ये 'व्हायरल' फीवर है..

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jun-2018   
Total Views |

 
 
गेल्या १-२ वर्षात 'व्हायरल' हा शब्द आपल्या रोजच्या बोलण्यात आपल्याही नकळत यायला लागला आहे. आज हा व्हिडियो व्हायरल झाला, काल तो फोटो व्हायरल झाला, तुला माहीतीये का ती किती व्हायरल आहे ते वगैरे वगैरे.. या आधी हा शब्द ऐकला होता, तो म्हणजे केवळ 'फीव्हर' म्हणजेच तापाच्या संदर्भात. मात्र आता व्हायरल होण्याचा ताप कधी आणि कुणाला चढेल हे काही सांगता येत नाही. हे सगळे बोलण्याचे कारण म्हणजे नुकतेच व्हायरल झालेले 'डांसिंग प्राध्यापक'. विदीशा येथील एक प्राध्यापक 'संजीव श्रीवास्तव' यांनी आपल्या भाच्याच्या लग्नात संगीतमध्ये केलेले नृत्य एका रात्रीतून व्हायरल झाले आणि असे कुणी प्राध्यापक आहेत हे आपल्याला कळले.
 
 
 
 
ही आहे या 'इंटरनेट' ची ताकद. खरं तर दोन दिवसांपूर्वी पर्यंत या प्राध्यापकांनाकुणी ओळखतही नव्हतं, मात्र एके दिवशी अचानक फेसबुकवर, ट्विटरवर, व्हॉट्सअॅपवर वेगवेगळ्या कॅप्शन्ससकट, मीम्स सकट या काकांचा व्हिडियो व्हायरल झाला आणि ते प्रसिद्ध झाले. मग त्यांच्या मुलाखती घेण्यात आला, त्यांचे जुने व्हिडियो बाहेर आले, आणि भरपूर काही झालंय. इतकंच काय तर एका मुलीने अगदी त्यांच्या सारखे नृत्य करत आपला व्हिडियो देखील पोस्ट केला आणि तो ही भरपूर व्हायरल झाला. एकूणच एका रात्रीतून काका मात्र सेलिब्रिटी झाले. गोविंदाच्या 'आपके आ जा ने से' या गाण्यावर संजीव यांनी नृत्य केले होते.  ते इतके प्रसिद्ध झाले की गोविंदाला देखील यावर प्रतिक्रिया द्यावीशी वाटली, आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी जाहीर ट्वीटरवर त्यांचे कौतुक केले. 
 
 
 
 
 
 
 
 
काही दिवसांआधी असेच काहीसे झाले होते. इंडियन स्कूल ऑफ कॉमर्सतर्फे ओणम सणानंतर काही प्राध्यापकांनी केलेल्या नृत्याचा व्हिडियो एकाएकी व्हायरल झाला आणि त्यामध्ये नृत्य करणाऱ्या एका प्राध्यापिकेला चक्क सिनेमासाठी मागण्या देखील यायला लागल्या. कोच्ची येथील इंडियन स्कूल ऑफ कॉमर्सतर्फे ओणम सणाच्या निमित्ताने 'फ्लॅशमॉब' आयोजित करण्यात आले होते, त्यामध्ये एक प्राध्यापिका शेरिल जी काडवान या तरुण प्राध्यापिकेने देखील आकर्षक नृत्य सादर केले. प्रसिद्ध मल्याळी गाणे 'झिमकी कमल' या गाण्यावर या प्राध्यापकांनी नृत्य केले. मात्र त्यामध्ये ठळकपणे दिसली ती शेरिल आणि काही तासांमध्ये यूट्यूवर या व्हिडियोला ८० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले. आणि शेरिल अर्ध्यारात्रीतून प्रसिद्ध झाली. तिला सिनेमांसाठी ऑफर्स येवू लागले, तिच्या नावाने फेसबुकवर खाती निघू लागली. आता या व्हिडियोला १ कोटीच्या वर व्ह्यूज आहेत. आणि अजूनही तिला सिनेमासाठी अनेक मागण्या येत आहेत. तसेच दर दुसऱ्या वाहिनीवर तिची मुलाखत घेण्यात आलेली आहे.
 
 
 
असेच झाले प्रिया वेरियरचे. तिने एक डोळा काय मारला संपूर्ण देशच हादरला. एका रात्रीतून प्रिया देखील अशीच तिच्या नकळत व्हायरल झाली. दुसऱ्या दिवशीपासून तिला अनेक वाहिन्यांचे फोन आणि संदेश यायला लागले. पुढील दोन ते तीन दिवस संपूर्ण इंटरनेटवर केवळ प्रियाच प्रिया दिसत होती. अतिशय आकर्षक दिसणाऱ्या चहावाल्याचंही असंच झालं. अशी एक नाही अनेक उदाहरणं आहेत.
 
 
 
 
हे व्हायरल होणं पण घाबरवणारं आहे. विदीशा येथील प्राध्यापक एका खाजगी कार्यक्रमात खाजगी नृत्य करत होते, मात्र ते असं अचानक संपूर्ण जगासमोर आल्याची कल्पना सुरुवातीला त्यांनाही नसणार, असेच 'झिमकी कमल' गाण्यातील शेरिलचे देखील झाले. काहींना ही प्रसिद्धी आवडणारी असते, मात्र काहींसाठी ही खासगीपणावर आलेली गदा असते. त्यामुळे हा व्हायरल फीवर किती फायद्याचा आहे, किती चांगला आहे हे व्यक्ती, व्यक्तीवर अवलंबून असतं. मात्र आपणही जरा सांभाळून. कदाचित उद्या सकाळी फेसबुक उघडल्यावर आपलाच एखादा फोटो किंवा, आपलाच एखादा व्हिडियो तर दिसणार नाही ना याची काळजी घ्या..
 
- निहारिका पोळ 
 
@@AUTHORINFO_V1@@