नव्या श्रावणबाळांची गोष्ट...

    दिनांक  18-Jul-2018   
आम्ही प्रगत होत आहोत, पुढारलेलो होत आहोत अशी आम्हीच आमची संभावना करून घेत असतो. पुढारतो आहोत म्हणजे नेमके काय होते आहे? आम्हाला स्वच्छता राखा, हे शिकवावे लागत आहे. त्यासाठी देशव्यापी मोहीम सुरू करावी लागत आहे. त्यासाठी असंख्य महत्त्वाचे प्रश्न आणि समस्या असतानाही पंतप्रधानांना त्यासाठी वेळ द्यावा लागतो आहे आणि तरीही महानगरांमध्ये पाऊस आला की प्लॅस्टिक आणि कचर्‍याने पाणी अडते. पाणी ओसरून गेले की रस्त्यांवर नुसताच कचरा असतो... शिवासोबत शक्तीचीही पूजा करण्याची प्राचीन- पौराणिक परंपरा असणार्‍या आमच्या देशांत, ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ अभियान राबवावे लागते. ज्यांना आपण मागासलेले, प्रतिगामी अशी त्यांची संभावना करतो तो ‘भारत’ म्हणून जी ओळख आहे, अशा संस्कृती आणि परंपरांना डोळसपणे धरून आहेत. त्यांची गावे स्वच्छ आणि नीटनेटकी असतात. ग्रामीण भागांत उलट महिलांचे प्रमाण चांगले आहे. मागे आलेल्या अहवालानुसार महानगरांमध्ये उलट मुलींच्या जन्माचे प्रमाण चिंताजनक स्थितीत कमी झाले आहे. तरीही त्यांना पुढारले म्हणायचे. पश्चिमेचे वारे कानांत भरल्यावर उंडारल्यासारखे करणे म्हणजे पुढारणे असे आहे का? स्वच्छता राखा, वाहने नीट ठेवा, दुसर्‍यांची अडचण होईल असे वागू नका, आपण सहजीवन जगतो आहे, समाज म्हणून इतरांचाही सामूहिक संसाधनांवर तितकाच अधिकार आहे, याचे भान नसणार्‍यांना पुढारलेले, सिव्हिलाजल्ड म्हणायचे का?
 
 
भारतासारख्या कुटुंबवत्सल देशांत कुटुंब व्यवस्था टिकावी म्हणून प्रयत्न करावे लागत आहेत. त्यासाठी सामाजिक प्रबोधन आणि समुपदेशानाची मोहीम राबविण्याची वेळ आली आहे. घरच्यांशी संवाद साधा, हेही सांगण्याची वेळ यावी इतका संवाद संपत यावा का? श्रावणबाळाच्या देशांत, वडिलांचे वचन पाळण्यासाठी वनवासांत जाणार्‍या मर्यादापुरुषोत्तमाच्या देशांत आता आपल्या म्हातार्‍या आई-वडिलांना सांभाळा, असे सांगण्याचे काम शासनाचे अन्‌ न्यायव्यवस्थेचे असावे का? सरकारने नुकताच ज्येष्ठांसाठी कायदा केला. सामाजिक प्रश्न आणि तेही संस्कृती म्हणून जो आपला चेहरा आहे ते साकारणार्‍या परंपरांचे जतन, सांभाळ आणि संवर्धन करणार्‍या गोष्टी पाळल्या जाव्यात यासाठी कायदे समर्थ नसतातच. उलट ते स्वत:चे समाधान करून घेण्याचा प्रकार असतो. अंधेरीतील एका वृद्ध दाम्पत्याच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच एक निर्णय दिला की आता ज्येष्ठांचा सांभाळ करण्याचे कर्तव्य मुलांनी पार पाडले नाही अन्‌ त्यांना अनाथ केले तर मुलांना दिलेली त्यांची संपत्ती ते परत घेऊ शकतात. हा निर्णय तसा अत्यंत महत्त्वाचा आहे. कर्तव्य, संस्कार, स्नेह, आदर हे असू द्या; पण किमान या धाकामुळे तरी मुलं आपल्या आई-वडिलांचा सांभाळ करतील, असे न्यायालयाला वाटले असेल.
 
 
ज्येष्ठांचा सांभाळ आणि त्यातून निर्माण झालेली कौटुंबिक समस्या समाजिक प्रश्न झाल्यालाही आता किमान एक शतक तरी होऊ गेले आहे. त्या आधीही ही समस्या थोडक्या प्रमाणात होती; पण त्यावेळी जागतिकीकरणाने जग जवळ आणले नव्हते अन्‌ त्यामुळे कुटुंब आणि समाजाची स्नेहवीण घट्ट होती. कुसुमाग्रजांनी 1970 साली नटसम्राट ही मुलांनी टाकलेल्या पोरक्या बापाची शोकांतिका रंगभूमीवर आली. या नाटकाचा पहिला प्रयोग दि गोवा हिंदू असोशिएशन, कला विभाग या संस्थेने 23 डिसेंबर 1970 रोजी बिर्ला मातोश्री सभागृह, मुंबई येथे सादर केला. त्यानंतर विविध संस्था आणि नटांच्या संचात हे नाटक सादर होत राहिले. श्रीराम लागूंनंतर सतीश दुभाषी, उपेंद्र दाते, यशवंत दत्त, चंद्रकांत गोखले, दत्ता भट, मधुसूदन कोल्हटकर, राजा गोसावी, गिरीश देशपांडे आणि आता चित्रपटांत नाना पाटेकर यांनी आप्पासाहेब बेलवलकर यांची भूमिका केली. इतकी वर्षे हे नाटक समकालीन वास्तवच आहे, असे वाटत आले आहे. त्यातल्या पोरक्या माय-बापाची शोकांतिका बघताना पुरुष शर्टाच्या बाहीने अन्‌ बायका पदराने डोळे पुसतात. आपल्या आजूबाजूला घडणार्‍या अशाच घटनांची चर्चा करतात. मी किंवा आपण सोडून बाकी कसे कृतघ्न अपत्य आहेत, यावरही फुकाचा अभिमान साजरा केला जातो.
 
 
मुळात कुसुमाग्रजांनी शेक्सपीयरच्या शोकांतिकांवरून बेतलेले हे नाटक आहे. याचा अर्थ ते रूपांतर किंवा भाषांतर, अवस्थांतर नाही. प्रेरणा मात्र त्यांना मिळाली आणि त्यांनी हे अजरामर नाटक लिहिले. याचा अर्थ ही समस्या जागतिक आहे. अत्यंत प्रगत, आधुनिक आणि सुधारणावादी समजल्या जाणार्‍या पश्चिमेतल्या साहेबांच्या देशांतही ही समस्या आहे. आताही ती तितकीच ताजी आहे. कुसुमाग्रजांनीही म्हटले होते की हे नाटक आपलेसे वाटणार नाही अन्‌ नाटकांतले आप्पासाहेब वास्तवात असणार नाही अन्‌ हे नाटक बंद पडेल तो खरा दिवस असेल. दुर्दैवाने तसे काही झाले नाही. त्यानंतर याच थीमवर अनेक नाटके आणि चित्रपट आले. अगदी अमिताभच्या बागबान पासून राजेश खन्नाच्या अवतार पर्यंत अनेक चित्रपटांतही ही शोकांतिका पडद्यावर आली आणि त्याच्या प्रत्येक आवृत्तीला प्रत्येक काळांत रसिकांनी डोक्यावर घेतले. पिटातले प्रेक्षक ही शोकांतिका पाहून ढसढसा रडले आहेत. आप्पासाहेब बेलवलकर त्यांच्या शोकांतिकेसह अमर आहेत, हे दिसत आले. आता नटसम्राट या चित्रपटाचा परिवेश जुना असेल तरी त्यातली आप्पासाहेबांची वेदना मात्र अजूनही ताजी असल्याने या चित्रपटांनीही चांगला व्यवसाय केला.
 
 
कुटुंब संस्था राखण्यासाठी आणि सुदृढ करण्यासाठी आता प्रयत्न करावे लागत आहेत. सहज होणारे घटस्फोट आणि माणसांचा वाढता अहंम्‌ कुटुंब आणि समाजाचे धृवीकरण करत आहे. ब्रेकअप्स हा सेलिब्रेशनचा विषय झाला आहे. ‘मै तो सज गयी रे सजना के लिए’, या गाण्यापासून, ‘सुबह सवेरे देखो मैने ये सब कर लिया, मेरे सय्याजीसे आज मैने ब्रेकअप करलिया’ या गाण्यापर्यंतच प्रवास आपला सहज झालेला नाही. त्यासाठी समाज म्हणून आपल्याला खूप काही मोजावे लागले आहे. नात्यांच्या आमच्या गरजा बदलत गेल्या आहेत. तशी माणसांची नाती ही गरजांवरच आधारित असतात आणि गरज संपली की नातीही संपून जातात. गरज बदलली तशी नातीही बदलत असतात. अर्थात गरज ही वाईट बाब आहे, असे समजण्याचे काही कारण नाही. ती भौतिकच असते असेही नाही. ती सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिकदेखील असू शकते. अगदी धार्मिकही असू शकते. जागतिकीकारण, बाजारीकरण आणि खासगीकरणाने माणसांच्या सार्‍याच गरजांचे भौतिकीकरण होते आणि त्या मग वैयक्तिक परिघाच्या बाहेर जाऊच शकत नाहीत एवढ्या संकुचित झाल्या आहेत. त्यामुळे इतरांच्या गरजांचा विचार करण्याचे सामाजिक मूल्य नाहीसे होत आहे. जग जवळ करताना आपली माणसं मात्र दूर जात आहे आणि भीषण म्हणजे त्याची साधी जाणिवही आमच्या मेंदू आणि काळजापर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे घरांतल्या म्हातार्‍यांना डस्टबीन म्हणण्यापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. विवाह विषयक वेबसाईटस्‌वर मुली, ‘घरी किती डस्टबीन्स आहेत.’ असे विचारतात. आता अशा विषयांवर चर्चा करताना आपला तो बाब्या अन्‌ दुसर्‍याचं ते कार्ट, अशी आमची भूमिका असते. दुसरे त्यांच्या म्हातार्‍यांकडे दुर्लक्ष करतात आणि आमचे मात्र मायबापच खडूस आहेत, असे अहमहमिकेने सांगण्यात येते. वैयक्तिक पातळीवर प्रत्येक प्रकरणाचा वेगळा विचार करता येतो, मात्र सामूहिक विचार करायचा झाल्यास इतकाच असतो की आपले लहानपण ही त्यांची जबाबदारी होती आणि आता त्यांचे ज्येष्ठपण हे आपले कर्तव्य आहे... कधीकाळी गावांत असलेले मायबाप आणि शहरांत हातावर पोट घेऊन आलेली मुलं इथून आमच्या भुकांचा विस्तार होत गेल्याने आता तर विदेशांत असलेली मुलं आणि देशांत असलेले एकाकी मायबाप या पातळीवर ही ज्येष्ठांची समस्या आलेली आहे. मुलांना त्यांच्या भारतातील प्रॉपर्टीमध्ये रस असतो मात्र ड्युटीत मात्र नसतो. नव्या श्रावणबाळांची गोष्ट खूपच चिघळणारी झालेली आहे!