आणि बुद्ध हसला...

    दिनांक  13-Jul-2018   


 

माणसाला माणूस म्हणून समजणारे बुद्धविचार आम्ही म्हणू तोच धर्म-अन्य कोणताही नाही, असे म्हणणाऱ्या, सदैव कोणाच्या तरी रक्तासाठी चटावलेल्या दहशतवाद्यांना कळेल का? स्वतःच्या चेहऱ्याच्या पूर्ववतीकरणानंतर कदाचित बुद्ध हसला असेल, तो आज दैत्य झालेल्या माणसाच्या (दहशतवाद्यांच्या) माणूसपणाचे पूर्ववतीकरण झाल्यानंतरही हसेल का?

 

भारताच्या पवित्र भूमीतून अवघ्या जगाला करुणा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धाचेही कोणी शत्रू असू शकते? मात्र, २००१ साली अफगाणिस्तानमधील बामियान आणि त्यानंतर २००७ साली पाकिस्तानच्या स्वात खोऱ्यातील बुद्ध मूर्तीचे केलेले भंजन पाहता, शुद्धोदन अन् मायादेवीच्या गौतमाचेही शत्रू असल्याचे दिसते. पण, ज्या गौतमाने अडीच हजार वर्षांपूर्वी समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी आपल्या तत्त्वज्ञानाचे अमृत दिले, ते काही मूर्तिभंजनासारख्या एखाद्या राक्षसी कृत्याने झाकोळणारे वा नष्ट होणारे नव्हते. ते तत्त्वज्ञान तर प्रत्येक व्यक्तीला, प्राणीमात्राला, झाडे-वेली-फुलांना आपल्यासोबत घेऊन अविरत वाहणारे होते, ते कसे कोणापुढे हार मानेल? म्हणूनच आज पाकिस्तानच्या स्वात खोऱ्यातील भंगलेल्या बुद्धमूर्तीच्या पुर्ववतीकरणानंतर बुद्धदेखील हसला असेल, असेच म्हणावेसे वाटते.

 

जगभरात दहशतवाद्यांच्या कृष्णकृत्यांनी थैमान घातलेले असतानाच साधारण ११ वर्षांपूर्वी पाकिस्तानी तालिबान्यांनी डायनामाईटच्या स्फोटाने स्वात खोऱ्यातील बुद्धमूर्ती उडवून देण्याचा प्रयत्न केला. विस्फोटकांच्या स्फोटाने संपूर्ण बुद्धमूर्तीचे दहशतवाद्यांच्या कुटील कारस्थानाप्रमाणे तुकडे-तुकडे झाले नाहीत, परंतु बुद्धाच्या चेहऱ्याचा मात्र खेळखंडोबा केला. याशिवाय तिथेच असलेल्या बुद्धमूर्तीव्यतिरिक्त अन्य एक प्रतिमाही तुकड्या-तुकड्यात विखुरली. बुद्धमूर्ती भंजनाच्या या घटनेलाच स्वात खोऱ्यातल्या दहशतवादाची सुरुवात मानले जाते. त्यानंतर कितीतरी वर्षे तालिबान्यांनी घातलेल्या हैदोसाच्या भीतीमुळे कोणीही बुद्धमूर्तीच्या पूर्ववतीकरणाचे प्रयत्न केले नाहीत. बौद्ध धर्माचे जाणकार परवेझ शाहिन मूर्तिभंजनाच्या घटनेबद्दल तर असेही म्हणतात की, “तेव्हा मला असे वाटले की, त्यांनी (पाकिस्तानी तालिबानी) माझ्या पित्याचीच जणू काही हत्या केली. त्यांनी (पाकिस्तानी तालिबानी) माझ्या संस्कृती, इतिहासावरच हल्ला केला.”

 

दरम्यानच्या काळात करण्यात आलेल्या तालिबानविरोधी लष्करी कारवाईनंतर आता स्थानिकांनीच केलेल्या प्रयत्नांमुळे इथे पुन्हा एकदा बुद्धमूर्तीचे पूर्ववतीकरण करण्यात आले. २०१२ साली प्रथम ही मूर्ती पूर्ववत करण्यासाठी काम सुरु करण्यात आले, जे २०१६ सालापर्यंत सुरु होते. इटली सरकारने यासाठी पुढाकार घेत स्वात खोऱ्यातील सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी गेल्या पाच वर्षांत जवळपास २० कोटींचा निधी दिला. इटलीच्या पुरातत्त्व विशेषतज्ज्ञांनी बुद्धमूर्तीच्या दुरुस्तीनंतर असे सांगितले की, “कमलासानावर बसलेली २० फूट उंचीची ही बुद्धमूर्ती अगदीच पूर्वीसारखी दिसत नाही. आम्ही मुद्दामच असे केले, कारण लोकांना हे समजले पाहिजे की, दहशतवाद्यांसारख्या नतद्रष्ट माणसांनी कधी काळी या मूर्तीची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला होता.”

 

स्वात खोऱ्यातील बुद्धमूर्तीच्या पूर्ववतीकरणानंतर आता विशेषतज्ज्ञांना येथे पर्यटकांची रीघ लागण्याचीही आशा वाटते, जे इथल्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत आवश्यक आहे. विशेषज्ज्ञांच्या मते, शिक्षणाच्या प्रसाराने स्थानिक लोकांमध्ये स्वातच्या संस्कृतीचे महत्त्व समजावून सांगितले. जेथे कधी या बुद्धमूर्तीभंजनाला योग्य समजले जाई, तिथे आता परिस्थिती बदलत आहे. बुद्धमूर्तीच्या पूर्ववतीकरणाबरोबरच स्वातची आपली संस्कृतीदेखील आपल्या जुन्या स्वरुपातच नव्याने रुजेल, अशी आशाही व्यक्त केली जात आहे.

 

इटलीच्या पुरातत्व विशेषतज्ज्ञ लुका मारिया यांनी बुद्धमूर्ती आणि बौद्ध धर्माबद्दल सांगितले की, “चौथ्या शतकाचा काळ हा स्वात खोऱ्यात बौद्ध धर्मासाठीचा सुवर्णकाळ होता. तथापि, दहाव्या शतकात मात्र बौद्ध धर्माचे इथले अस्तित्व नष्ट झाले. अन्य धर्मांनी त्याची जागा घेतली. कधी काळी इथे एक हजारपेक्षा अधिक बौद्ध मठ होते, पण काळाच्या प्रवाहात त्यांचेही नामोनिशाण मिटले.” आताच्या बुद्धमूर्तीच्या पूर्ववतीकरणानंतर मात्र इथे बौद्ध धर्म पुन्हा एकदा रुजेल का? हा प्रश्न विचारावासा वाटतो. माणसाला माणूस म्हणून समजणारे बुद्धविचार आम्ही म्हणू तोच धर्म-अन्य कोणताही नाही, असे म्हणणाऱ्या, सदैव कोणाच्या तरी रक्तासाठी चटावलेल्या दहशतवाद्यांना कळेल का? स्वतःच्या चेहऱ्याच्या पूर्ववतीकरणानंतर कदाचित बुद्ध हसला असेल, तो आज दैत्य झालेल्या माणसाच्या (दहशतवाद्यांच्या) माणूसपणाचे पूर्ववतीकरण झाल्यानंतरही हसेल का?