मनुष्यबळाअभावी विद्यार्थ्यांचे हाल, वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज
जळगाव, २९ जून :
जात पडताळणी कार्यालयात पोलीस व खाजगी सुरक्षा रक्षकाच्या बंदोबस्तात जात पडताळणीचे अर्ज स्विकारले जात असून अर्ज जमा करण्यासाठी मनुष्यबळाअभावी एकट्या व्यक्तीलाच प्रकरणे स्वीकारावी लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक असलेली कागदपत्रे कागदपत्रांची पूर्तता करण्याआधी न तपासता परस्पर त्यांना जात पडताळणी पावती दिली जाते. त्यामुळे जात पडताळणीसाठी येणार्या त्रुटी मनुष्यबळाच्या अभावाने कोणत्याही प्रकारे विद्यार्थ्यांना किंवा पालकांना यासंदर्भात कार्यालयाकडून कोणतीही माहिती फोन किंवा पत्रव्यवहाराद्वारे न करता चौकशीसाठी बाहेरगावाहून येणार्या विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याचे चित्र सद्यस्थितीला आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित रहावे लागणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. यासाठी पूर्वीच जात पडताळणी प्रकरणे सुरूवातीलाच तपासणी करून सर्व कागदपत्रे तपासून जात पडताळणी पावती द्यावी जेणेकरून ठरलेल्या तारखेला विद्यार्थी व पालक आपले प्रमाणपत्र मिळवू शकतील.
अशी लागतात कागदपत्रे
उपजिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांच्या समक्ष विद्यार्थ्यांना दिलेले जातीविषयक प्रमाणपत्र, विज्ञान शाखेचे बोनाफाईड, विद्यार्थ्यांची प्राथमिक व माध्यमिक शाळा सोडल्याच्या दाखल्याची साक्षांकित झेरॉक्स प्रत, जात नोंदीचा पुरावा, अर्जदाराचे वडील अशिक्षित असल्यास त्यांचे जन्म-मृत्यू नोंदणी रजिस्टरमधील उतारा ज्यात स्पष्ट जातीची नोंद असावी. अर्जदाराच्या वडीलांच्या शाळा सोडल्याचा दाखला अथवा मृत्यूचा नोंदी उतारा नसल्यास काका, आत्या, आजोबा, पंजोबा यांचे जन्म दाखले अथवा शाळा सोडल्याचे दाखले, ज्या विद्यार्थ्यांचे किंवा आजोबाचे/वडील यांचे आडनाव भिन्न असल्यास शासकीय राजपत्राची प्रत तसेच मूळ प्रतिज्ञापत्र सादर करावे. कोणतेही जुने महसूल दस्तावेज ज्यामध्ये जातीच्या नोंदी असाव्यात. एस.सी. जातीकरिता १९५० पूर्वीचा पुरावा, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इमाव आणि विशेष मागासवर्गियांकरिता १९६७ पूर्वीचा पुरावा जोडणे आवश्यक आहे. तसेच डिप्लोमा, मेडिकल, इंजिनिअरींग, इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता महाविद्यालयाचे बोनाफाईड तसेच ऑनलाईन प्रवेश अर्ज महत्वाचे आहे. ही कागदपत्रे असल्यास जात पडताळणीची प्रकरणे पूर्ण करण्यात येणार आहेत.
१७०० प्रकरणात त्रुटी
जात पडताळणी कार्यालयात आतापर्यंत जिल्ह्याभरातील ९ हजार प्रकरणे आली आहेत. त्यातील १७०० प्रकरणात त्रुटी आहे. हायकोर्टाच्या निर्णयानुसार जात पडताळणी प्रकरणी विद्यार्थ्यांना सक्तीने केले आहे. तसेच कार्यालयात ६० टक्के मनुष्यबळ असल्याने यावर्षी प्रकरणे निकाली काढण्यास व त्रुटी कळविण्यासाठी सुरूवातीला थोडे अवघड झाले होते. आता सध्या ९ हजार प्रकरणापैकी १७०० प्रकरणात त्रुटी दिसून आल्याची माहिती कार्यालयाच्या अध्यक्षांनी दिली.