आयटीआय विद्यार्थी आता दहावी, बारावीच्या समकक्ष

05 Jun 2018 19:48:35



मुंबई : आयटीआयमध्ये व्यवसाय विषय घेऊन उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी आणि बारावीची समकक्षता मिळणार आहे. विद्यार्थ्यांना ही समकक्षता देण्याबाबत कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे.

जे विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले नाहीत आणि ज्या विद्यार्थ्यांनी आयटीआयमध्ये ज्या अभ्यासक्रमाची अर्हता दहावी अनुत्तीर्ण आहे असे अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करतील अशा विद्यार्थ्यांना राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या दहावीच्या प्रमाणपत्राच्या समकक्षतेकरीता क्रेडिट्स देण्यात येतील. तसेच, आयटीआयमध्ये व्यवसाय अभ्यासक्रमांची शैक्षणिक अर्हता दहावी अनुत्तीर्ण अशी आहे त्याऐवजी ती यापुढे दहावीच्या गुणपत्रिकेतील बदलामुळे कौशल्य विकासास पात्रअसे नमूद करण्यात येईल. याचबरोबर जे विद्यार्थी दहावीत उत्तीर्ण झाल्यानंतर आयटीआयमध्ये ज्या अभ्यासक्रमांची प्रवेश अर्हता इयत्ता दहावी अशी आहे, असा २ वर्षाचा व्यवसाय अभ्यासक्रम आयटीआयमधून उत्तीर्ण करतील त्यांना राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावी प्रमाणपत्राच्या समकक्षतेकरिता क्रेडिट्स देण्यात येतील. दोन भाषा विषय उत्तीर्ण होणे आवश्यक

विद्यार्थ्यांच्या आयटीआय अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेतील विद्यार्थ्यांस प्राप्त गुणांचे रुपांतर त्याने निवडलेल्या क्रेडिट्सप्रमाणे राज्य मंडळाकडे देण्याची जबाबदारी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाची राहील. या विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या दहावी आणि बारावी परीक्षेमध्ये नियमानुसार आवश्यक दोन भाषा विषय उत्तीर्ण होणे तसेच पर्यावरणशास्त्र आणि ग्रेड विषयांमध्ये उत्तीर्ण होणे अनिवार्य राहणार आहे. तसेच ग्रेड विषयांकरिता विद्यार्थ्यांना जवळची शाळा निवडण्याची मुभा राहील.

Powered By Sangraha 9.0