काश्मीरचा ‘कसामिरा’

    दिनांक  17-Jul-2018   दहशतवादी संघटना आणि पाकिस्तानी लष्कर व आयएसआयने लावलेल्या धर्म-अधर्माच्या सापळ्यात अडकून कित्येक काश्मिरी तरुण दहशतवादी होण्याचा मार्ग पत्करतात. सदैव कोणीतरी म्हणजे भारत सरकारने आपल्यावर अन्याय-अत्याचार केला, हे तरुणांवर बिंबवल्याने दहशतवाद्यांच्या कुविचारांनी ते प्रभावित होतात व जिहादी, दहशतवादी बनण्यासाठी घर सोडतात. १९९० साली काश्मीरच्या अनंतनागमधील अल्ताफ अहमद मीर हादेखील दहशतवादाच्या राक्षसी प्रवृत्तीकडे ओढला गेला आणि सीमारेषा ओलांडून दहशतवादी होण्यासाठी पाकिस्तानमध्ये दाखल झाला. त्यानंतर जवळपास तीन दशकांचा कालावधी उलटून गेला. आता मीरचे नाव घेण्याचे कारण म्हणजे, तीन दशकांपूर्वी दहशतवादी बनण्यासाठी पाकिस्तानमध्ये पोहोचलेला मीर सध्या एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. मीरने ‘कोक स्टुडिओ’ या प्रसिद्ध दूरचित्रवाणी कार्यक्रमांतर्गत एक गीत गायले आणि त्याचे नाव सगळीकडे झाले. जम्मू-काश्मीर, पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्येही त्याने गायलेले हे गीत गाजत असून लोकांच्या कानातून हृदयापर्यंत त्याचा आवाज पोहोचत आहे. शायर गुलाम अहमद महजूर यांची प्रसिद्ध रचना ‘हा गुलों’ याला एका नव्या रूपात कोक स्टुडिओच्या माध्यमातून अल्ताफ मीर यांनी सादर केले आणि रसिकांची मने जिंकली. पाकव्याप्त काश्मीरमध्ये हे गाणे तयार केले असून, ‘हा गुलो तुही मा सा वुचवुन यार मुएं, बुलबुलू तुही चांदतूं दिलदार मुएं,’ असे बोल आहेत. कोक स्टुडिओ एक्स्प्लोरने हे गाणे युट्यूबवर अपलोड केले असून केवळ चारच दिवसांत आतापर्यंत त्याला तीन लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिले आहे. दहशतवादी बनण्यासाठी गेलेला मीर दहशतवादी न बनता गायक होतो, त्यामागेही काही कारणे आहेत. १९९० साली दहशतवादी बनण्यासाठी पाकिस्तानात पोहोचलेला अल्ताफ मीर १९९४ साली पुन्हा काश्मीरला परतला. खोऱ्यातील दहशतवादाचे बदललेले परिदृश्य आणि दहशतवादाविरोधात कार्य करणाऱ्या सुरक्षा दलांच्या वाढत्या प्रभावामुळे मीरने पुन्हा १९९५ साली सीमारेषा पार करत मुझफ्फराबाद गाठले आणि तिथेच नक्षीकाम करणाऱ्या एका एनजीओच्या संपर्कात येऊन स्वतःचा ‘कसामीरा’ नावाचा बॅण्ड सुरू केला. याच माध्यमातून त्यांनी आपली गायकी सुरू ठेवली व तो कोक स्टुडिओने त्याची प्रतिभा हेरून त्याला गायची संधी दिली. दहशतवादाच्या मार्गावर जाणारा एक तरुण तो रस्ता सोडून संगीत-गायन क्षेत्रात येतो, ही गोष्ट नक्कीच आनंददायक म्हटली पाहिजे.

 

'ममताशाही'ची

 

‘माँ-माटी-मानुष’ची घोषणा देऊन पश्चिम बंगालच्या सत्तेवर आलेल्या ममता बॅनर्जी यांनी आपल्याच घोषणेला फाट्यावर मारल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच केली. ममता सरकारच्या काळात खरोखरच पश्चिम बंगालमधली परिस्थिती बिकट झाल्याचे तिथे घडत असलेल्या घडामोडींवरून दिसते. राज्यात ममता बॅनर्जी सत्तारूढ झाल्यापासून त्यांना व त्यांच्या पक्षातील नेत्यांना विरोध करणाऱ्यांची हत्या करण्यासाठी एक विशेष गट स्थापन करण्यात आल्याचा आरोपही मोदींनी केला. विशेष म्हणजे दुर्गापूजा हा पश्चिम बंगालमधला सर्वात मोठा उत्सव. बंगालची संस्कृती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या याच दुर्गापूजेला अपशकुन करण्याचा डाव ममतादीदींनी खेळला. आपल्या आवडत्या मुस्लीम समूहाला खुश करण्यासाठी आणि त्यांच्याकडून एकगठ्ठा मतांचे दान पदरात पाडून घेण्यासाठी ममतादीदी ‘ममताबानो’ झाल्या. दुर्गापूजेवेळी मोहरम सण आल्याचे कारण सांगत ममता बॅनर्जी यांनी दुर्गापूजेवर, दुर्गाविसर्जन मिरवणुकीवर निर्बंध लादले. ममतादीदींच्या या दाढी कुरवाळू राजकारणाला जसा भाजपने जोरदार विरोध केला तसाच न्यायालयानेही त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. तेव्हा कुठे ममतादीदींना जाग आली. पश्चिम बंगालमध्ये विशिष्ट समूहाच्या दहशतीत जनता वावरत असल्याचेही पंतप्रधान म्हणाले. हा विशिष्ट समूह कोणाचा तर ज्यांच्यावर ममतादीदींचा वरदहस्त आहे, असे त्यांच्या पक्षातले कार्यकर्ते-नेते आणि त्यांचे बगलबच्चे, त्याचबरोबर धर्मांध मुस्लीम समूह. पश्चिम बंगालची सुजलाम-सुफलाम भूमी याच लोकांच्या हिंसक कारवायांमुळे रक्तरंजित झाली, पण ममतादीदींना या रक्तरंजित भूमीतच पुन्हा एकदा आपल्या सत्तेचे जोमदार पीक येईल, असे वाटत असावे, म्हणून त्यांनी हिंसेला थांबविण्याचा प्रयत्न कधीही केला नाही. आज पश्चिम बंगालची रणभूमी झालेली ममतादीदींच्या विशिष्ट समूहाचे लांगूलचालन करण्याच्या वृत्तीमुळेच झाली, पण हे किती दिवस चालणार? कारण जनतेने आता ममतादीदींच्या राजकारणाला पुरते ओळखले आहे. त्यामुळे ते आपला संवैधानिक अधिकार-मतदान करून ममतांना नक्कीच घरी पाठवतील. जनतेला आपल्या संस्कृती आणि परंपरांवर तुघलकी निर्णय आणि नियमांच्या आधारे लादलेली बंदी कधीही आवडत नाही, ते त्याविरोधात बंड करतातच. पश्चिम बंगालमध्येही तसेच होईल.