एसटी संप चिघळला, १९ शिवशाही फोडल्या

09 Jun 2018 23:23:51




मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवार दि. ८ तारखेच्या मध्यरात्रीपासून अचानक सुरू केलेला संप शनिवारी चिघळला. तसेच, याला हिंसाचाराचेही गालबोट लागले. एसटी महामंडळाने नुकत्याच वाजतगाजत सुरू केलेल्या 'शिवशाही’ बसेसच्या १९ गाड्या राज्यात विविध ठिकाणी फोडल्या गेल्या. तसेच, महामंडळाकडून शेकडो कर्मचाऱ्यांचे निलंबनही करण्यात आले. या साऱ्यामुळे राज्यभरातील हजारो प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

 

शुक्रवार दि. ८ रोजी सुरू झालेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरूच आहे. शनिवारीही राज्यातील अनेक ठिकाणच्या बसडेपोंमधून गाड्याच बाहेर निघाल्या नाहीत. पगारवाढीसह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन छेडले आहे. सध्या शाळांच्या, महाविद्यालयांच्या सुट्ट्या संपण्याचा हंगाम असून, यामुळे अनेकजण सुट्ट्या संपवून, आपापल्या गावी परतत आहेत. मात्र, या संपामुळे अशा हजारो नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. अचानक काम बंद करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात एसटी प्रशासनानेही कारवाईचा बडगा उगारला आहे. राज्यभरात शेकडो कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले असून, दुसरीकडे संपकरी संघटनांनीही निलंबनं झाली तरी संप सुरूच ठेवू, अशी टोकाची भूमिका घेतली आहे. हे सगळे होत असले तरीही शिवशाही बस आणि शिवसेनाप्रणीत वाहतूक संघटनेकडून मात्र वाहतूक सुरू होती.

 

१८ कोटींचा महसूल बुडाला!

 

शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी सुरू असलेल्या संपामुळे एसटी महामंडळाचा सुमारे १८ कोटी रुपयांचा महसूल अक्षरशः बुडाला. दिवसभरात महाराष्ट्रातील २५० आगारांतून बसच्या सुमारे २० टक्के फेऱ्याच होऊ शकल्या. राज्यातील केवळ २५ आगार पूर्ण क्षमतेने सुरू होते, तर १५१ आगारांमध्ये अंशतः वाहतूक सुरू होती. ९७ आगारांतून दिवसभरात एकही बसची फेरी झाली नाही. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, या जिल्ह्यांना मोठया प्रमाणात संपाचा फटका बसला. तुलनेने मराठवाडा आणि विदर्भात ४० टक्के वाहतूक सुरू होती, असे एसटी महामंडळातील सूत्रांनी सांगितले.

Powered By Sangraha 9.0