‘अर्थ’साठी हरप्रीतची ‘अर्थली’

    दिनांक  17-Jul-2018    

निसर्ग, प्राणी-पक्षी-वृक्ष संरक्षण व संवर्धनासाठी आपल्या कलेच्या माध्यमातून एका अनोख्या पद्धतीने झटणाऱ्या हरप्रीत अहलुवालिया यांची ही कहाणी...
 
निसर्ग आपल्याला नेहमी काही ना काही देण्यासाठी तत्पर असतो, पण आपल्या व्यस्त दिनक्रमामुळे आणि वाढत्या गरजांमुळे आपल्याला निसर्गाने दिलेल्या गोष्टी जतनही करता येत नाहीत आणि त्यांची परतफेडही करता येत नाही. हाच विचार करता करता एके दिवशी हरप्रीत अहलुवालिया यांच्या मनात आले की, आपण आपल्या धरणीमातेचे काहीतरी देणे लागतो आणि तिचे ऋण नक्कीच फेडले पाहिजे. कारण, या धरणीमातेमुळेच आपले अस्तित्व आहे. याच विचाराने हरप्रीत यांनी अर्थली क्रिएशन्सया संस्थेची स्थापना केली आणि त्या माध्यमातून निसर्गसौंदर्य कायम राखण्यासाठी, प्राणी-पक्ष्यांच्या संरक्षणासाठी, वृक्षांच्या संवर्धनासाठी काम सुरु केले. हरप्रीत यांनी जे कार्य केले ते नक्कीच एखादा कलाकारच करु शकतो. कलाकाराच्याच डोक्यात अशी कल्पना साकारु शकते आणि तिचे मूर्तरुप आपल्याला बाग-बगिचे-उद्याने-थीम पार्क अन् घराघरांत दिसू शकते. पण कोण आहेत हे हरप्रीत? काय केले त्यांनी? काय आहे अर्थली क्रिएशन्स?’
 

नोएडात राहणाऱ्या हरप्रीत अहलुवालिया यांना सुरुवातीपासूनच मातीची भांडी तयार करण्याची आवड होती. पण, मुळातच कलाकार असलेल्या हरप्रीत केवळ मातीची भांडी तयार करुन थांबणाऱ्याणतल्या नव्हत्या, तर त्यांना आपल्या धरणीमातेसाठी, प्राणी-पक्ष्यांसाठी आपल्या कलेच्या माध्यमातून काहीतरी करायची इच्छा होती. म्हणूनच त्यांनी अर्थली क्रिएशन्सची स्थापना केली आणि आपली कल्पना सत्यात उतरवली. मानवाने आज पृथ्वीवरील बऱ्याथचशा नैसर्गिक साधनसंपत्तीचा आपल्या स्वार्थासाठी नाश केल्याचे आपण पाहतो. परिणामी, माणसाच्या या कृत्यामुळे कित्येक प्राणी-पक्ष्यांचे, वृक्षजातींचे अस्तित्व धोक्यात आले. हरप्रीत यांना अशा प्राणी-पक्ष्यांच्या संरक्षण-संवर्धनासाठी आपल्या कलेच्या माध्यमातून संदेश देता येईल, असे वाटले आणि त्यांनी अस्तित्व धोक्यात आलेल्या, त्याचबरोबर इतर सर्वच प्राणी-पक्ष्यांच्या आकारांच्या टेराकोटा कुंड्यांची निर्मिती सुरु केली. या कुंड्यांच्या निर्मितीने, बाग-बगिच्यांत-घरांत सुशोभिकरणासाठी त्यांचा वापर केल्याने लहान मुलांसह, मोठ्या माणसांच्या मनातही प्राणी-पक्षी-वृक्षांच्या संरक्षण-संवर्धनाचा संदेश जाईल, अशी त्यांची त्यामागची भूमिका होती. शिवाय आपला हा उद्योग सुरु करतानाच हरप्रीत यांनी ४० कुंभारकाम करणाऱ्या कामगारांसोबत घेत त्यांच्या हातालाही काम दिले. तसेच त्यांच्या परिवाराची, मुलांचीही जबाबदारी घेतली.

 

पुढे हरप्रीत यांच्या कलाकृतीत सौंदर्य आणि गुणवत्ता दोन्हीही दिसल्याने लोकांनाही प्राणी-पक्ष्यांच्या आकारातील कुंड्या आवडू लागल्या व शहरांत ठिकठिकाणी त्यांनी तयार केलेल्या कुंड्या विराजमान झाल्या. बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदवी मिळवलेल्या आणि गार्डनिंग अॅण्ड एन्व्हायर्नमेंटल स्पेसमध्ये प्राविण्य मिळवलेल्या हरप्रीत यांची ही यात्रा सुरु होऊन आता १० वर्षे झाली आहेत. या १० वर्षांत त्यांचा आतापर्यंत १ लाख लोकांशी संबंध आला. या सर्वांचेच ध्येय जगाला सुंदर आणि नैसर्गिक स्थितीत ठेवण्याचे, प्राणी-पक्ष्यांचे संरक्षण करण्याचे, वृक्षांचे संवर्धन करण्याचे आहे. हरप्रीत यांनी आतापर्यंत ८०० पेक्षा अधिक प्रकारच्या संकल्पनेने वेगवेगळ्या आकारातील कुंड्या तयार केल्या असून, त्यात मुख्यत्वे प्राणी, पक्षीरुपी कुंड्या, वॉटर बॉडीज आणि पक्ष्यांच्या घरट्यांचा समावेश आहे. हरप्रीत यांनी या सर्वच कुंड्यांना सर्वसामान्य व्यक्ती घेऊ शकतील, अशाच दरांमध्ये उपलब्ध करुन दिले आहे, जेणेकरुन अधिकाधिक लोक त्यांचा वापर करतील आणि सर्वांपर्यंत प्राणी-पक्षी-वृक्ष संरक्षण व संवर्धनाचा संदेश पोहोचेल.


हरप्रीत यांची इच्छा प्रथमपासूनच बागकामाला एका वेगळ्या पातळीवर घेऊन जाण्याची होती. प्राणी-पक्ष्यांच्या आकारातील कुंड्यांच्या निर्मितीतून त्यांनी एक नवा विचार आणि दिशा देण्याचे काम केले. प्राणी-पक्ष्यांच्या रुपातील कुंड्यांमध्ये रोपट्यांची लागवड करुन पृथ्वीवरील वृक्षांच्या संरक्षण आणि संवर्धनाचाही संदेश दिला. थीम पार्कमध्ये अशा सुंदर कलाकृती आणि सजावट लोकांना तिथे येण्यासाठी आकर्षणाचे केंद्र ठरु लागल्या. प्राणी-पक्षी आणि वृक्षसंरक्षण-संवर्धनाचा हरप्रीत यांनी एका वेगळ्याच प्रकारे दिलेला संदेश नक्कीच अनोखा आहे. कित्येक लोकांना धरणीमातेसाठी, निसर्गासाठी, प्राणी-पक्ष्यांसाठी काहीतरी करण्याची इच्छा असते. पण, बऱ्यामचदा त्यांना मार्ग सापडत नाही. पण, आज हरप्रीत अहलुवालिया यांचे काम पाहिले की, आपण आपल्याला जे आवडते, ते छोट्या छोट्या गोष्टींतून किंवा आपल्या कामातूनच निसर्ग, प्राणी, पक्षी यांच्यासाठी काहीतरी करु शकतो, हे पटते. आताच्या काळात आवश्यक झालेल्या निसर्ग, प्राणी, पक्षी संरक्षण व संवर्धनासाठी एका अनोख्या माध्यमांतून कार्य करणाऱ्या हरप्रीत अहलुवालिया यांना पुढील वाटचालीसाठी दै. मुंबई तरुण भारतपरिवाराकडून हार्दिक शुभेच्छा.