मानवी नैसर्गिक प्रेरणा आणि नैतिकता!

    दिनांक  11-Jul-2018   
माणसाच्या नैसर्गिक प्रेरणा या, खरेतर त्याच्या भुका आणि गरजांतूनच येत असतात. त्या सार्‍यांकडेच आपण नैतिकतेच्या भंपक चष्म्यातून बघत असतो. त्यातून मग दंभाचार निर्माण होत असतो. मानवी नैसर्गिक प्रेरणा जितक्या नैसर्गिकच असतील तितक्या त्या निकोप असतात. समूहाने राहताना मानवी गरजांचा छेद गेल्याने संघर्ष निर्माण होतात आणि मग समूहाची चौकट भंगते. ती तशीच एकसंध आणि म्हणून शुचिर्भूत राहावी यासाठी मग समाजपुरुष काही नियम बनवितात. मानवी प्रेरणांचे नियंत्रण करण्याचे ते कायदेच असतात. काही अश्लाघ्य, अनैतिक असं घडू नये आणि सामाजिक शुचिता भंग पावू नये अन्‌ त्यातून संघर्ष निर्माण होऊ नये, म्हणून ही काळजी घेतली जाते. साधनसंपत्तीवर सर्वांचा समान अधिकार, हे निसर्गाचे सूत्र आहे. ताकदीच्या बळावर त्यात बदल करणारे साधन आणि संपत्तीवर ताबा मिळवितात. त्यांना त्यावर अधिकार हवा असतो आणि मग त्यातून संघर्ष उभे राहतात. मानवी इतिहास अशा संघर्षांनी आणि रक्तपातांनी भरलेला आहे. स्त्रियांसाठी (म्हणजे मादी) युद्धे झालेली आहेत. गोधनही पळविले जायचे. मग त्यांच्या ताबेदारीचे नियम ठरविण्यात आले आणि संघर्ष टाळले गेले. प्रत्येकाच्या वाट्याला एक स्त्री, हे तत्त्व पाळण्यासाठी मग विवाह संस्था अस्तित्वात आल्या. त्याआधीचा इतिहास त्या संदर्भातला निसर्ग पाळण्याचाच होता. हवी ती स्त्री आणि हवा तो पुरुष या जंगली अवस्थेतून शारीरसंबंधांकडे विवेकी भूमिकेने बघण्याइतपत माणूस सुसंस्कृत झाला आणि मग त्याने ते संबंध पूर्ण नैसर्गिक आणि निकोप ठेवले. अर्थात, त्यावर बंधने नव्हती. घरी आलेल्या पाहुण्याची स्त्रीसंगाची भूकही भागविण्याची जबाबदारी यजमानांची आणि म्हणून मग ती यजमानीनने भागवायची, इतके सरळ ते होते. त्यातूनही विसंगती निर्माण होऊ लागल्या. मुळांत वंश, शुद्ध रक्त ही भावना प्रबळ झाली आणि त्यातून विवाह संस्थेचा उदय झाला. लिंग आणि योनीनिष्ठा नैतिकतेचे निकष झाले. बंदी म्हटले की लोक संधीच्या शोधात असतात. विवाह हे बंधन आले अन्‌ मग त्यातून चोरट्या संबंधांचीही एक परंपरा निर्माण झाली. वारांगनांची जमात त्यातून निर्माण झाली, नव्हे, आपल्या गरजांसाठी देवदासींसारख्या प्रथा निर्माण करून गणिका निर्माण केल्या गेल्या...
 
दारू, अमली पदार्थ, वारांगना आणि जुगार हे अनैतिक ठरविण्यात आले. पुढे ते पाप, गुन्हा ठरविले गेले. ते संपविण्याचे, रोखण्याचे कायदे करण्यात आले. त्यांच्या अंमलबजावणीसाठी गुन्हेगाराला शिक्षाही करण्यात येऊ लागल्या. तरीही या गोष्टी काही संपलेल्या नाहीत. याचा अर्थ त्या समाजाची गरज आहे, असा घ्यायचा का? आणि घेतला तर त्यात चूक ते काय? समाजातील गुन्हे बहुतांश या गोष्टीतून निर्माण होत असतात. त्या रोखण्यासाठी खूप मोठी यंत्रणा कामी लागते आणि तरीही त्या रोखल्या जात नाहीत. यंत्रणा मात्र भ्रष्ट होते... जगाभरात हे असेच आहे. त्यामुळे जगात काही देशांत वेश्याव्यवसाय कायदेशीर करण्यात आला. तिकडे बर्‍यापैकी कटकटी संपल्याचा अनुभव आहे. नाहीतर या सार्‍याच बाबतीत ढोंगाचा दंभाचारच सुरू असतो. जे नाक वर करून खूप ओरड करतात ते ‘हमने उनकोभी चुपचुप के आतें देखा इन गलियोंमे...’ या गटातले असतात. ‘गब्बर के तापसे सिर्फ एकही बचा सकता है, और वो है खुद गब्बर!’ या न्यायाने गल्लीतल्या गुंडांकडून राखी बांधून घेण्याचे प्रकार असतात. तसेच हेही. कायद्याने रोखले जात नाहीत म्हणून त्यांना कायदेशीर करून टाकायचे. आयपीएलमध्ये खेळला जाणारा सट्‌टा आणि त्याच्या कहाण्यांनी क्रिकेटचा इतिहास काळा झाला आहे.
 
 
 
सर्वोच्च न्यायालयाने क्रिकेट आणि सट्‌टा याचा विचार करण्यासाठी विधिज्ञांची समिती नेमली. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी. एस. चौहान यांच्या नेतृत्वाखालील या समितीने आपला अहवाल सरकारला सादर केला. त्यात जुगार, सट्‌टा वगैरे नियमित केले जावेत, अशी शिफारस करण्यात आली आहे. ते कसे करायचे याचे मार्गदर्शनही करण्यात आले आहे. अर्थात, या सार्‍याला संदर्भ म्हणून अगदी पौराणिक दाखलेही देण्यात आले आहेत. द्यूत खेळले जात होते आणि त्याला राजमान्यता होती वगैरे. हा सट्‌टा ऑनलाईन करायचा. कॅशलेस असेल तो, त्यावर आयकरदेखील लावला जाईल, असे या न्यायमूर्तींनी सुचविले आहे. त्यातल्या काही तरतुदींची चर्चा करण्यात काही अर्थ नाही. जुगार नियमित करायचा आणि तरीही तो खेळण्यावर निर्बंध लावायचे, हे कसे शक्य आहे? म्हणजे एखाद्याने वर्षभरात किती वेळा जुगार खेळायचा आणि त्याच्या आर्थिक स्थितीनुसार तो किती खेळायचा, यावर निर्बंध असतील, असे या अहवालात म्हटले आहे. ते कसे शक्य आहे? त्यातून पुन्हा या सार्‍याचे नियमन करणारी यंत्रणा भ्रष्ट मार्गी होईल, त्यांना तशी संधी मिळेल.
 
 
हे खरेच आहे की, एखादी गोष्ट करायची नाही म्हटल्यावर हमखास ती करण्याची इच्छा निर्माण होते. त्यातही ‘आम्ही विशेष’ प्रवृत्तीमुळे सामान्यांसाठी जे कायदे असतात ते आपल्याला लागू होत नाहीत, असे मानून चालणारा एक वर्ग समाजात असतोच. आजकाल तर या ‘आम्ही खास’ गटात आपण असावे, ही प्रवृत्ती सार्वत्रिक झालेली आहे. त्या अर्थाने कुणीच सामान्य राहिलेले नाही. कायद्यातून सूट मिळण्याचा विशेषाधिकार असणारी सेलिब्रेटी मंडळी वाढत चालली आहेत. त्यामुळे राजकीय हस्तक्षेप वाढत चालला आणि कायदे क्षीण होत आहेत. क्रिकेटच्या सट्‌ट्याच्या बाबत बोलायचे झाले, तर बेटिंग हा त्या खेळाला धोका आहे असे नाही, मात्र सट्‌ट्याचा हा खेळ करणारे खर्‍या खेळाचा खेळखंडोबा करतात, ही खरी समस्या आहे. तो कायदेशीर केल्याने सट्‌टेवाल्यांना सामन्याचा हवा तो निकाल घडवून घेण्याचे काही कारण असणार नाही.
 
 
जुगार खेळलाच जात नाही, असे नाही. त्यातून बर्बाद होणार्‍यांच्या कहाण्या सांगितल्या जातात, मात्र संयमितपणे तो खेळत राहून रंकाचे राव होणार्‍यांचीही उदाहरणे आहेत. या सार्‍याच गोष्टींकडे आपण अत्यंत भंपक आणि खोटारडेपणाने बघत असतो. दारू आयुष्यात एकदाही प्यायला नाही, असा माणूस सापडणे दैवदुर्लभच आहे. नियमित दारू पिणार्‍यांची संख्याही अफाट आहे. तसे असूनही सारेच काही ‘सुधाकर’ होत नाहीत. जगात आजवर लावण्यात आलेल्या दारूबंदी कोसळल्याची उदाहरणे आहेत. उलट बंदी लावल्यावर दारूचे प्रमाण वाढल्याचेच दिसते. त्यातून भ्रष्टाचार वाढतो आणि दारूचे प्रमाणही वाढते. त्यात नकली दारूचेही प्रमाण मोठे होते अन्‌ महसूल बुडतो, हेच दिसत आले आहे. वर्धा जिल्ह्यातली दारूबंदी असो की मग चंद्रपुरातली. बंदी म्हणजे अनेकांना संधी वाटते. दारू पिणे हे असभ्यांचे लक्षण आहे, असे म्हणणारे सभ्यही छानपैकी पितात आणि ढोंगीपणाने ‘मी नाही त्यातला’ असला आव आणतात. इतक्या प्रचंड प्रमाणात दारू पिणार्‍यांची संख्या असताना त्यातून बर्बाद होणार्‍यांची संख्या किती? दारू अनैतिक असतानाही कुठलेही सरकार परवाने तर देतेच.
 
 
 
जुगार कायदेशीर केला तर फार गजहब होईल, असेही मानणारे एक न्यायाधीश या न्यायाधीश गटात आहेत. त्यांच्या मते, ही वेळ अद्याप आलेली नाही. मटका हा प्रकार गेली कित्येक वर्षे सुरू आहेच. नवा ठाणेदार आला की कडक वातावरण करतो अन्‌ महिनाभराने भावठाव झाला की सगळे सामान्य होते. कारण तो रोखणे शक्य नाही, हे वास्तव स्वीकारण्याची अगतिकताही त्यामागे आहेच. लॉटरी काय आहे मग? तो कायदेशीर जुगारच आहे. दहा ते हजार रुपयांपर्यंतच लॉटर्‍या असतात शासनाच्या. मात्र, कुणी कितीही लॉटर्‍या विकत घेऊ शकतो. जे रोखता येत नाही ते स्वीकारून टाकण्याची माणसाची प्रवृत्ती आहे. सट्‌टा, दारू, वेश्याव्यवसाय रोखता येत नाही, मात्र तो उघडपणे स्वीकारताही येत नाही, ते आमच्या दांभिक नैतिकतेला तडे देणारे असते त्यामुळे हे सगळेच कसे मागच्या दाराने ‘आपले’ केलेले आहे समाजाने. ते खुले केल्याने विकोपाला जाईल असे नाही तर नियंत्रणात येईल. कारण ‘ड्राय डे’ला जास्त प्यावीशी वाटते. नैसर्गिक भावाने आपल्या प्रेरणा स्वीकारल्या तर सोपे होईल.