महापालिका निवडणुकीसाठीअधिकारी, कर्मचार्‍यांना प्रशिक्षण

19 Jul 2018 23:49:20

दिवसभर तीन सत्रात ३ हजार ५०० कर्मचार्‍यांना प्रशिक्षण

जळगाव, १९ जुलै :
 
महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. महापालिकेसाठी १ ऑगस्ट रोजी जळगाव शहरातील नागरिक मतदानाचा हक्क बजावणार आहे. त्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मतदान केंद्र अध्यक्ष, मतदान केंद्र अधिकारी, कर्मचारी यांना मतदान प्रक्रियेबाबत प्रशिक्षण देण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. गुरुवारी महाबळ कॉलनीतील जिल्हा प्रशासनाने बांधलेल्या नूतन सभागृहात ३ हजार ५०० पेक्षा जास्त अधिकारी व कर्मचार्‍यांना मार्गदर्शन करण्यात आले.
 
 
बुधवारी महापालिकेसाठी नशीब आजमावणार्‍या ३०३ उमेदवारांना निवडणूक विभागाकडून चिन्ह वाटप करण्यात आले. त्यानंतर आता निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच निवडणूक मुख्य निरीक्षक प्राजक्ता लवंगारे निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमावर लक्ष ठेवून आहेत. या प्रशिक्षण कार्यक्रमात राजेंद्र कचरे, अजित थोरबोेले, जितेंद्र पाटील, विजयानंद शर्मा, जितेंद्र पाटील या अधिकार्‍यांनी या वेळी प्रशिक्षण दिले. जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित स्थळाला भेट दिली. या प्रशिक्षणात मतदान यंत्रांची ओळख, मतदान पथक स्थापन करणे, सरावासाठी मतदानाची तालीम, केंद्राध्यक्षांची कामे, सूचना लावणे, मतदान अधिकार्‍यांची कामे, मतदान केंद्रात प्रवेशपात्र व्यक्ती, मतदान प्रतिनिधीची उपस्थिती, मतदान प्रतिनिधी नियुक्तीपत्र सादर करणे, मतदारांची ओळख पटवण्याकरिता आवश्यक पुरावे, आक्षेप फी स्वीकारण्यासंदर्भात नमुने याबाबत मार्गदर्शन अधिकार्‍यांनी केले. महापालिकेसाठी मतदानाची तारीख काही दिवसांवर येऊन ठेपल्याने प्रशासनाने तयारी युद्धपातळीवर सुरू केली आहे. मतदान काळात काही तांत्रिक अडचणी येऊ नये, यासाठी काटेकोरपणे नियोजन करण्याचे काम
सुरू आहे.
 
 
मतदान यंत्र हाताळण्याचेही दिले प्रशिक्षण :
निवडणूक काळात मतदार यंत्रे कसे हाताळावे याबाबतही अधिकारी, कर्मचार्‍यांना मार्गदर्शन करण्यात आले. इलेक्ट्रॉनिक मतदान मशीन हाताळताना कोणती जबाबदारी घ्यावी, बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट संदर्भातील माहिती देण्यात आली.
 
 
टपाल मतदानासाठी फॉर्मचे वाटप :
निवडणूक काळात ज्या अधिकारी व कर्मचार्‍यांना मतदान केंद्रावर नियुक्ती देण्यात आली आहे, अशा अधिकारी, कर्मचार्‍यांना या सभागृहात टपाल मतदानासाठी फॉर्मचे वाटप करण्यात आले. मतदान केंद्रावर नियुक्त शहरातील अधिकारी व कर्मचार्‍यांना या माध्यमातून टपालद्वारे मतदान करता येणार आहे. त्यासाठी महाबळ कॉलनीतील प्रशासनाच्या नूतन सभागृहात या टपाल फॉर्मचे वितरण करण्यासाठी पथकाची नेमणूक करून सहा टेबल लावण्यात आले होते. या माध्यमातून प्रशिक्षणासाठी आलेले शहरातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी फॉर्म घेतले. सदर फॉर्मवर यादीतील अनुक्रमांक टाकून त्यांना पोस्टाद्वारे मतपत्रिका दिली जाणार आहे.
Powered By Sangraha 9.0