एसटी संपाचा वसईत परिणाम नाही तर पेण आगारातून जादा बसेस

    दिनांक  08-Jun-2018पेण/खानिवडे : पगारवाढीसह इतर विविध मागण्यांसाठी मध्यरात्रीपासून अचानक सुरू केलेल्या एसटी संघटना कर्मचाऱ्यांच्या संपाचा वसई तालुक्यात कोणताच परिणाम जाणवला नसून, दिवसभर वसई ग्रामीण भागात सेवा सुरळीत सुरू होती. भागातील शिरसाड, खानिवडे, अंबाडी नाका, वसई फाटा, विरार फाटा, नालासोपारा फाटा, कामण आदी मुख्य नाक्यांवर सेवेच्या फेऱ्या सुरळीत सुरू असल्याने प्रवाशांना संप आहे याची कुणकुणही लागली नाही.

 

आधीच डबघाईला आलेल्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप करण्याऐवजी आपल्यामार्फत सुविधा चांगल्या कशा देता येतील याचा विचार करावा. अन्यथा सध्या लांब पल्ल्याचा प्रवास सोडता, खाजगी वाहने चांगली व वेळेवर प्रवासाच्या सुविधा पुरवत असल्याचे प्रवासी सांगत होते. त्यामुळे प्रवाशांना वेठीस धरून, संपाची भानगड न करता तडजोडीची भूमिका घ्यावी, असे नेहमी एसटीच्या प्रवासावर अवलंबून असलेले प्रवाशी सांगत होते.

 

याबाबत अर्नाळा आगार व्यवस्थापक संदीप बेलदार यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे एसटीच्या विविध संघटनांकडून अचानक दि. ८ जूनच्या मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या संपाचा आपल्या भागात परिणाम नसून, सर्व फेऱ्या सुरळीत सुरू असल्याचे सांगितले. तसेच दुपारनंतरही सेवा सुरळीत असणार असल्याचे सांगितले.

 

पेण आगारातून जादा बसेस

 

उन्हाळ्याची सुट्टी काही दिवसांतच संपत आहे. शाळा सरू होण्यास काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे सुट्टीसाठी गावाकडे आलेले चाकरमानी शहराकडे परतू लागले आहेत. परिणामी एसटी बसेस, रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी होत आहे. दरम्यान, चाकरमान्यांच्या सुविधेसाठी पेण एसटी आगारातून पनवेल, मुंबई, ठाणे, तसेच पुणे आदी ठिकाणी जाण्यासाठी जादा एसटी बसेस सोडण्यात आल्या आहेत.

 

मुंबई, ठाणे, वसई, विरार ते नाशिक व पुढे जाणाऱ्या एसटी बसेस भरून येत असल्याने वडखळ, रामवाडी, पेण आदी ठिकाणांहून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. एसटीला गर्दी असल्याने खासगी बसेस, सुमो, जीप आदी वाहनांचा आधार घेतला जात आहे.

 

खाजगी वाहतूकदारही त्याचा गैरफायदा उचलत अव्वाच्या सव्वा भाडे आकारात आहेत. मात्र प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पेण एसटी आगारातून जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. एसटी बस, रेल्वे, खाजगी वाहनांना गर्दी महामार्गावर पेण ते वडखळ, जीते, अंतोरा फाटा, पेण रेल्वे स्टेशन, उंबर्डे फाटा, वाशीनाका येथे रोजच वाहतूककोंडी होत आहे. परतीच्या प्रवासात बेशिस्त वाहनचालाकांमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. या वाहतूक कोंडीचा प्रवाशांना त्रास होत आहे.