रोहिंग्यांच्या प्रश्नांसाठी म्यानमारवर संयुक्त राष्ट्रांकडून दबाव

    दिनांक  02-Jul-2018चिदॉंग : रोहिंग्या मुस्लिमांच्या पुनर्वसनासाठी म्यानमार सरकारवर संयुक्त राष्ट्रांकडून दबाब वाढवण्यात येणार असल्याचे माहिती संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनियो गुटेरेश यांनी आज दिली आहे. यासाठी लवकरच आम सभेमध्ये देखील प्रस्ताव सादर केला जाणार असून रोहिंग्या मुस्लिमांचे लवकरात लवकर पुनर्वसन करण्यात यावे, म्हणून म्यानमारवर दबाव टाकला जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बांगलादेशमधील चिदॉंग येथील रोहिंग्या मुस्लिमांच्या शिबिराला आज गुटेरेश आणि संयुक्त राष्ट्रांच्या काही अधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी याठिकाणी आलेल्या विस्थापित रोहिंग्या मुस्लिमांची त्यांनी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच बांगलादेशाकडून या शरणागतांसाठी सुरु करण्यात आलेल्या वेगवेगळ्या सेवाकार्यांचा देखील त्यांनी आढावा घेतला. यानंतर रोहिंग्या मुस्लिमांच्या राखिने प्रांतातील पुनर्वसनाच्या कामाला गती देण्यात यावी, म्हणून प्रयत्न केले जातील आणि यासाठी आवश्यक पडल्यास म्यानमारवरील राजकीय दबाव देखील वाढवण्याची तयारी असल्याचे गुटेरेश यांनी सांगितले.


ऑगस्ट २०१७ मध्ये राखीने प्रांतात रोहिंग्या मुस्लीम आणि म्यानमार सैन्य यांच्यात झालेल्या हिंसाचारनंतर मोठ्या प्रमाणात रोहिंग्या मुस्लीम हे बंगालदेशामध्ये आश्रयासाठी आले आहेत. बांगलादेश सरकारकडून या शरणागतांसाठी अनेक उपक्रम देखील सुरु करण्यात आले आहेत. बांगलादेश सरकारकडून यासर्वांना अन्न, आरोग्य सेवा आणि राहण्यासाठी जागादेखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.