दुधावरची साय

30 Jun 2018 16:41:14



 

भारतात व भारताबाहेरही मुलांच्या संदर्भात काम करताना खूप वेगवेगळ्या प्रकारची कुटुंबे पाहायला मिळतात. मोठी एकत्र कुटुंबे, त्रिकोणी-चौकोनी कुटुंबे, एकटे पालक असलेली कुटुंबे आणि अशी अनेक... या सगळ्याच प्रकारांत प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे मुलांना वाढवताना मोठ्यांचे टीमवर्क जितके चांगले असेल तितकी मुले जास्त सक्षम होतात.

 

“मी सगळी काळजी घेते तिच्या संतुलित आहाराची. आजी-आजोबांकडे मात्र तिचे खूप लाड होतात. हवा तो खाऊ, हवं तेव्हा हजर होतो, जेवणाऐवजी चॉकलेट, चिप्स, बिस्किट्स हे तर नेहमीचंच आहे. मी स्वतः रोज ताजा स्वयंपाक करून जाते ऑफिसला. पण, छोटीला जेवण नकोच असतं. जेवणाला पर्याय आहेत, हे तिला माहिती आहे ना? यावर काही बोललं तर उत्तर येतं की, आम्हाला पोरीला रडवायला नाही आवडत किंवा आम्ही कुणाचे लाड करायचे मग? तिच्या रात्रीच्या जेवणाचा ताबा मग मी माझ्याकडे घेतला, तर त्यावेळी ती खूप गोंधळ घालते. हट्ट करते, रडारड करते. घरातलं वातावरण बिघडून जातं. मला खूप कानकोंडं वाटतं अशावेळी...” तीन वर्षांच्या एका गोड मुलीच्या आईने तिची व्यथा माझ्यासमोर मांडली. वेगवेगळ्या कारणांमुळे नोकरी करण्याचा घेतलेला सकारात्मक निर्णय एका बाजूला आणि आपल्या नोकरीमुळे मुलीला आजी-आजोबांजवळ ठेवावे लागते, याबद्दल अपराधी भावना दुसऱ्या बाजूला, अशा कात्रीत ती सापडली होती. या सगळ्याला कुठेतरी कुटुंबातल्या व्यक्तींचा एकमेकांशी 'हरवलेला सुसंवाद' देखील कारणीभूत होता. 'अशा विसंवादी वातावरणात मुलांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागते,' हे मी नमूद केल्यावर या आईला अश्रू अनावर झाले. घरात छान मोकळा संवाद सुरु करण्यासाठी काय करता येईल यावर आम्ही चर्चा केली. सत्र संपल्यावर निघताना ती आवर्जून म्हणाली, “तशी माझी तक्रार नाही हो काही. छोटीचा खूप जीव आहे आजी-आजोबांवर आणि तेही या वयात खूप उत्साहाने आणि मनापासून करतात तिचं सगळं.” तिच्या चेहेऱ्यावरच्या समाधानी हास्यातून तिची नव्याने गवसलेली ऊर्जा स्पष्ट दिसून येत होती.

 

भारतात व भारताबाहेरही मुलांच्या संदर्भात काम करताना खूप वेगवेगळ्या प्रकारची कुटुंबे पाहायला मिळतात. मोठी एकत्र कुटुंबे, त्रिकोणी-चौकोनी कुटुंबे, एकटे पालक असलेली कुटुंबे आणि अशी अनेक... या सगळ्याच प्रकारांत प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे मुलांना वाढवताना मोठ्यांचे टीमवर्क जितके चांगले असेल तितकी मुले जास्त सक्षम होतात. हे टीमवर्क साधण्यासाठी सुसंवाद खूप आवश्यक आहे... परस्परांशी आणि स्वतःशी देखील! वेगवेगळ्या वयाची, ज्ञानाची, अनुभवाची माणसे जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्यात ‘हार्मोनी’ निर्माण करणे हे कौशल्याचे काम आहे. यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे, 'मेरा वचन ही है शासन' असला अतार्किक हेका प्रत्येकानेच सोडायला हवा. 'यु डोन्ट गेट हार्मोनी व्हेन एव्हरीवन सिंग्स द सेम नोट’ हे डग फ्लॉइडचे वाक्य या संदर्भात चपखल बसणारे आहे. अर्थात, प्रभावी टीमवर्कसाठी प्रत्येक टीमप्लेअरच्या वैविध्यपूर्ण कौशल्यांची आणि क्षमतांची छान गुंफण होणे गरजेचे.

 

कुटुंबाच्या माध्यमातून मुलांना समाजाची पहिली ओळख होत असते. कुटुंबातली वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाची, स्वभावाची माणसे समोर असणे, त्यांच्याशी संवाद साधणे यातून मुलांना समाजाचे ज्ञान होत असते. वेगवेगळ्या स्वभावाच्या लोकांशी संवाद कसा साधावा?; एकमेकांच्या मतांचा आदर कसा करावा?; मतभेद कसे हाताळावेत?; समस्या चर्चेने कशा सोडवता येतात? अशा जीवनावश्यक कौशल्यांची उजळणी जर लहानपणापासून मुलांच्या समोर होत राहिली, तर त्यांना त्यांच्या सामाजिक आयुष्यात त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. अर्थात, टीमवर्कमध्ये किंवा सांघिक खेळांमध्ये जसे काही नियम पाळावे लागतात तसे कुटुंबातही संतुलन राहण्यासाठी काही नियम पाळावे लागतात. विशेषतः मुलांचे संगोपन व शिस्त याबाबत सुसूत्रता असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मुलांच्या एखाद्या हट्टाला आई आणि बाबाने विचारपूर्वक ‘नाही’ म्हटलेले असेल, तर आजी-आजोबांनी तोच हट्ट पुरवता कामा नये. असे करून ते तात्पुरते मुलांचे लाडके होतीलही. पण यातून मुलांचे मात्र नुकसान होईल. आजी-आजोबांसाठी नातवंडे हा बऱ्याचदा मोठा आनंदाचा ठेवा असतो. अशावेळी त्यांनी कधीतरी मुलांचे लाड केले तर तो त्यांचा हक्क आहे, हे आई-बाबाने देखील लक्षात घ्यायला हवे. समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कुटुंबात मनमोकळा सुसंवाद असेल तर मुलांचे बाहेरच्या जगात ठेवलेले पाऊल अधिक आत्मविश्वासपूर्ण असेल.

गुंजन कुलकर्णी

(लेखिका नाशिक येथे बाल व

कुटुंब मनोविकासतज्ज्ञ आहेत.)

7775092277

gunjan.mhc@gmail.com

Powered By Sangraha 9.0