२५ कोटी कुणी आणले; कुणी खर्च करू दिले नाहीत, हे जनता जनार्दन जाणते!

16 Jul 2018 12:05:09

आ. सुरेश भोळे यांचे विरोधकांना खणखणीत उत्तर

 
 
जळगाव :
शहराच्या विकासासाठी २५ कोटी कुणी आणले, कुणी खर्च करू दिले नाही हे सर्वश्रेष्ठ जनता जनार्दन जाणते. मतपेटीतून ते आपला कौल देतीलच. भाजपावर खोटे आरोप करणार्‍यांनी आधी आत्मपरीक्षण करावे. विरोधकांनी शहराच्या विकासासाठी गेल्या काही वर्षात काय केले आणि काय केले नाही? हे जनता चांगलीच ओळखून असल्याचे प्रतिपादन भाजपाचे जळगाव जिल्हा महानगराध्यक्ष आ. सुरेश भोळे यांनी केले.
 
 
भाजपा उमेदवारांच्या प्रचारमोहिमेचा शुभारंभ झाल्यानंतर ‘तरुण भारत’ शी बोलताना आ. भोळे म्हणाले की, जळगाव शहराच्या विकासासाठी २५ कोटी रुपये मिळावेत, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्र्यांना मी स्वतः केली होती. त्यांनी त्याची तातडीने दखल घेतली आणि निधी वर्ग केला. परंतु, महापालिकेतील सत्ताधारी खाविआने हा निधी खर्चच होऊ दिला नाही. भाजपाने निधी आणला आहे, त्यामुळे विकासकामे झाल्यास त्याचे श्रेय भाजपालाच मिळेल; याची भीती त्यांच्या मनात घर करून होती. त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी जळगावचे नुकसान केले. वेळीच २५ कोटी खर्च झाले असते तर अजून ५० कोटी रुपये देण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते.
नगरसेवकांची घरवापसी
राष्ट्रवादीचे नेते आ. अजित पवार काहीही म्हणोत, पण मूळ भाजपाचे असलेल्या नगरसेवकांची आता घरवापसी झाली आहे. आबा कापसे सुरुवातीपासूनच भाजपा विचारांचे असल्याचे आ. भोळे यांनी सांगितले.
 
‘ते’ प्रयत्न उधळून लावल्यानेच खाविआ भाजपाला पाण्यात पाहते
मुख्यमंत्र्यांनी शहरासाठी २५ कोटी रुपये देताना ते विकासकामांसाठी वापरावेत, अशी सूचना केली होती. परंतु, सत्ताधार्‍यांच्या मनात भलतेच शिजत होते. त्यांना या रकमेतून हुडकोची कर्जफेड करायची होती. त्यांचा हा प्रयत्न आम्ही उधळून लावला म्हणून सत्ताधार्‍यांचा भाजपावर राग आहे.
 
 
भाजपाला हवा जळगाव शहराचा विकास
नूतनीकरण झालेल्या महात्मा गांधी उद्यानाच्या उद्घाटनप्रसंगी जळगाव शहराच्या विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन आपण व्यासपीठावरून केले होते. त्यावेळी ना. गिरीश महाजन, माजी मंत्री सुरेशदादा जैन हेदेखील उपस्थित होते. विकास प्रक्रियेत अकारण वाद नकोत ही आमची भूमिका आहे. भाजपाची सत्ता आल्यास वर्षभरात महापालिका कर्जमुक्त केली जाईल. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीत मैत्रीपूर्ण लढत ठेवावी. आरोप करणार्‍यांना भाजपा नक्कीच प्रत्युत्तर देईल, असा इशाराही आ. भोळे यांनी दिला.
 
Powered By Sangraha 9.0