90's Nostalgia भाग - १ : आई कार्टून बघू दे ना...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jul-2018   
Total Views |
 
 
 
 
आज रविवार. सकाळ जरा उशीराच उगवली. मात्र आता दूध पिऊन पटापट आंघोळ आटपून टी.व्ही. समोर बसायचंय. का? कारण... अरे माझं आवडतं मोगली लागणार आहे ना आता. सिंबा, मोगली, अंकल स्क्रूज माझी वाट बघत असतील... आई अगं ए आई कार्टून बघू दे ना जरा... 
 
 
काय? आठवलेत का आपले ते दिवस? 90's मधील रविवारच्या सकाळची मजा काही औरच होती. आपण रंगोली बद्दल वगैरे तर बोलूच यात, मात्र आज आपण चक्कर मारून येणार आहोत 90's च्या कार्टून्सच्या आठवणीत. रविवारी सकाळी 'द जंगल बुक' लागायचं. आणि प्रत्येक घरातून "जंगल जंगल बात चली है पता चला है... " हेच ऐकू यायचं. गुलजार साहेबांनी प्रत्येक लहान मुलाला दिलेली ही एक अमूल्य भेट आहे. ज्यावेळी माझ्या वडीलांनी सांगितलं कि रुडयार्ड किपलिंगने मध्यप्रदेशातील 'पेंच' या अभयारण्याजवळच खऱ्या मोगलीला बघितलं आणि त्यावरुन त्याला 'द जंगलबुक' लिहण्याची प्रेरणा मिळाली, मला हा मोगली अधिकच आवडायला लागला. कदाचित अगदी आपला जवळचा मित्रच वाटायला लागला. आणि बगीरा आणि बलू देखील आपलेच वाटायला लागले, शेरखान आणि का चा राग यायला लागला आणि एकूणच 'द जंगलबुक' आमचं आवडतं कार्टून झालं. दादाने लहान असताना मोगली आणि जंगलबुकच्या इतर पात्रांची अनेक चित्रे काढली आहेत. 
 
 
 
 
 
मोगलीसोबतच अनेक कार्टून्स होती जी त्यावेळी माझी, दादाची आणि तुमची आमची सगळ्यांची आवडती असायची. 'डक टेल्स' आणि 'टेल स्पिन' त्यातीलच आहेत. मला अजूनही त्या सोन्याच्या खजिन्यात पोहणारा अंकल स्क्रूज आठवतो. त्यावेळी डक टेल्स मधील अंकल स्क्रूज, ल्यूई, ह्यूई यांचे चित्र असलेले कंप़ास बॉक्स, डब्बा, पाण्याच्या बाटल्या, आणि टी शर्ट्स खूप दिसायचे. 
माझ्याकडे पण होते. साध्या टिफिन पेक्षा तो कार्टून वाला टिफिन खूपच आवडायचा. "झिंदगी तूफानी है, जहाँ हैं डक वर्ल्ड... हर दिन हर पल बनते हैं यहाँ डकटेल्स" हे कानावर पडताच हातची पायची कामं सोडून मी आणि दादा बसायचो टी.व्ही. समोर. दुपारची वेळ ठरलेली असायची. हातात दुधाचा कप आणि समोर 'डक टेल्स'.
 
 
 
 
 
टेल स्पिन मधला बलू मला अजूनही खूप आवडतो. "ओईये टेल स्पिन, ओईयो टेल स्पिन" हे गाणं तेव्हा सगळ्यांच्याच ओठांवर असायचं. कदाचितच एखादाच असा एपिसोड असेल जो आम्ही बघितला नसेल. बलू, त्याच्या सोबत असलेला किट, रेबेका यांच्यासोबत तो आर्धातास कसा पटकन निघून जायचा कळायचंच नाही. "चिप एण्ड डेल", "गमी बेअर्स" हे ही मला खूप आवडायचे. खार बघितली कि ही चिप किंवा डेल सारखी बोलत का नाही असा प्रश्न नेहमीच पडायचा. तर गमी बेअर्सचा तो गमी बेरी जूस पिऊन आपल्याला अशा उड्या कधी मारता येतील असंही वाटायचं. 
 
 
 
डिसनेच्या इतक्या कार्टून्सच्या आठवणी निघत असताना आपण मिकी माऊसला कसं विसरू शकतो ? खरं सांगू आताच्या मिकी माउस क्लब हाउसचा मिकी आणि मिनी खूप सुंदर आहेत गोड आहेत, मात्र मिकी माउस अॅण्ड फ्रेण्ड्स मधली तो जुना मिकीच मला जास्त आवडतो. हा खाली दिसतोय ना तसा. माझ्या कपाटावर आणि किती तरी वह्यांमध्ये या मिकीचं चित्र होतं. 
 
 
 
 
 
अरे इतक्या आठवणी निघत असताना मी माझ्या लाडक्या अलादिनला कशी विसरु. तुम्हाला त्याचा जिनी आठवतो का? मला त्याचा तो निळा रंगच खूप आवडायचा. अबू, यागो, कालीन, जिनी, जॅसमिन आणि तिचे बुटके वडील, असं वाटतं अगदी काल पर्यंत आपण यांना रोज भेटायचो. "अरेबियन नाइट्स..." हे गाणं वाजलं रे वाजलं कि जिनीला बघण्यासाठी म्हणून आम्ही येऊन बसायचो. आणि त्यावेळी नुकतेच रंगीत टीव्ही आणि केबल आले होते. म्हणजे साधारण १९९५ नंतर तेव्हा कार्टून नेटवर्क हे आवडतं चॅनल असायचं. त्यावरच हे अलादिन लागायचं. आणि गंमत म्हणजे हे सगळे कार्टून्स हिंदीतून गप्पा मारायला यायचे आमच्याशी. अलादिनचा व्हिडियोगेम पण आला होता, मजा यायची खेळताना. त्या यागोची म्हणजेच अलादिनच्या त्या पोपटाची टपोरी भाषा खूपच मजेदार होती. 
 
 
 
 
 
पाषाण युगातील फ्रेड फ्लिंस्टोन असू देत नाहीतर भविष्यातील जेट्सन्स, पाच अंगठ्यांमधून निघणारा कॅप्टन प्लॅनेट असू देत नाही तर द मास्क, अगदी पॉपॉय असं कुठलं पालक खातो ज्यातून त्याला इतकी शक्ती मिळते? असा पडलेला प्रश्न असू देत नाही तर पॉवर पॉफ गर्ल्समधील केमिकल एक्स म्हणजे काय हा प्रश्न असू देत. डेक्स्टर्स लेबोरेटरी पासून ते डोनाल्डक, गूफी, मिकी, मिनी आणि प्लूटो पर्यंत कितीतरी मित्र होते आपले. आजच्या सारखी व्हर्चुअल दुनिया नसली तरी ते आपले टी.व्ही. वरचे व्हर्चुअल मित्र खूप जवळ भासायचे. 
 
 
 
 
 
या सगळ्यात माझं आवडतं कोण होतं सांगू? Non other than "टॉम अॅण्ड जेरी." आज सुद्धा माझ्या लॅपटॉपमध्ये १ तासाचे टॉम अॅण्ड जेरीचे भाग आहेत. आणि मी आजही त्याच आतुरतेने, निरागसतेने आणि मन लावून ते सर्व भाग बघते. 
 
 
या कार्टून्सने आपल्याला काय शिकवलं? तर टॉम अॅण्ड जेरीने आपल्याला नाती निभावणं शिकवलं. आज आपली किती तरी नाती ही त्यांच्या सारखीच आहेत. "तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना" अशी. एकमेकांशी किती जरी ते भांडले , एकमेकांना कितीही त्रास दिला तरी कुत्रा समोर आल्यावर एक होऊन त्याच्याशी लढणाऱ्या या उंदीर मांजराच्या जोडीनं आपल्याला नात्यातील मजा आणि निरागसता जपून ठेवणं शिकवलं. मोगलीनं आपल्याला धैर्यानं कुठल्याही समस्येवर मात करणं शिकवलं, तर कॅप्टन प्लॅनेटनं २० वर्षांआधी पासून पर्यावरणाच्या महत्वाविषयी आणि त्याला जपण्याविषयी शिकवलं. पॉपॉयनं पालक खाणं किती महत्वाचं आहे हे शिकवलं तर चिप आणि डेलनं छोट्यांकडूनही मोठी मोठी काम होऊ शकतात हे शिकवलं. रिसेस या कार्टूनने खरी मैत्री काय असते हे शिकवलं. 
 
 
 
 
 
आज शिनचॅन, डोरेमॉन आणि इतर कार्टून्स बघितले तर त्यातला निरागसपणा हरवलेला वाटतो. आजचे कॅरेक्टर्स 'गोड' नाहीयेत. कुठेकुठे तर किळसवाणी वाटतात (ऑगी अॅण्ड द कॉकरोचेस) 90's चे कार्टून्स आपलेसे वाटायचे. यामध्ये स्कूबी डू, स्वॅट कॅट्स, रोड रनर, रिची रिच, टिमॉन अॅण्ड पुम्बा असे किती तरी कार्टून्स आहेत. खरंच 90's Nostalgia ची सुरुवात करताना माझ्या या मित्रमैत्रिणींच्या आठवणींशिवाय मी पुढे जाऊच शकले नसते, कारण.. यांच्या मुळेच मी माझं बालपण खऱ्या अर्थाने जगले.. 
 
 
 
 
 
तुमच्या ही अशा काही आठवणी असतील तर आमच्या सोबत नक्कीच शेअर करा.. काही कार्टून्सचा उल्लेख माझ्याकडून राहिला असेल तर नक्की उल्लेख करा पुढच्या भागात नक्कीच भेटू अशा अनेक आठवणींसह.. तो पर्यंत स्टे ट्यून्ड.. 
 
 
- निहारिका पोळ  
 
 
@@AUTHORINFO_V1@@