आता शनी शिंगणापूर देखील सरकार जमा

19 Jul 2018 11:57:48

शनैश्वर देवस्थान विश्वस्त विधेयक विधानसभेत मंजूर




नागपूर : अहमदनगरमधील शनी शिंगणापूर देवस्थान अखेर सरकार जमा झाले असून श्री शनैश्वर देवस्थान विश्वस्त विधेयक २०१८ विधानसभेत मंजूर झाले आहे. त्यामुळे देवस्थानासंबंधीचे सर्व निर्णय यापुढे राज्य सरकार घेणार असून शनी चौथऱ्यावर महिलांच्या प्रवेश मार्ग देखील अखेर मोकळा झाला आहे.


विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दिवशी सरकारकडून संबंधित विधेयक सभागृहापुढे सादर करण्यात आले होते. यावर थोडा वेळ चर्चा झाल्यानंतर विरोधकांसह बहुमताने हे विधेयक सभागृहात मंजूर करण्यात आले. त्यामुळे शनी शिंगणापूर देवस्थानावर यापुढे सरकारी मालकी असणार आहे. त्यामुळे देवस्थान संबंधीचे सर्व निर्णय आणि महत्त्वाच्या नियुक्त्या यापुढे राज्य सरकारकडून करण्यात येणार आहेत.

दरम्यान हे विधयेक सभागृहात मंजूर झाल्यामुळे महिला सशक्तीकरण संघटनांकडून याचे स्वागत करण्यात आले आहे. कारण यामुळे शनैश्वर देवस्थानच्या शनी चौथऱ्यावर महिलांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा होणार आहे. शनी चौथऱ्यावर महिलांना देखील प्रवेश मिळावा, यासाठी गेल्या दीड वर्षांपूर्वी अनेक संघटनांनी आंदोलने केली होती. परंतु मंदिर संस्थानाने महिलांना प्रवेश देण्यास नकार दिला होता. त्यामुळे या देवस्थानाचा ताबा सरकारकडे देण्याची मागणी केली जात होती.
Powered By Sangraha 9.0