आदर्श राज्य कसे चालवावे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकविले- देवेंद्र फडणवीस

04 Jun 2018 20:31:42
 
 
 
लातूर :  छत्रपती शिवाजी महाराजांनी सुराज्याची निर्मिती करुन उत्तम प्रशासक म्हणून आपणांसाठी आदर्श निर्माण केला आहे. ते खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. त्यांच्या विचारांचा अवलंब करुन आदर्श राज्य कसे चालवावे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकविले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
 
 
अहमदपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळा अनावरण सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे, जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे, खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले, सर्वश्री आमदार विनायकराव पाटील, सुधाकर भालेराव, प्रतापराव पाटील यांची उपस्थित होती.
 
 
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, परकियांच्या आक्रमणातून छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेला मुक्त करण्यासाठी जिजाऊ माँसाहेबांनी महाराजांना घडविले. बारा बलुतेदारीतल्या अठरा पगडजातीतल्या छोट्या-छोट्या लोकांना एकत्रित करुन छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली फौज उभारली. ही फौज उभारण्यासाठी शिवाजी महाराजांकडे संपत्ती नव्हती परंतू त्यांच्या मनामध्ये स्वराज्य स्थापन करणे व अन्यायाविरुद्ध लढावयाचा दृढ विश्वास होता. त्यातूनच महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.
 
 
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करुन सर्वसामान्य रयतेला स्वाभिमानाने जीवन जगण्याचा मार्ग दाखविला व राज्यकारभार करण्याचा आदर्श समोर ठेवला. महाराजांनी विविध किल्ल्यांच्या माध्यमातून स्वराज्याला भक्कम संरक्षण मिळवून दिले. तसेच आमचं पाणी.. आमच जंगल.. आमचं झाड.. ही आमची संपत्ती आहे. त्याशिवाय कोणतेही राज्य संपन्न होऊ शकत नाही. जगाच्या इतिहासामध्ये पर्यावरणाचे सर्वात मोठे काम करणारे पर्यावरणतज्ज्ञ शिवाजी महाराज होते. शिवाजी महाराज हे जलयुक्त शिवाराचे खरे प्रणेते होते. जलसंधारणाच्या माध्यमातून पाण्याचे विकेंद्रीकरण करण्याचे काम महाराजांनी केले असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले. 
 
 
 
Powered By Sangraha 9.0