करमुक्त पाळी : सरकारची महिलांना अमूल्य भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jul-2018   
Total Views |
 
 
 
 
 
 
गेल्या वर्षी म्हणजेत २०१७ च्या मे महिन्यात ट्विटरवर #Lahukalagan 'लहू का लगान' हा हॅशटॅग खूप प्रसिद्ध झाला होता. जीएसटीच्या नवीन नियमांमध्ये सॅनिटरी नॅपकिन्सना करमुक्त करण्याचे प्रावधान नव्हते आणि म्हणूनच संतप्त महिलांने ट्विटरच्या माध्यमातून आपला राग व्यक्त केला होता. कालपासून ट्विटरवर या संबंधात पुन्हा एकदा एक हॅशटॅग व्हायरल होत आहे, आणि तो म्हणजे #Thankyoumodi कारण काल झालेल्या जीएसटी समितीच्या बैठकीत सॅनिटरी नॅपकिन्सवर लागणारा १२% कर काढण्यात आला असून आता महिलांसाठी 'पाळी' करमुक्त असणार आहे. आणि महिलांनी जसा आपला राग व्यक्त केला होता, त्याच्या दुप्पट प्रमाणात त्यांनी ट्विटरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
 
 
 
 

 
 
 
सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे आता आपल्या भावना व्यक्त करणे आणि ते योग्य त्या माणसापर्यंत पोहोचविणे  खूपच सोपे झाले आहे. मासिक पाळी सारख्या गंभीर आणि महत्वाच्या तरी अजूनही समाजात 'हाश हाश' असणाऱ्या मुद्यावर महिलांनी एकत्रितपणे ट्विटर सारख्या समाज माध्यमावर येऊन बोलणे म्हमजेच एक समाज सुधारणेचे काम आहे. काल महिलांनी ट्विटरवर व्यक्त केलेल्या आनंदामुळे पुन्हा एकदा जनतेची बाजू सगळ्यांसमोर आली आहे. "जनतेच्या हिताविरुद्ध काम केल्यास ती कान उघडणी करते तर या जनतेसाठी चांगले काम केले की ती पाठीवर शाबासकीची थापही देते, हेच खरे राजकारण." असे जे म्हटले आहे, ते अगदी खरे आहे. मोदी सरकारने पॅड्स वरील कर काढल्यामुळे महिलांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
 
 
 
 
" सॅनिटरी पॅड्स वर ० कर, सरकारचे एक स्तुत्य पाऊल #Thankyoumodi " असे म्हणत अनेक महिलांनी पंतप्रधानांचे आभार मानण्याऱ्या पाट्या हातात घेऊन आपला आनंद व्यक्त केला आहे. "हेच खरे महिला सक्षमीकरण" असे देखील अनेक महिलांनी म्हटले आहे. यावेळी महिलांनी अर्थमंत्री पियूष गोयल यांचे देखील आभार मानले होते.
 
 
 
 
मासिक पाळी सारखा प्रश्न आजही आपल्या समाजासाठी कुजबुजत बोलण्याचाच एक विषय आहे. मात्र आज अशा पद्धतीने समाजासमोर येऊन याविषयावर बोलणे आणि सेनेटरी नॅपकिन्सचे महत्व सांगणे एक स्तुत्य उपक्रम आहे. आणि यामध्ये केवळ महिलाच नाही तर पुरुष देखील सहभागी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि सरकारच्या या पावलाला पुरुषांनी देखील पाठींबा देत सरकारचे आभार मानले आहेत.
 
 
 
 
 

पुरुषांचाही पाठिंबा : 

महिलांसाठी पुरुषांनी पुढे येणे ही देखील एक अत्यंत आनंदाची बाब आहे. ज्याप्रमाणे महादेव गोविंद रानडे, महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाच्या दृष्टीने कार्य केले, त्याच प्रमाणे आजचे पुरुष जर मासिक पाळी आणि त्याच्यासंबंधी महत्वाच्या बाबींविषयी जागरुकता पसरविण्यात मदत करत असतील, तर त्यांचे काम देखील या महान व्यक्तिमत्वांइतकेच मोठे आहे.


या बाबत प्रसिद्ध लेखक सुदीप नागरकर याने, " एक पुरुष म्हणून मी कधीच त्यांच्या वेदना समजू शकणार नाही. मात्र हो मी त्यांच्या पाठीशी नक्कीच उभा राहू शकतो, त्यांना बळ देऊ शकतो. सरकारच्या या पावलाचे स्वागत आहे, धन्यवाद मोदी जी." अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 
 
 
 
यावर अनेकांनी अशी देकील प्रतिक्रिया दिली कि, केवळ करमुक्त करण्याने प्रश्न सुटेल का? भारतात एकूण ३५५ दशलक्ष महिला मासिक पाळी येणाऱ्या आहेत, आणि सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे यातील ७० टक्के महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स परवडण्यासारखे नाही. आणि त्यापैकी जवळ जवळ २० टक्के महिलांना सॅनिटरी नॅपकिन म्हणजे काय हे ही माहीत नाही. असे असताना सॅनिटरी पॅड्सकरमुक्त केले तर याविषयी चर्चा होईल, ज्यांना याविषयी माहिती नाही त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचेल आणि महत्वाची बाब म्हणजे, त्यांनादेखील आता करमुक्त सॅनिटरी नॅपकिन्स वापरता येतील.
 
ग्रामीण महिला आजही मासिक पाळीत कपडा, किंवा झाडाची सुकलेली पानं वापरतात. याचा त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. ज्यांना सॅनिटरी नॅपकिन्स काय हे माहीत नाही, त्यांना टॅम्पॉन्स म्हणजे काय, ते कसे वापरतात, हे माहीत असणं दूरच. अशा महिलांसाठी तरी सरकराने सॅनिटरी नॅपकिन्स पूर्णपणे करमुक्त करणे अत्यावश्यक होते. आजही खूप स्वस्तात हे मिळतील का? तर अनेक ठिकाणची परिस्थिती घेता याचे उत्तर आहे नाही, मात्र त्यावर 'कर' स्वरूपात जो अतिरिक्त शुल्क आकारण्यात यायचा तो तरी आता घेतला जाणार नाही.
 
 
 
 
सॅनिटरी नॅपकिन्सच्या कचऱ्याची एक मोठी समस्या आहे. त्यामुळे पर्यावरण प्रदूषण होत, आणि यामुळे बायो सॅनिटरी नॅपकिन्स, किंवा पर्यावरण पूरक अशा पॅड्सची आवश्यकता आहे. तसे पॅड्स बनविण्याचे कार्य आता अनेक संस्थांनी सुरु केले आहे. करमुक्त झाल्यामुळे आता बायो सॅनिटरी नॅपकिन्स देखील बाजारात उपलब्ध होऊ शकतील आणि त्याचा वापर वाढेल अशी आशा यामुळे दिसून येते.
 
या दृष्टीनं FPAI (फॅमिली प्लानिंग असोसिएशन ऑफ इंडिया) ही संस्था गेल्या अनेक दशकांपासून कार्य करत आहे. विविध महाविद्यालयांमध्ये जावून याविषयी ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना जागरुक करणं, महाविद्यालयांमध्ये सेनेटरी पॅड वेंडिंग मशीन (पॅड्स पुरवण्याचं यंत्र) बसवणं, महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थिनींना केवळ १ किंवा २ रुपयांच्या दरात पॅड उपलब्ध करुन देणं, तसंच नाटक, नुक्कड नाटक, आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जागरुकता पसरवण्याचे कार्य ही संस्था करत आहे.
 
नेटकऱ्यांनी मोदी सरकारच्या या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद देत असताना इतर वेळी याविषीय बोलणाऱ्या, आणि समाज माध्यमांतून आपल्या भावना व्यक्त करणाऱ्या सिने तारका यावेळी मात्र याविषयापासून चार हात लांबच दिसतायेत. सोनम कपूर, स्वरा भास्कर, करीना कपूर किंवा अगदी पॅडमॅनच्या वेळी मासिक पाळीविषयी अनेक बाबी सांगणारी राधिका आपटे, यांच्यापैकी कुणीच समाज माध्यमांवर येऊन सरकारच्या या पावलाविषयी काहीच सांगितलेले नाही. मात्र पॅडमॅन अक्षय कुमार याने या स्तुस्य उपक्रमाचे स्वागत करत सरकारचे आभार मानले आहेत. 
 
 
 
 
सॅनिटरी पॅड्स, पर्यावरण, प्रदूषण हे विषय गंभीर मोठे आणि महत्वाचे आहे, मात्र च्या दृष्टीने सरकारने उचललेले पाऊल महत्वाचे आणि स्तुत्य आहे, तर त्याला मिळणारा प्रतिसाद देखील खूप काही बोलून जातो. देशाच्या जनतेच्या हितासाठी कार्य केले तर जनता नक्कीच कौतुकाची थाप देते हे यावरुन पुन्हा एकदा दिसून आले आहे.
 
- निहारिका पोळ
@@AUTHORINFO_V1@@