आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक

19 Jul 2018 09:00:49

पंढरपुरात एसटी बसेच केली तोडफोड






पंढरपूर : मराठा आरक्षण तत्काळ लागू करावे, या मागणीसाठी आता मराठा समाज अधिक आक्रमक होऊ लागला आहे. आरक्षणाला होत असलेल्या विलंबणावरून मराठा समाजातील काही तरुणांनी पंढरपुरात एसटी बसेसची तोडफोड केल्याचा प्रकार घडला असून या तोडफोडीमध्ये चार प्रवासी देखील जखमी झाले आहेत. त्यामुळे पंढरपूरामध्ये सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.


सरकारला वारंवार सांगून देखील मराठा समजाच्या आरक्षणावर कसल्याही प्रकारची ठोस भूमिका घेत नाही. यावर चिडून मराठा समाजातील काही तरुणांनी पंढरपूर स्थानकावर येऊन गदारोळ घातल्याचे, तसेच एसटी तोडफोड केल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी देखील तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी स्थानकावर 'सकल मराठा समाजा'च्या नावाची काही पत्रके पोलिसांना आढळून आली. ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांना आषाढी वारीच्या दिवशी विठ्ठलाची पूजा करू देणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत आरक्षण घेऊच, असे देखील या पत्रकांमध्ये लिहिण्यात आले आहे.

दरम्यान या घटनेमुळे पंढरपुरात मात्र तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर बसस्थानक आणि आसपासचा परिसरात पोलीस तैनात करण्यात आले आहे. आषाढी वारीच्या ऐन मुहूर्तावर अशा प्रकारची घटना घडल्यामुळे तसेच वारीच्या दिवशीच मुख्यमंत्र्यांना रोखण्याचा इशारा मराठा समाजाने दिल्यामुळे शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Powered By Sangraha 9.0