तरुणाने आपल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे. तसेच याच धक्क्यातून काकासाहेब शिंदे या तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रथम इशारा दिला आणि त्यानंतर नदीमध्ये उडी मारून जलसमाधी घेतली. त्यामुळे हा मृत्यूला सर्वस्वी मुख्यमंत्री फडणवीस हे जबाबदार असून मुख्यमंत्र्यांवर ताबडतोब गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी देखील फिर्यादीमध्ये करण्यात आली आहे.


औरंगाबादमधील गंगापूर येथे काकासाहेब शिंदे या तरुणाने मराठा आरक्षणावरून काल गोदावरी नदीमध्ये उडी मारली होती. यामध्ये संबंधित तरुणाचा काल मृत्यू झाला होता. यामुळे आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा आक्रमक झाला असून मराठा समाजाकडून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच आरक्षण देण्यासंबंधी मुख्यमंत्री आणि राज्य सरकारच अनुकूल नसल्याचा आरोप देखील मराठा समाजाकडून करण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0