यावलला एकाच रात्रीत चार घरफोड्या

10 Jul 2018 10:38:45

विस्तारित भागांमध्ये बंद घरात चोरट्यांनी केला हात साफ


 
यावल :
शहरातील विस्तारीत भागात रविवारी मध्यरात्री तब्बल चार घरफोड्या झाल्याने शहरात खळबळ उडाली असून शहरवासीयांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. विस्तारीत भागातील चॉंदनगर मधील ३ व आयशानगरातील १ अशा ४ घरफोड्या झाल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले. हे चौघेही कुटुंबीय घरांना कुलूप लावून बाहेरगावी गेले होते.
 
 
चांदनगरात ७० हजाराचा ऐवज लंपास
चांदनगरातील सैय्यद इरफान निजामुद्दीन हे रविवारी रात्री घराला कुलूप लावून डांगपुर्‍यातील त्यांच्या जुन्या घरी मुक्कामी होते. ते सोमवारी सकाळी घरी परतले असता चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कडी-कोंडा तुटलेला आणि चोरट्यांनी कपाटाची नासधूस करीत व दहा हजाराची रोकडसह पाच हजार रु.ची नाणी आणि १०० ग्रॅम चांदीचे व १५ ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण ७० हजाराचा ऐवज चोरट्यांनी लांबवला आहे.
 
तिघांकडील चोरी? अद्याप अंदाज नाही...
सैय्यद यांच्या घरासमोरील अमृत सुभान पटेल तसेच शेख अमिन शेख यासीन हे देखील बाहेर गावी गेले होते. या दोघांकडे तर आयशानगरमधील रहिवासी शेख मुशीर यांच्याकडील घरफोडीबाबत आजूबाजूच्या रहिवाशांनी घरमालकांसह पोलिसांना माहिती दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश तांदळे, हवालदार गोरख पाटील यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. तिन्ही कुटुंबीय परतल्यावर किती ऐवज लंपास झाला यासंदर्भात उलगडा होणार आहे.
 
Powered By Sangraha 9.0