ठाकुर्ली फाटक बंद करण्याचा रेल्वेचा फतवा

05 Jun 2018 16:09:31

डोंबिवली : शहराला पूर्व पश्चिम जोडण्यासाठी नव्याने बांधण्यात आलेल्या ठाकुर्ली उड्डाणपुलाचे काम अर्धवट स्थितीत असताना, रेल्वे प्रशासनाने ठाकुर्ली रेल्वे फाटक बंद करण्याचा फतवा जाहीर केला होता. त्यानुसार सोमवारी सकाळी हे फाटक बंद करण्यात आले, पण अवघ्या काही तासांतच रेल्वे प्रशासनाने हे फाटक उघडून, येथील वाहतूक सुरू करण्यात आली.

पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या रेल्वे उड्डाण पुलाचे काम जवळपास पूर्ण झाले. तरी पूर्वेस मात्र स. वा जोशी शाळेजवळील रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे फाटक आहे. या फाटकातून जाणाऱ्या वाहनांमुळे अनेकदा रेल्वेच्या वाहतुकीला याचा फटका बसतो. ठाकुर्लीकडे उतरणाऱ्या पुलाचे काम बाकी असताना रेल्वेने जाहीर केलेल्या फतव्यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत. सोमवारी सकाळी ११ वाजल्यापासून हे फाटक बंद करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे, तसेच प्रवाशांच्या माहितीसाठी या ठिकाणी फलकही लावण्यात आले आहे, तसेच हे पत्र वाहतूक विभागाकडेही देण्यात आले, पण सोमवारी दुपारी १२ .३० नंतर हे फाटक उघडून, वाहतूक सुरु ठेवण्यात आली, तसेच या ठिकाणी लावण्यात आलेले बंदचे फलकही येथून हटविण्यात आले आहेत, पण दरम्यान उड्डाणपुलाच्या पूर्णत्वाच्या कामाला झालेल्या दिरंगाईबाबत केडीएमसी काय कारवाई करते याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे.

Powered By Sangraha 9.0