तर रिबेरोत रघुनाथ दिसेल...

    दिनांक  06-Jun-2018   माझ्यासारख्या संघ स्वंयसेवकाच्या मनात हा मुसलमान, तो ख्रिश्चन असा भेदभाव नसतो. कुणी मशिदीत जातो म्हणून, किंवा चर्चमध्ये जातो म्हणून तो माझा शत्रू होत नाही. देवाची उपासना ज्याला जशी भावेल, तशी त्याने करावी, ही मला मिळालेली शिकवण आहे.

ज्यूलिओ रिबेरो, इंग्रजीत सांगायचे तर आय हेट यू!आय हेट यू, कारण तुम्ही ख्रिश्चन आहात म्हणून नाही, तुम्ही चर्चमध्ये जाता म्हणून नाही, तुम्ही भाजपचे टीकाकार आहात म्हणूनही नाही. आय हेट यू, कारण तुम्ही नखशिखांत कम्युनल आहात आणि सेक्युलॅरिझमचा बुरखा पांघरून, तुम्ही त्यात लपून बसला आहात. हा तुमचा बुरखा फाडलाच पाहिजे.

मी संघ स्वंयसेवक आहे. माझी संघाची शिकवण सर्व प्राणिमात्रांत एक चैतन्य पाहण्याची आहे. माझे बालपण गुंदवली नावाच्या एका ख्रिश्चन गावात गेले. बालपणी माझे अनेक ख्रिश्चन मित्र होते. रिबेरो नावाचे माझे शेजारी होते. माझ्या शाखेत माझे ख्रिश्चन मित्र येत. त्यातला एक बालस्वंयसेवक माझा प्रार्थनाप्रमुख होता. तो नमस्ते सदा वत्सलेही प्रार्थना फार उत्तम सांगत असे. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी येशू ख्रिस्ताचे जीवन वाचले. विवेकच्या एका दिवाळी अंकात १९८९ साली मी त्यावर एक प्रदीर्घ लेख लिहिला. संघाच्या एका साप्ताहिकात कदाचित हा पहिलाच आलेला लेख असेल. त्यानंतर मी बायबल वाचले. सर्मन ऑफ द माऊंटवाचले. येशूचे जीवन वाचताना मला कधी तुकाराम महाराजांची, तर कधी गाडगेबाबांची आठवण येत राहिली. माझ्या मनात तुम्हाला खास सांगायचे असे की, माझ्यासारख्या संघ स्वंयसेवकाच्या मनात हा मुसलमान, तो ख्रिश्चन असा भेदभाव नसतो. कुणी मशिदीत जातो म्हणून, किंवा चर्चमध्ये जातो म्हणून तो माझा शत्रू होत नाही. देवाची उपासना ज्याला जशी भावेल, तशी त्याने करावी, ही मला मिळालेली शिकवण आहे. म्हणून तुमच्या ख्रिश्चन असण्याशी मला काहीही घेणेदेणे नाही.

तुम्ही ज्या निर्लज्जपणे आर्चबिशप अॅणनिल काऊटो याच्या पत्रकाचे समर्थन केले आहे आणि त्याचे जे अर्थ काढले आहेत, ते अगदी अफलातून आहेत. एखादा नखशिखांत कम्युनल माणूसच अशा प्रकारचे अर्थ काढू शकतो. मुळात आर्चबिशपला भाजपच्या विरोधात पत्रक काढण्याचे कारण काय? आर्चबिशप कॅथलिक ख्रिश्चन बांधवांना उद्देशून म्हणतात, '२०१९ च्या सार्वत्रिक निवडणुका जवळ आल्या आहेत. दर शुक्रवारी आपण उपवास ठेवला पाहिजे. आपण विक्षुब्ध राजकीय वातावरणाचा अनुभव घेत आहोत. आपल्या राज्यघटनेमध्येे अंतर्भूत असलेल्या लोकशाही तत्त्वांना आणि राष्ट्राच्या सेक्युलर वस्त्राला त्यामुळे धोका निर्माण झालेला आहे. २०१९ साली नवीन सरकारची आपण वाट बघतो आहोत. म्हणून १३ मे २०१८ पासून आपण प्रार्थनांची मोहीम सुरू केली पाहिजे, वगैरे वगैरे.' या बिशप महोदयाने पत्रकात भाजपचे नाव घेतलेले नाही. या राजकीय कौशल्याबद्दल त्यांचे अभिनंदन, परंतु वाचणारे काही मूर्ख नसतात. त्यामुळे हे पत्रक कोणाविरुद्ध काढले आहे, हे लगेचच त्यांना समजते.

आर्चबिशपने राजकारण करावे की करू नये, हे चर्चने ठरवायचे आणि ज्याचा चर्चचा अभ्यास आहे, त्याला हे माहीत आहे, की राजकारण आणि चर्च हातात हात घालून जात असतात. असे राजकीय पत्रक निघाले की, त्यावर टीका होणार हे गृहीत धरले पाहिजे. टीका सहन करण्याची हिंमत दाखविली पाहिजे आणि जर उत्तर देता येत असेल, तर उत्तर दिले पाहिजे. भाजपच्या मंडळींनी आर्चबिशपला धरून ठोकला आहे. सेक्युलर वस्त्राच्या भारतात बिशपला झोडण्याचे धाडस तुम्ही कसे काय करता? सेक्युलर परंपरेत हिंदू साधू-संत तुरुंगात जायला हवेत आणि फादर-बिशप यांच्या पायाशी बसले पाहिजे. हे रिबेरो तुमच्या समोरचा प्रश्न आहे. अमित शाह म्हणाले की, धर्माच्या आधारे मतबँका करण्याचा हा प्रयत्न आहे. त्याला उत्तर देताना रिबेरो तुम्ही म्हणालात, “उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदावर गॉडमॅनला भाजपने नियुक्त केले. मग अल्पसंख्यांक असलेल्या समुदायाला एखाद्या धार्मिक नेत्याला त्याच्या धर्मसमुदयाच्या अस्तित्वरक्षणाविषयी बोलण्यास मज्जाव कसा करता?” रिबेरो सांगायला विसरत नाहीत की, हे अॅ निल काऊटो आपल्या आईच्या गावचे म्हणजे गोव्याचे आहेत.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भगव्या कपड्यात जरूर आहेत, पण ते राज्य, संविधानाप्रमाणे करतात. कुठल्या श्रृती आणि स्मृतींप्रमाणे राज्य करीत नाहीत. तसे करण्याचा त्यांनी प्रयत्न केल्यास, दुसऱ्याच दिवशी त्यांना मुख्यमंत्रिपद सोडावे लागेल. ते बिशप काऊटोप्रमाणे मदर फातिमाचा आश्रय घेताना दिसत नाहीत. योगी आदित्यनाथांची मदर, फातिमा होणार नाही तर ती दुर्गा होईल, सीता होईल, सरस्वती होईल, पण त्यांचे नाव घेऊन, ते कधी राजकारण करीत नाहीत. हा दोघांतील फरक आहे. मग भगव्या वस्त्रातील माणूस अधिक सेक्युलर की पांढऱ्या झग्यातील?

रिबेरो यांनी आपल्या लेखात नरेंद्र मोदी, अटलबिहारींपेक्षा कसे वेगळे आहेत, हे सांगताना म्हटले की, मोदी अल्पसंख्यांकांच्या देशभक्तीवरच शंका उत्पन्न करतात आणि हे आपल्याला कसे पूर्णपणे अमान्य आहे, हे सांगताना रिबेरो लिहितात, 'मोदी सरकार अधिकारावर आल्यापासून मुस्लीम समाजावर आघातामागून आघात होत आहेत आणि साऱ्या समाजाला त्यांनी दहशतीच्या छायेखाली आणलेले आहे. फॅसिस्ट परंपरेप्रमाणे वाट लावण्याचा दिवस लवकरच येईल.' रिबेरोसारखा नखशिखांत कम्युनल माणूसच असल्या प्रकारचे घाणेरडे विधान करू शकतो. ते वाचल्यानंतर तळपायाची आग मस्तकाला जाते आणि आपण हिंदू माणसे बावळटपणामुळे आणि मूर्खपणामुळे कसे कुणालाही आपले हिरो कसे करतो याचे आश्चर्य वाटते. मोदींच्या राज्यात दंगली होत नाहीत. कधी नव्हे तेवढे मुसलमान आता सुरक्षित आहेत. त्यांना रोजगाराच्या संधी मिळत आहेत. मुंबईत धावणाऱ्या उबर आणि ओला टॅक्सी चालविणाऱ्या दहांपैकी चार लोक मुसलमान असतात, हा माझा अनुभव आहे. त्यांच्याशी गप्पा मारताना सरकारच्या कामकाजावर ते फारसे नाराज नाहीत, असुरक्षित तर मुळीच नाहीत, असे कळते. कम्युनल रिबेरो स्वतःची सांप्रदायिकता सर्व मुसलमानांच्या माथी मारायला निघाले आहेत आणि रिबरिओंच्याच भाषेत सांगायचे, तर हे सिन (पाप) आहे. सिन ऑफ फर्स्ट डिग्री.

मधूनच रिबेरो यांना हिंदुराष्ट्राची आठवण झाली आहे. आपले नशीब हे की ज्या बांधवांबरोबर ते राहिले त्यांच्या स्नेहमयी सहवासाची आठवण त्यांना झाली आहे. आपले मित्र, पोलीस खात्यात आपल्याबरोबर काम करणारे सहकारी अशा सगळ्या हिंदूंबद्दल रिबेरो चांगले लिहितात. चारशे वर्षांपूर्वी माझे पूर्वज पोर्तुगीजांकडून बाटवले गेले, हे सांगायला ते विसरत नाहीत. आपण ख्रिश्चन आहोत, याचा त्यांना अभिमान आहे, ही चांगली गोष्ट आहे. आपापल्या धर्माचा, आपआपल्या उपासना पंथाचा प्रत्येकाने अभिमान धरलाच पाहिजे, पंरतु त्यांचा संप्रदायवाद विषारी वाक्यातून बाहेर पडत असतो. ते लिहितात, 'या भूमीवरील बहुसंख्य ख्रिश्चनांप्रमाणे मी देखील देशभक्त नागरिक आहे. मी हिंदुराष्ट्राच्या शासनकर्त्यांकडून माझ्या इच्छेप्रमाणे उपासना करण्याचे स्वातंत्र्य मिळावे, याची मी अपेक्षा करतो.'

सेक्युलॅरिझमचा बुरखा पांघरलेला एखादा भंपकच असले विधान करू शकतो. रिबेरो यांच्या देशभक्तीवर कुणीही प्रश्न उपस्थित केला नाही, तो त्यांनीच उपस्थित केला आहे. भंपक सेक्युलॅरिझम युक्तिवादाचा एक भाग असतो. भारत हे सेक्युलर राज्य आहे. ते राज्यघटनेप्रमाणे आहे. देश राज्यघटनेप्रमाणे चालतो. राज्यघटनेने हे हिंदुराष्ट्र आहे, असे घोषित केलेले नाही. हिंदुराष्ट्राची संकल्पना भारतीय राज्यापेक्षा खूप व्यापक आहे. ती सांस्कृतिक आहे. या सांस्कृतिक हिंदुराष्ट्रात अफगाणिस्तान, तिबेट, ब्रह्मदेश, सिलोन असा सगळा भूप्रदेश येतो. आयपीएस अधिकारी असलेल्या रिबेरोना एवढी प्राथमिक माहिती असणे आवश्यक आहे. जे भारतीय राज्य सेक्युलर आहे, त्याला रिबेरो यांनी हिंदुराष्ट्र करून टाकले, काय म्हणावे या अफलातून बुद्धीला!

भारतातील सगळे ख्रिश्चन चर्चमध्ये जातात, कुणी त्यांना अडवत नाही. 'भारतात गावोगावी चर्चेस् उभी झाली पाहिजेत,’ असा पोपने आदेश दिला आहे. या आदेशाप्रमाणे मुंबईतील वस्त्या-वस्त्यांमध्ये चर्चेस् उभी राहतात. मी राहत असलेल्या मुलुंड कॉलनी भागात गेल्या तीन वर्षांत दोन चर्चेस उभी राहिली. त्यांना कुणी अटकाव केला नाही. आता ख्रिश्चन मंडळी घरोघरी भजनाचे कार्यक्रम करतात. आजूबाजूच्या हिंदूंना त्यात सहभागी करून घेतात, धर्मप्रचार करतात. त्यालाही कुणी अडवत नाही. अडवायचे म्हटले तर अवघड नाही, ठोकून काढायचे म्हटले, तर तेही काही अवघड नाही, परंतु तो हिंदूंचा स्वभाव नाही. देवाची प्रार्थना चालू आहे, त्यात विघ्न आणायचे नाही, ही हिंदूंची मनस्थिती असते. रिबेरो अशा थाटात लिहितात, जणू काही ख्रिश्चनांना चर्चमध्ये जाता येत नाही, प्रार्थना करता येत नाही, येशू ख्रिस्त सत्यासाठी मेला आणि रिबेरोे असत्य डोक्यावर घेऊन फिरत आहेत.

म्हणून म्हणावेसे वाटते की, कोणत्या नरकात हे पाप फेडाल. मोदी सरकारविरुद्ध प्रचार करायचा असेल, तर करा. ते तुमचे राजकीय स्वातंत्र्य आहे, पण त्यासाठी धर्माचा आधार कशासाठी? धर्माचा आधार घेऊन, सेक्युलॅरिझमचे ढोंग कशासाठी? भारत सॅफरॉन पाकिस्तान’ (भगवा) होईल, अशी तुम्ही आरोळी ठोकली आहे. भगव्याची एवढी धास्ती तुमच्या मनात का? भगवा हा त्यागाचा रंग आहे. ज्याने भगवे वस्त्र परिधान केले. तो जीवन्मुक्त होतो. तो सर्व वासनांच्या पलीकडे जातो आणि तो जगन्मित्र होतो. त्यासाठी भारताचा इतिहास वाचावा लागतो. चारशे वर्षांपूर्वी जो इतिहास तुम्ही पुसलात, तो पुन्हा जागरूक करा. आपल्या अंतर्मनात जा आणि आपले चारशे वर्षांपूर्वीचे रूप बघा. कदाचित तुम्हाला रिबेरोत रघुनाथ दिसेल.