मुख्यमंत्री फडणविसांनी घेतली पंतप्रधानांची भेट

29 Jun 2018 16:31:22



मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. नवी दिल्लीतील पंतप्रधान मोदींच्या या कार्यालयामध्ये ही भेट पार पडली असून राज्यामध्ये सुरु असलेल्या विविध विकास कामांविषयी त्यांनी पंतप्रधानांशी यावेळी चर्चा केली.
माउंट एवरेस्ट सर केलेल्या चंद्रपूरमधील आदिवासी शाळेतील मुलांनी पंतप्रधान मोदी यांची आज भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील यावेळी याठिकाणी उपस्थित होते. मुलांच्या भेटीनंतर फडणवीस यांनी पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यामध्ये विशेष करून केंद्र सरकारच्या 'भारतनेट' या महत्त्वकांक्षी प्रकल्पावर यावेळी त्यांनी चर्चा केली. तसेच राज्यात सुरु असलेले अनेक विकास प्रकल्प आणि त्यांच्या प्रगतीपथाविषयी पंतप्रधानांना माहिती दिली. तसेच पंतप्रधानांनी देखील याविषयी चर्चा करत, मुख्यमंत्र्यांना याविषयी काही महत्त्वाच्या सूचना देखील दिल्या.


 
देशातील सर्व खेडी आणि ग्रामपंचायती या इंटरनेटच्या माध्यमातून जोडल्या जाव्यात, या उद्देशाने  केंद्र सरकारने 'भारत नेट' या महत्त्वकांक्षी प्रकल्पाच्या  सुरुवात केली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील सर्व गावांपर्यंत ऑप्टिकल फायबरचे जाळे निर्माण करण्यात येणार आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारकडून राज्यात 'महानेट' हा प्रकल्प राबवला जात आहे. अनेक ठिकाणी हा प्रकल्प सध्या प्रगतीपथावर असून यामुळे राज्यातील अनेक  ग्रामपंचायती आतापर्यंत इंटरनेटनी जोडल्या गेल्या आहेत.  


Powered By Sangraha 9.0