रालोआला कधीही पाठिंबा देणार नाही : राजू शेट्टी

    दिनांक  17-Jul-2018


पालघर : ' केंद्र आणि राज्य सरकारने सामान्य शेतकऱ्यांची फसवणूक केली असून त्यामुळे रालोआला कधीही पाठिंबा देणार नाही' असे स्पष्ट मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे. पालघर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.


'दूध दरवाढ आंदोलनाचा कसल्याही प्रकारचा राजकीय अजेंडा नाही. हे आंदोलन तळागाळातील शेतकरी आणि कष्टकरी नागरिकांच्या पाठींब्यावर सुरु आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा मोबदला मिळाला पाहिजे, हे स्वाभिमानी संघटनेची मागणी आहे. त्यामुळे हे आंदोलन सुरु आहे. दरम्यान रालोआ सरकारने शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली असून यामुळे शेतकरी मोठ्या प्रमानात दुखावला गेला आहे. त्यामुळे रालोआला यापुढे कसल्याही प्रकारचा पाठिंबा दिला जाणार नाही', असे त्यांनी म्हटले.


दरम्यान स्वभिमानीने पुकारलेल्या दूध दरवाढ आंदोलन आज दुसऱ्या दिवशी देखील सुरूच आहे. राज्यामध्ये ठिकठिकाणी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दुधाच्या गाड्या अडवून दुधाचे आणि गाड्यांचे नुकसान केले आहे. खुद्द राजू शेट्टी यांच्या उपस्थितीमध्ये आज सकाळीच पालघर येथे एक दुधाचा टँकर अडवण्यात आला आहे. गुजरातहून मुंबईच्या दिशेने जाताना पालघरमधील दापचरी येथे हा टँकर अडवण्यात आला आहे.