डांभुर्णी, ता.यावल :
येथील परिसरात शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास वादळासह मध्यमस्वरुपाच्या पावसाचे काही मिनीटे आगमन झाले. नंतर रात्रीही वादळवार्यानेे केळीचे मोठे नुकसान झाले. अद्याप नुकसानीची अंतिम आकडेवारी हाती यायची आहे.
वादळ व पावसामुळे नागरिकांची, विशेषत: महिला वर्गाची चांगलीच धांदल उडाली. लवकरच पावसाळ्याची सुरुवात होणार अशी चाहूल लागली आहे.पावसासह वादळी वार्यामुळे डांभुर्णीसह उंटावद, डोणगाव, किनगाव, चुंचाळे, नायगाव, चिंचोली या भागात केळीच्या बागा घडांसह पडल्याने शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.तरी लवकरात लवकर कृषी विभागाने पंचनामा करावा अशी मागणी शेतकर्यांकडून होत आहे.
विमाधारक शेतकर्यांना उपस्थितीचे आवाहन
तालुका कृषी अधिकारी सी.जे पाडवी यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, उद्या सोमवारी केळी पीक विमा कंपनीचे अधिकारी कृषी कार्यालयात येणार असून पीकविमाधारक शेतकर्यांनी केळी पीक विमा पावतीसह ७/१२ चा खाते उतारा ,आधारकार्ड, बँक पुस्तकाची झेराक्स प्रतीसह उपस्थित रहावे. तसेच चोवीस तासाच्या आत कंपनीकडे १८००२७००७००या क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदविणे आवश्यक आहे. ज्या शेतकर्यांनी विमा काढला नसेल त्यांनीही कृषी खात्यात फार्म भरून नोंद करावी, असा सल्ला पाडवी यांनी दिला आहे.
४ लाख ५४ हजार खोडांंच्या नुकसानीचा अंदाज
किनगावचे मंडळाधिकारी व्ही.इ.पाटील यांना नुकसानीबाबत विचारले असता ते म्हणाले की, अंदाजे १० ते १२गावातील १३०शेतकर्यांचे नुकसान झाले असून १०२.५ हेक्टर जमिनीवरील ४ लाख ५४ हजार खोडांच्या (झाडांचे) नुकसानीचा अंदाज आहे. ही आकडेवारी वाढू शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.