दहशतीची तरुण ठिणगी

    दिनांक  05-Jun-2018   

 

 
 
'दहशतवाद’ म्हणजे केवळ बंदुका, चाकू आणि रक्तपाती हिंसा नव्हे, तर तरुणांची माथी भडकाविणे, त्यांना ‘जिहाद’साठी प्रोत्साहित करणे आणि पडद्याआड त्यांचा प्याद्यांसारखा उपयोग करणे, हेही तितकेच धोकादायक अन् चिंताजनक. ‘इसिस’च्या म्होरक्यांनीही केवळ इराक आणि सीरियात नाही, तर जगभरात अशाच तरुण-तरुणींना ‘टार्गेट’ केले. ‘जिहाद’ची दहशत पसरविण्यासाठी सोशल मीडियाचा पुरेपूर वापर केला आणि तो आजही होतोय. या सायबर प्रणालीला हाताशी धरुन इस्लामिक राज्याच्या स्थापनेसाठी मुस्लीम तरुण-तरुणींनी प्रसंगी आपला जीवही ‘कुरबान’ केला पाहिजे, अशाप्रकारे त्यांचा बुद्धिभेद करण्यात ही मंडळी यशस्वी ठरतात.
 

‘इस्लाम’च्या नावाखाली जगभरात चालणार्‍या या ‘जिहाद’च्या खेळात अनेक तरुण-तरुणी अगदी सहज ओढले जातात. केवळ धार्मिक भावनांचे अवडंबर माजवून अशा तरुणांना अमानवीय कृत्य करण्यास भाग पाडले जाते. पण, त्याचे त्यांना ना भान असते, ना शुद्ध. कारण, त्यांच्या मनात, त्यांच्या मेंदूत केवळ आणि केवळ रुतलेली असतात ती दहशतवादाची मूळं. ती कालपरत्वे इतकी घट्ट होत जातात की, आपण काय करतोय, आपल्या कृतीचा काय परिणाम होईल, याचा साधा विचारही करायला त्यांचे मन धजावत नाही. मानसिक, भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या त्यांच्या जीवनाचा हेतू हा केवळ ‘जिहाद’ भोवती घुटमळत राहतो. एकामागून एक गुन्हे घडत जातात आणि दहशतीच्या अंधारात हळूहळू सगळे काही काळे कुट्ट होऊन जाते. इंग्लंडमध्येही सफा बौलर ही १८ वर्षीय तरुणी अशीच ‘इसिस’च्या षड्यंत्राची बळी पडली. सगळे कळून-सवरुनही तिने ‘जिहाद’ची आडवाट धरली आणि आज इंग्लंडमधील सर्वात कमी वयाची शिक्षा सुनावलेली दहशतवादी म्हणून ती पुन्हा चर्चेत आली.

 

गेल्या वर्षी ब्रिटिश म्युझियमवर दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी सफाला अटक करण्यात आली आणि कालच शिक्षा सुनावण्यात आली. लंडनमध्ये बसलेल्या सफाचा ‘इसिस’च्या नावेद हुसैनशी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून संपर्क आला. दोघांचेही रोजच्या संभाषणातून चांगले सूत जुळले. अवघ्या तीन महिन्यातचं ऑनलाईन ‘निकाह’ची रसम पार पडली अन् सफाने सगळंच ‘कबूल’ केलं. सगळं म्हणजे अगदी सगळं. लग्नानंतर तिला सीरियामध्ये जाऊन प्रत्यक्ष हुसैनला भेटण्याची खूप्र इच्छा होती. पण, तिचा पासपोर्ट वेळीच जप्त करण्यात आला आणि पोलिसांचा संशयही बळावला. पोलिसांनी आपला धाक दाखविल्यानंतर सफाचे दहशतवादी मनसुबे फार काळ लपून राहिले नाहीत. सीरियामधील ‘इसिस’चे अतिरेकी कार्य, दहशतवादी हालचाली याची सर्व हुसैनकडून मिळालेली माहिती तिने पोलिसांना सांगितली. त्यानंतरच ब्रिटिश म्युझियमवरील हल्ल्याच्या कटाचा उलगडा झाला आणि तो कट नीट शिजण्याआधीच त्याची राख झाली.

 

सफा तर हुसैनच्या प्रेमोपोटी ‘जिहाद’च्या पुरती जाळ्यात अडकली होती. पण, तिच्या आई आणि बहिणीलाही ‘इसिस’ने या दुष्टचक्रात ओढून घेतल्याचे पोलिसांच्या चौकशीअंती निष्पन्न झाले. सफावर सीरियामध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याप्रसंगीही ठपका ठेवण्यात आला. यादरम्यान सीरियामध्ये हुसैनचा मृत्यू झाल्याची बातमीही तिला कळली. पण, तरीही सफाचे मनसुबे बदलले नाहीत. पोलिसांच्या ताब्यात असतानाही ती तिच्या आई आणि बहिणीच्या संपर्कात होती. ‘अ‍ॅलिस इन वंडरलँड’मधील शब्द ‘कोडवर्ड’ म्हणून वापरुन त्या तिघींचा संवादही सुरु होता. सफाच्या या साथीदारांनी वेस्टमिनिस्टर भागाची रेकी करुन चाकूंचीही खरेदी केल्याचे न्यायालयाचत निष्पन्न झाले.

 

एकूणच काय, तर ‘जिहाद’च्या नावाखाली तरुणांबरोबरच तरुणीही मोठ्या संख्येने अतिरेक्यांच्या आमिशाला बळी पडल्याचे हे दुर्देवी चित्र. त्यामुळे वयाच्या केवळ अठराव्या वर्षी दहशतवादी कृत्यांमुळे केवळ कुप्रसिद्धीच नाही, तर आपलं अवघं आयुष्य बरबाद करणार्‍या सफासारख्या आज हजारो तरुणी आहेत. तेव्हा, गरज आहे ती तरुण-तरुणींना वेळीच अशा देशविघातक शक्तींपासून परावृत्त करण्याची. त्यांची मानसिकता बदलून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची, अन्यथा पुढची पिढीही अशीच दहशतवाद्याच्या आहारी जाऊन हिंसेचा मार्गच अनुसरेल, हे नक्की.