विरोधी पक्षांचा पंतप्रधानपदासाठी उमेदवार

07 Jun 2018 21:33:43

 

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने भाजपविरोधात विरोधी पक्षांची संयुक्त आघाडी उभी करण्याच्या दृष्टीने पुढाकार घेतला आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भरधाव निघालेला भाजपचा विजय रथ अडवण्याची ताकद आपल्यात नाही, याची जाणीव काँग्रेसला झाली आहे. आपण वेगवेगळे लढलो, तर आपला टिकाव लागणार नाही, हे लक्षात आल्यामुळे भाजपला रोखायचे असेल, तर अन्य विरोधी पक्षांना विशेषत: प्रादेशिक पातळीवरील पक्षांना सोबत घेतल्याशिवाय पर्याय नाही, याची काँग्रेसची खात्री पटली आहे.
 

भाजपविरोधात सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा काँग्रेसचा प्रयत्न समजण्यासारखा असला, तरी आपला पंतप्रधानपदाचा संयुक्त उमेदवार कोण राहणार, हे काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी जाहीर केले पाहिजे. जोपर्यंत काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्ष आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करणार नाहीत, तोपर्यंत त्यांच्या एकत्र येण्यावर जनतेचाही विश्वास बसणार नाही. ज्या पंतप्रधान मोदींचा सत्तेवरून पायउतार होण्यासाठी विरोधी पक्ष पाण्यात देव टाकून बसले आहेत, त्यांना मोदींचा पर्याय कोण असेल, हे जाहीर करावे लागणार आहे.

 

काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांत गुडघ्याला पंतप्रधानपदाचे बाशिंग बांधून, बसलेले अनेक नेते आहेत. यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, बसपच्या मायावती, तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे मुलायमसिंह यादव यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. मात्र, यातील कोणा एकाची पंतप्रधानपदासाठीची उमेदवारी काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी जाहीर केली पाहिजे. पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर न करता निवडणूक लढवण्याचा काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांचा प्रयत्न त्यांना अपेक्षित यश देणारा नाही.

 

मात्र, काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्ष पंतप्रधानपदाचा आपला उमेदवार जाहीर करेल, असे वाटत नाही. पहिले म्हणजे त्यांच्याजवळ पंतप्रधानपदासाठी तुल्यबळ असा नेता नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पंतप्रधानपदासाठी कोणत्याही एका नावावर त्यांच्यात मतैक्य होऊ शकणार नाही. अन्य विरोधी पक्षांचे नेते राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून स्वीकारू शकत नाही, त्याचप्रमाणे काँग्रेसही आपल्यापेक्षा दुसऱ्या कोणत्याही छोट्या पक्षाच्या नेत्याला पंतप्रधान म्हणून मान्य करू शकणार नाही. त्यामुळेच एकत्र निवडणूक लढविण्याचा काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांचा प्रयत्न कितपत यशस्वी होईल, हे सांगता येणार नाही.

 

२०१९ ची लोकसभा निवडणूक काँग्रेस संपुआच्या नावावर लढवू शकत नाही, कारण आज संपुआचे नेतृत्व करू शकेल, एवढी ताकद काँग्रेसमध्ये उरली नाही. २००४ आणि २००९ ची लोकसभा निवडणूक काँग्रेसने संपुआच्या नावावर लढवली होती. त्या वेळी सोनिया गांधी देशाच्या पंतप्रधान होऊ शकल्या नसल्या, तरी त्यांनी संपुआचे नेतृत्व यशस्वीपणे आणि प्रभावीपणे केले होते, त्यामुळे अनेक संकटांचा सामना करूनही डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वातील सरकारने दहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला होता. पण, यावेळी तशी स्थिती नाही.

 

सोनिया गांधी यांच्याकडे संपुआचे नेतृत्व असले, तरी त्यांनी जवळपास राजकारणसंन्यास घेत, काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा राहुल गांधी यांच्याकडे सोपविली आहे. काँग्रेसचे नेतृत्व आज राहुल गांधींकडे आले आहे. मात्र, राहुल गांधींच्या नेतृत्वाला खूप मर्यादा आहेत. त्यांच्या नेतृत्वाकडे त्यांच्या पक्षात आणि पक्षाबाहेरही कोणी गंभीरपणे पाहत नाही.

 

राहुल गांधी यांच्यावर आतापर्यंत थेट भ्रष्टाचाराचा असा कोणताही आरोप झाला नाही, ही त्यांची जमेची बाजू म्हणावी लागेल. मात्र, तरीसुद्धा राजकारणातील प्रगल्भ आणि समजूतदार नेतृत्व म्हणून कोणी त्यांच्याकडे पाहात नाही. याला कारण राहुल गांधी कधी काय बोलून स्वत:ला आणि पक्षालाही अडचणीत आणतील, हे सांगता येत नाही! स्वतंत्र भारताच्या इतिहासात सोशल मीडियावर राहुल गांधी यांच्याबद्दल जेवढे विनोद निर्माण झाले, तेवढे आधी दुसऱ्या कोणत्याच नेत्याबद्दल निर्माण करण्यात आले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.

 

राहुल गांधींचा दुसरा महत्त्वाचा मायनस पाँईट म्हणजे ते पूर्णपणे आपल्या सल्लागारांवर अवलंबून असतात. राजकारणातील कोणत्याही नेत्याला सल्लागार असतातच, मात्र प्रत्येक मुद्द्यावर स्वत:ची समज नेत्याला असली पाहिजे, त्याच्या स्वत:च्या मनातील कल्पना स्पष्ट असल्या पाहिजे. म्हणजे मग सल्लागार आपल्याला जो सल्ला देतो, तो योग्य की अयोग्य याचा निर्णय संबंधित नेत्याला करता आला पाहिजे. राहुल गांधी त्यात कमी पडतात. कोणाचाही सल्ला कोणत्या मर्यादेपर्यंत स्वीकारायचा याचे भान राहुल गांधींना असल्याचे जाणवत नाही. त्यामुळे राहुल गांधी स्वत:च्या नाही तर दुसऱ्यांच्या इशाऱ्यावर चालतात, असा समज त्यांच्याबाबत बाहेर नाही, तर त्यांच्या पक्षातील नेत्यांमध्ये निर्माण झाला आहे.

 

राजकारणी माणसाचे चालणेबोलणे तसेच भाषणाची पद्धत सहज आणि नैसर्गिक असली पाहिजे, राहुल गांधींच्या चालण्या-बोलण्यात एक कृत्रिमता जाणवते. त्यांची भाषणे तर पाठ करून आल्यासारखी वाटतात. राजकीय नेत्याबद्दल जनतेच्या मनात विश्वास निर्माण झाला पाहिजे, हा नेता आपले सर्व प्रश्न आणि समस्या चुटकीसरशी सोडवेल, असा विश्वास अद्याप राहुल गांधींबद्दल निर्माण झाला नाही. राहुल गांधींच्या वयोगटातले अनेक नेते आज विविध राजकीय पक्षांत सक्रिय आहेत, समाजवादी पक्षाचे नेतृत्व अखिलेश यादव यांच्याकडे आहे. पण, अनेक बाबतीत अखिलेश यादवही राहुल गांधींपेक्षा उजवे वाटतात. काँग्रेस पक्षातही ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलटसारखे अनेक चांगले नेते आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे राहुल गांधींच्या नेतृत्वाला सर्वमान्यता आणि स्वीकार मिळाला नाही आहे.

 

सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाला जी मान्यता होती आणि आहे ती अद्याप राहुल गांधींच्या नेतृत्वाला मिळाली नाही. विरोधी पक्षांचे नेते अजूनही राहुल गांधी यांना गंभीरपणे घेत नाही. त्यांच्या दृष्टीने राहुल गांधी म्हणजे राजकारणातील ’बच्चा’ आहे! त्यामुळे काँग्रेसचे नेतृत्व राहुल गांधींकडे आले असले, तरी विरोधी पक्षांचे अनेक नेते आजही काही बोलायचे असेल, तर सोनिया गांधी यांनाच दूरध्वनी करतात, कारण राहुल गांधींबद्दल त्यांना विश्वास वाटत नाही. कर्नाटकमध्ये याचा अनुभव आला आहे. तेथील सर्व राजकीय घडामोडीत माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, राहुल गांधी यांच्या नाही, सोनिया गांधी यांच्या संपर्कात होते.

 

त्यामुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांचा पंतप्रधानपदाचा संयुक्त उमेदवार कोण राहणार, हा लाखमोलाचा प्रश्न आहे. २०१९ मध्ये काँग्रेस पक्षाला स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळाले, तर राहुल गांधी पंतप्रधान होतील याबाबत काहीच शंका नाही. मात्र, काँग्रेसला स्वबळावर बहुमत मिळण्याची कोणतीच शक्यता नसल्यामुळे राहुल गांधी पंतप्रधान होण्याचीही सुतराम शक्यता नाही. अशा परिस्थितीत भाजपविरोधात एकत्र निवडणूक लढवण्यास उत्सुक असलेल्या विरोधी पक्षांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण राहील, हा मोठा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर आधी सर्व भाजपविरोधी पक्षांना शोधावे लागेल. एकतर या सर्व पक्षांना पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी यांच्या नावाला पाठिंबा द्यावा लागेल, राहुल गांधींचे नाव मान्य नसेल, तर दुसरे नाव शोधावे लागेल. पंतप्रधानपदाचा उमेदवार शोधण्याची वेळ आल्यावर विरोधी पक्षात मारामाऱ्या सुरू झाल्याशिवाय राहणार नाही! विरोधी पक्षांचा खरा मुकाबला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आहे. त्यांच्या तोडीचा, क्षमतेचा दुसरा कोणताही नेता आज विरोधी पक्षांजवळ नाही. जोपर्यंत विरोधी पक्ष मोदींना समर्थ पर्याय देऊ शकत नाही, तोपर्यंत कितीही पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली, तरी त्याला अर्थ नाही. कारण दोन किंवा दोनपेक्षा जास्त शून्य एकत्र केले, तरी त्याची बेरीज नेहमीच शून्य येत असते!

Powered By Sangraha 9.0