मगरी आणि मानवी मग्रुरी

    दिनांक  16-Jul-2018   गल्लीतले कुत्रे खूप भुंकतात. पिसाळल्यासारखे वागतात. कोणाचाही चावा घ्यायला मागे-पुढे बघत नाहीत, म्हणून त्यांना चक्क खाण्यातून विष कालवून दिल्याचे धक्कादायक प्रकार अनेकदा आपण वाचतो-पाहतो. ती माणसं नसली तरी मुकी जनावरंच शेवटी पण, माणसाला आपला राग इतका अनावर होतो की, तो अशा निर्जीव जीवांच्या जीवावरच उठतो. पशू-मानव संघर्षांच्याही अशाच कथा आपल्या वेळोवेळी नजरेत येतात. पण, इंडोनेशियामध्ये घडलेल्या एका घटनेने या सगळ्याची परिसीमाच ओलांडली आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण, तिथे लोकांनी १०-२० नव्हे तर तब्बल २९२ मगरींची सामूहिक कत्तल केली. विशेष म्हणजे, या मगरी नैसर्गिक जलाशयातील नव्हत्या किंवा त्यांचा कोणाला थेट त्रासही नव्हता. या मगरी एका कृत्रिम पैदास केंद्रात जन्मलेल्या...वाढलेल्या... त्यांचे संगोपन करणारीही माणसंच. पण, केवळ एका माणसाचा त्या मगरींनी बळी घेतला म्हणून अख्खे गावच्या गाव या मगरींना अतिशय निर्घृणपणे संपवून मोकळे झाले. मगरींच्या या कृत्रिम पैदास केंद्रात एक माणूस चाऱ्याच्या शोधात आत शिरला. अनवधानाने तो मगरींच्या तावडीत सापडला आणि मग काय, या मगरी त्याच्यावर तुटून पडल्या. त्यांनी त्याचे लचके तोडले आणि त्याचा मृत्यू झाला. यामध्ये साहजिकच त्या माणसाच्या चुकीनेच त्याच्यावर ही दुर्देवी वेळ ओढवली. यानंतर गावकऱ्यांनी संबंधित केंद्राच्या मालकाकडे नुकसान भरपाईची देखील मागणी केली. प्रकरण पोलिसांपर्यंत गेले आणि गावकऱ्यांनी या पैदास केंद्राला विरोध केला. नुकसान भरपाईचे आश्वासन मिळाल्यानंतरही गावकऱ्यांचे पित्त खवळलेलेच होते. त्याच्या रोषात हे गावकरी मगरींच्या पैदास केंद्रात झुंडीने घुसले. भाले, चाकू घेऊन त्यांनी मगरींवर सपासप वार केले. लहान-मोठी अशी एकही मगर त्यांच्या पाशवी हल्ल्यातून सुटली नाही. अवघ्या काही मिनिटांत मगरींचा जलाशय त्यांच्याच रक्ताने लाल झाला. एका माणसाच्या बदल्यात तब्बल २९२ मगरींचे मुडदे निर्दयीपणे पाडले गेले. का? तर फक्त रागापायी... असुरक्षिततेची भावना किती भीषण रूप धारण करू शकते, त्याचेच हे उदाहरण. माणूस आधी आपल्या गरजेपोटीच अशा प्राण्यांना जवळ करतो आणि मग अशी काही घटना झाली की, त्यांचाच गळा चिरायला मागेपुढेही धजावत नाही. तेव्हा, मानवी मग्रुरीचे हे बळी कधी थांबणार, हाच प्रश्न हतबलतेने उपस्थित होतो.

 

अकलेचे खड्डे...

 

आपल्या वारंवार केलेल्या मागण्या मान्य होत नसतील, तर शेवटी खळ्ळखट्ट्याक करून तोडफोड करायची, ही मनसेची दरवेळेची राड्याची (सभ्य शब्दांत म्हणे हे आंदोलन!) स्टाईल. कालही सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नवी मुंबईतील तुर्भे कार्यालयाची अशीच तोडफोड मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली. सायन-पनवेल महामार्गावरील खड्डे त्वरित बुजवावे, ही मनसेची मागणी अगदी रास्त. कारण, या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढून हे खड्डे मृत्यूचा सापळा ठरत आहेत. त्यात पावसाळ्यात झालेली रस्त्यांची चाळण आणि एकूणच दुर्दशेवर सरकारचे, प्रशासनाचे झालेले अक्षम्य दुर्लक्षही याला कारणीभूत आहेच, पण म्हणून थेट सरकारी कार्यालयांची अशी तोडफोड करून काय साध्य होणार? कारण, यामध्ये सर्वोपरी नुकसानीचा भुर्दंड सरकार तिजोरीतूनच भरला जाणार आणि अर्थात तोही पैसा आपण कररूपी जमा केलेलाच. त्यामुळे अशाप्रकारे सरकारी कार्यालयांची नासधूस करून रस्त्यावरील खड्डे बुजणार आहेत का, हाच सर्वात मोठा प्रश्न. निवडणुकीला अवघे एक वर्ष असताना, राजसाहेबांकडे जनतेसमोर मतांचा जोगवा मागायला कुठलेही ठोस मुद्दे नाहीत. त्यांच्या पक्षाची ब्ल्यू प्रिंट कुठे, कधी प्रिंट झाली अथवा नाही, याचा तर कुणाला मागमूसही नाही. नाशिक नगरीच्या विकासाचा केलेला फुगाही कधीच फुटला. त्यामुळे मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांच्या विक्रीवर न्यायालयाने परखड मत मांडल्यानंतरही मनसेने लगोलग फुशारक्या करत मल्टिप्लेक्सवाल्यांना दमदाट्या केल्या आणि ‘कृष्णकुंज’वर भेटीगाठीतून ‘आम्हीच हा प्रश्न मिटविला’ म्हणून स्वतःची पाठ थोपटवून घेतली. त्यातच राज यांच्याशिवाय पक्षाला कुणी वाली नाही. शिशिर शिंदेही मनसे सोडून स्वगृही परतलेच. तेव्हा, एकूणच मनसेच्या गोटात सर्व काही आलबेल नाहीच. त्यातच हल्ली अमित ठाकरेही राजकारणात सक्रिय होणार वगैरे बातम्याही नुकत्याच झळकल्या. पण, जिथे बापाचे आगगाडीचे इंजिनच वेग घेत नाही, तिथे मुलाचे डब्बे ढकलले तरी कसे जाणार? तेव्हा, केवळ तोडफोड, मारामारी करून खड्ड्यांचा प्रश्न तरी किमान सुटणारा नाही, हे मनसेने त्यांनी यापूर्वी केलेल्या आंदोलनातून शिकायला हवे. कारण, प्रश्न तेवढ्यापुरते जरी मार्गी लागत असले, तरी त्याचा कायमस्वरूपी तोडगा हा नेहमीच चर्चेतून आणि सामोपचारानेच निघेल, हे विसरता कामा नये.