ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आभा परिवर्तनवादी संस्थेचा पुढाकार

01 Jul 2018 22:14:48





टिटवाळाः गुणवत्ता असूनही केवळ आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याने ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणासाठी आजही खडतर कष्ट करावे लागतात. प्रसंगी शिक्षणाची ही वाट परिस्थितीपुढे हतबल होत अर्धवट सोडावी लागते. अशा मुलांचा हा संघर्ष कमी करण्याच्या हेतूने आभा परिवर्तनवादी संस्था मागील पाच वर्षांपासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ’खारीचा वाटा हा उपक्रम चालू केला आहे.

गेल्या वर्षांपासून चालू केलेल्या ‘खारीचा वाटा या उपक्रमा अंतर्गत यंदा खेड, महाड आणि पोलादपूरमधील दहा दुर्गम शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिले गेले. गेल्या वर्षी ११० तर यंदा २५० विद्यार्थ्यांना आभाच्या माध्यमातून हा खारीचा वाटा देण्यात आला. आपले मित्र आणि स्वतःचे पैसे असा निधी जमवून कार्यकर्त्यांनी हे साहित्य संस्थेच्या माध्यमातून मुलांना दिले. फक्त साहित्यच नाही तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महिन्यातून एकदा शाळांमध्ये विविध विषयांवर व्याख्याने आणि चर्चासत्र यापुढे संस्थेतर्फे ठेवण्यात येणार आहे.

मुंबईतील ही तरुणांची संघटना सतत विद्यार्थ्यांच्या उत्कर्षासाठी प्रयत्नशील असते. ज्याला शक्य आहे, त्याने जरी एका विद्यार्थ्याच्या खर्चाची जबाबदारी उचलली तरी या मुलांच्या यशाचा सुगंध अवघ्या विश्वात दरवळेल, अशी खात्री संस्थेचे कार्यकर्ते शशांक भुवड यांनी साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात व्यक्त केली. मदतीसाठी इच्छुक असलेल्या दानशूर व्यक्तींनी पुढील क्रमांकावर संपर्क करावा : अविनाश पाटील : 8080171430

Powered By Sangraha 9.0