रचनात्मक कार्यांमधूनच परिवर्तन शक्य : मुख्यमंत्री फडणवीस

    दिनांक  03-Jun-2018लातूर : सामान्य नागरिकांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवायचे असेल तर त्यासाठी कोणतेही काम हे रचनात्मक पद्धतीने हातात घेणे गरजेचे आहे. कामाची रचना योग्य असेल तरच ते कार्य यशस्वी होते. नागरिकांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडते' असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या पुढाकाराने 'दुष्काळमुक्त' लातूरसाठी राबवण्यात आलेल्या 'इंद्रप्रस्थ जलभूमी अभियाना'च्या कार्यक्रमामध्ये आज ते बोलत होते.

सततच्या पाणी टंचाईच्या परिस्थितीमुळे लातूरला रेल्वेने पाणी आणावे लागले. परंतु 'जलयुक्त शिवार' अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात चांगली कामे झाल्याने लातूर जिल्हा आज 'टँकरमुक्त' झाला आहे. यासाठी पाटील आणि येथील स्थानिक प्रशासनाने अथक परिश्रम केलेले आहेत. हीच परिस्थिती सर्व राज्यात आहे. जलयुक्तच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे राज्यातील एकूण १६ हजार गावे दुष्काळमुक्त झाली आहेत. त्यामुळेच आता ‘जलयुक्त शिवार ते जलयुक्त आवार’ अशी मोहीम आपणा सर्वांनी राबवण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्री यांनी यावेळी म्हटले.

इंद्रप्रस्थ जलभूमी अभियानाच्या माध्यमातून रुफ वॉटर हार्वेस्टींग, बोअरवेल पुनर्भरण, विहीर पुनर्भरण व घर तिथे झाड हा चांगला उपक्रम राबविला जात असून जलयोध्दे भावी पिढीसाठी पाणीदार, हिरवं व पर्यावरणाचा समतोल असलेले लातूर निर्माण करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच इंद्रप्रस्थ जलभूमीचा लातूर पॅटर्न हा संपूर्ण राज्यात राबवणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटले.

 
'दुष्काळी' जिल्हा म्हणून लातूर जिल्ह्याची असलेली ओळख पुसून काढण्यासाठी पालकमंत्री पाटील यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात 'इंद्रप्रस्थ जलभूमी अभियान' हा एक अभिनव प्रकल्प सध्या राबवला जात आहे. या अभियानाच्या मार्फत जिल्ह्यातील भूमिगत पाणी साठा वाढवण्यासाठी घरगुती उपाय योजना राबवणे आणि त्यासाठी म्हणून स्थानिक नागरिकांना प्रशिक्षण देणे, अशी मोहीम हाती घेण्यात आली आहे.