इंद्रायणीच्या तुकोबांना नीरेचे स्नान

    दिनांक  18-Jul-2018

तुकोबांच्या पादुकांचे नीरा स्नान संपन्न !

अकलूज : पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूराकडे मार्गक्रमण करत असलेल्या संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे पालखी सोहळ्यातील नीरा स्नानांचा सोहळा आज सराटी येथे संपन्न झाला आहे. विठू नामाचा गजर आणि लाखो भाविकांच्या साक्षीने तुकोबांच्या पादुकांना नीरेच्या पाण्याने आज स्नान घालून पालखी अकलूजच्या दिशेने रवाना झाला आहे. दरम्यान वाटेत माने विद्यालय येथे आज तुकोबांच्या पालखीचे तिसरे गोल रिंगण होणार आहे.


तुकोबांच्या पालखी सोहळ्याचा कालचा मुक्काम हा सराटी येथे होता. नीरा नदीच्या कडेला असलेल्या सराटीमध्ये मुक्काम केल्यानंतर आज सकाळी पालखी सोहळा सकाळची पहाटपूजा उरकून नीरेच्या किनारी आला होता. यानंतर मंत्रोच्चारासह तुकोबांच्या पादुकांना नदीमध्ये नेऊन हा शाही सोहळा पार पडला. दरम्यान यंदा पावसाने राज्यात समाधानकारक हजेरी लावल्यामुळे यंदा नीरामाई दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या भाविकांनी देखील तुकोबारायांसह नीरा स्नानाचा आनंद घेतला.

दरम्यान आपल्या पुढील मुक्कामासाठी म्हणून पालखी सोहळा माने विद्यालय मार्गे अकलूजकडे रवाना झाला आहे. या प्रवासादरम्यान माने विद्यालयाजवळ पालखी सोहळ्याचे तिसरे गोल रिंगण पार पडणार आहे. त्यामुळे माने विद्यालयाचा संपूर्ण परिसर दिंड्या आणि पताकांनी फुलून निघाला आहे. स्थानिक प्रशासनाने देखील या सोहळ्यासाठी विशेष तयारी केली असून तुकोबांच्या स्वागतासाठी अकलूज नगरी देखील सध्या सजू लागली आहे.