आणि मराठी उद्योजक पोरका झाला...

    दिनांक  10-Jul-2018   


शनिवारी ७ जुलै रोजी माधवरावांचे निधन झाले. खर्‍या अर्थाने मराठी उद्योजक पोरका झाला. मराठी उद्योजकांनी आपल्या व्यवसायाची करोडो रुपयांमध्ये उलाढाल करणे, हीच सतत चैतन्यदायी असणार्‍या माधवरावांना खरी श्रद्धांजली ठरेल.

हमारे यहां, मुनीम, चीफ केमिस्ट, चीफ अकाऊटंट आऊ बध्धा मानसों घाटी छे. एना कारण एम, के आ माणसों क्यारेंपण हमारा कम्पिटीतर थवाना नथी. २०० कोटींची उलाढाल असलेल्या या गुजराती कारखानदाराचं हे वाक्य त्यांच्या कानी शिसं ओतल्यासारखं गेलं. मात्र, ते स्तब्ध राहिले. त्या गुजराती कारखानदाराला काहीही उत्तर न देता, तो सत्तरीतला तरुण तिथून निघून गेला. या तरुणाला शब्दांतून नव्हे, तर कृतीतून उत्तर द्यायचं. घाटी अर्थात मराठी माणूस हा प्रामाणिकपणामुळे कोणत्याही क्षेत्रात टिकून आहे. त्याने तलवार गाजवली, आता तो तराजू गाजवेल असे काहीसे विचार त्यांच्या मनात रुंजी घालू लागले. आपले विचार त्यांनी आपल्या जवळच्या काही उद्योजक मित्रांना सांगितला आणि त्यातून उभा राहिला ‘सॅटर डे क्लब ग्लोबल ट्रस्ट’. ही संस्था उभारणारे ते तरुण उद्योजक म्हणजे इंजि. माधवराव भिडे.

 

नानासाहेब भिडे व सरस्वती भिडे या दाम्पत्याच्या पोटी माधवरावांचा जन्म झाला. नानासाहेब हे पेशाने शिक्षक होते. ते इतिहासाचे जाणकार होते. प्रामाणिकपणा आणि कष्टाळूपणा हे दोन गुण कवचकुंडलांसारखे आयुष्यभर त्यांच्या सोबत होते. तत्व आणि शिस्त म्हणजे त्यांच्यासाठी प्राणवायूच जणू. त्यांच्या आई या प्रचंड मेहनती कष्टाळू आणि उद्यमशील वृत्तीच्या. सावरकरांवर त्यांची अढळ निष्ठा होती. या दोघांचे गुण माधवरावांमध्ये तंतोतंत उतरले. माधवरावांनी सिव्हील इंजिनियरिंगमध्ये ७४ टक्के तर मिळविलेच, पण ‘काँक्रीट टाईप पुलाचा जनक’ अशी बीरुदावली देखील पुढच्या कारकिर्दीत मिळवली.

 

रेल्वेमध्ये नोकरीला लागल्यानंतर त्यांनी रेल्वे कर्मचार्‍यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ’ललित कला मंडळा‘ची स्थापन केली. १९६५ मध्ये या मंडळातर्फे ‘तीन चोक तेरा’ हे नाटक सादर करण्यात आले. त्यामध्ये माधवरावांनी नायकाची भूमिका केली होती. मध्य रेल्वेमध्ये सांस्कृतिक संस्था स्थापना करुन त्यांनी सात नाटके, वग, मासिक, अनेक कलास्पर्धा घडविल्या. तत्कालीन रेल्वेमंत्री कै. मधु दंडवते यांच्या कडून त्याकाळात तब्बल एक कोटी रुपयांचे अनुदान मिळवून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सातशे आसनव्यवस्था असलेले वातानुकूलित सभागृह उभारले. रेल्वेमधील अंतर्गत राजकारणामुळे परदेश दौर्‍यावर त्यांच्या कनिष्ठ अधिकार्‍यांना पाठविले जाई. मात्र माधवरावांनी स्वखर्चाने आपल्या सुट्ट्यांचा वापर करुन १२८ दिवसांत तब्बल २८ देशांचा प्रवास केला. स्थळ- तंत्रज्ञान- रेल्वे असा तिहेरी उद्देश त्यामागे होता. इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, स्वित्झर्लंड, स्वीड्न, नेदरलँड, नॉर्वे, फ्रान्स, चीन, जपान इत्यादी महत्त्वाच्या देशांचा त्यात समावेश होता. माधवराव त्यावेळी पन्नास वर्षांचे होते. पन्नासव्या वर्षीसुद्धा तांत्रिक ज्ञान मिळविण्याची त्यांची आवड पाहून इटलीचा रेल्वे चेअरमनसुद्धा चकित झाला. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत दिवा-डोंबिवली-वसई हा रेल्वे प्रकल्प पूर्ण केला. वान्द्रे-खार या हार्बर लाईनचा अंधेरीपर्यंत विस्तार करण्यासाठी ‘प्री स्ट्रेस्ड काँक्रीट’ पद्धतीचा पूल रेल्वे इतिहासात पहिल्यांदाच बांधला गेला. त्याचे जनक माधवराव होते.

 

१९८९ साली भारतीय रेल्वेला रामराम ठोकला आणि इमारत, पूल, कारखाना यांचे मूल्यांकन करणार्‍या भिडे असोसिएट्सची स्थापना केली. त्यावेळी माधवरावांचे वय अवघे ५८ वर्षे होते. काही वर्षांतच संपूर्ण भारतात भिडे असोसिएट्सच्या १५ शाखा झाल्या. याच वर्षी त्यांनी ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ब्रीज इंजिनियर्स’ या संस्थेची स्थापना केली. कमी खर्चात सुदृढ, सुबक आणि टिकाऊ बांधकाम कसे करावे, याचे मार्गदर्शन ही संस्था देशी-विदेशी अभियंत्यांना देते.

 

सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे भिडेंनी सन २००० साली ’सॅटर डे क्लब ग्लोबल ट्र्स्ट‘ या संस्थेची स्थापना केली. अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतपत त्यावेळी त्यांचे सहकारी-उद्योजक-मित्र या संस्थेचे सदस्य होते. माधवरावांनी महाराष्ट्र पिंजून काढला. मराठी उद्योजकांना एकत्र आणलं. त्यांच्यात व्यवसायाची देवाणघेवाण सुरु झाली. एक आर्थिकदृष्ट्या सशक्त मराठी समाज उभारण्याचे त्यांचे स्वप्न आकारास येऊ लागले. आज सॅटर डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या ४५ शाखा महाराष्ट्रात कार्यरत आहेत. तर १७०० हून अधिक मराठी उद्योजक याचे सदस्य आहेत. ’एकमेका साह्य करु, अवघे होऊ श्रीमंत‘ हे घोषवाक्य आता खरं होऊ पाहत आहे.

 

‘बाबूमोशाय, जिंदगी बडी होनी चाहिये, लंबी नहीं’ ‘आनंद’ चित्रपटातील राजेश खन्नाचा हा संवाद कायमचा मनात घर करुन गेला. आयुष्याचं सार त्या संवादामध्ये दडलेलं आहे. ‘आयुष्य किती जगलो यापेक्षा ते कसं जगलो हे महत्त्वाचं’. भिडेंच्या बाबतीत हे तंतोतंत लागू व्हायचं. सकाळी ९ ची वेळ असो वा रात्री ९ ची वेळ. तो माणूस कधीच थकलेला दिसत नसे. स्वत:ला नेहमीच ८५ वर्षांचे तरुण म्हणूनच ओळख करुन द्यायचे. तरुणांना लाजवेल अशी ऊर्जा, उत्साह त्यांच्या ठायी नेहमीच जाणवत असे. तुमच्या या तारुण्याचं रहस्य काय? असा प्रश्न केल्यावर एकच उत्तर असे, “तुम्ही सगळे मराठी तरुण उद्योजक.” हा ८५ वर्षांचा तरुण म्हणजे मराठी बिझनेस नेटवर्किंगचे पितामह आणि हजारो मराठी उद्योजकांना एकत्र आणणार्‍या ‘सॅटर डे क्लब ग्लोबल ट्रस्ट’चे संस्थापक माधवराव भिडे ही वेगळीच ओळख महाराष्ट्राला आता झाली होती. आज माधवराव भिडेंची जयंती. शनिवारी 7 जुलै रोजी माधवरावांचे निधन झाले. खर्‍या अर्थाने मराठी उद्योजक पोरका झाला. मराठी उद्योजकांनी आपल्या व्यवसायाची करोडो रुपयांमध्ये उलाढाल करणे, हीच सतत चैतन्यदायी असणार्‍या माधवरावांना खरी श्रद्धांजली ठरेल.

-प्रमोद सावंत