
मुंबई : मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेल्या धोकादायक इमारतींमध्ये राहणार्या मानखुर्द येथील बेस्ट कर्मचार्यांच्या पुनर्वसनाबाबत पुन्हा एक नवी गंभीर समस्या पुढे आली आहे. बेस्ट प्रशासन कर्मचार्यांचे पुन्हा धोकादायक इमारतीतच स्थलांतर करीत असल्याने त्यांचा संसार उघडयावर पडण्याची वेळ ओढवली आहे.
पालिकेच्या एम-पूर्व विभागाने बेस्ट कर्मचारी राहत असलेल्या मानखुर्द बेस्ट कर्मचारी वसाहत (पीएमजीपी) इमारत क्रमांक ३४ आणि ३५ धोकादायक जाहीर केली. यामुळे बेस्ट प्रशासनाच्या कर्मचारीय व कल्याण विभागाने येथील रहिवाशांना घरे खाली करण्याची नोटीस पाठवून पर्यायी व्यवस्था म्हणून शिवाजीनगर, चांदिवली-धारावी, सांताक्रुझ व मालवणी येथील बेस्ट कर्मचारी वसाहतीत घरे देण्याची सूचनापत्रे दिली. मात्र, सांताक्रुझ येथील बेस्ट वसाहतीतील इमारती अत्यंत जीर्ण अवस्थेत आहेत. मात्र तरीही, या इमारतीतील खोल्यांमध्ये कर्मचार्यांची पर्यायी व्यवस्था करण्याचा घाट बेस्ट प्रशासनाने घातला आहे. हे सारेच आगीतून फुफाट्यात जाण्यासारखे असल्यामुळे मानखुर्दमध्ये बेस्ट कॉलनीतील कर्मचार्यांची अवस्था ऐन पावसाळ्यात ‘जाये तो जाये कहां’ अशी झाली आहे. याबाबत बोलताना बेस्ट कामगार वसाहत अलॉटीज असोसियनचे सचिव एम. बी. कदम पुढे म्हणले की, बेस्ट महाव्यवस्थापकांना भेटून आम्ही राहत असलेल्या मानखुर्द बेस्ट वसाहतीचा पुनर्विकास करून स्थापन केलेल्या बेस्ट कामगार गृहनिर्माण संस्थेला सदर ठिकाणी घरे द्यावी अशी मागणी आपण केली आहे.