शासकीय निवास्थानीच केली मुख्यमंत्र्यांनी विठ्ठल पूजा

23 Jul 2018 09:13:57


मुंबई : आरक्षणावरून मराठा समाजाने विठ्ठल पूजेसाठी केलेल्या विरोधानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतील आपल्या निवासस्थानीच विठ्ठल पूजा केली आहे. आज सकाळी सहकुटुंब आणि सपत्नीक मुख्यमंत्र्यांनी आपल्या 'वर्षा' बंगल्यावर विठूरायाची पूजा करत, राज्यातील नागरिकांसाठी प्रार्थना केली आहे.


मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः याविषयी आज सकाळी माहिती दिली आहे. 'आज काही कारणांमुळे प्रत्यक्ष पंढरपुरात माऊलीचे पूजन करता आले नाही. पण, वर्षा या शासकीय निवासस्थानी सपत्नीक, कुटुंबीयांसह मनोभावे, भक्तीभावे विठोबा-रखुमाईच्या त्याच मूर्तीचे पूजन केले', असे फडणवीस यांनी आपल्या सोशल मिडीयावरून सांगितले आहे. तसेच राज्यातील बळीराजा सुखी होऊ दे, सकलांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ दे, महाराष्ट्राच्या यशाची पताका अशीच उंच फडकू दे, अशी मनोभावे प्रार्थना केल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.





मराठा समाजाला तत्काळ आरक्षण मिळावे, तसेच सरकारने केलेली शासकीय पदांची मेगाभरती तत्काळ रद्द करावी, या मागणीसाठी मराठा समाजाने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय पूजेला यंदा जोरदार विरोध केला होता. तसेच पंढरपुरासह राज्यातील काही ठिकाणी हिंसक कारवाया देखील केल्या होत्या. त्यामुळे यात्रेदरम्यान कसल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, म्हणून मुख्यमंत्र्यांनी यंदाचा आपला पंढरपूर दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.

Powered By Sangraha 9.0