कॅनडा : शिक्षणाचं नवं दार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jun-2018   
Total Views |
कॅनडाने ‘स्टुडंट डायरेक्ट स्ट्रीम’ नावाचा एक कार्यक्रम सुरू केला आहे, ज्यात भारत, चीन, व्हिएतनाम आणि फिलिपिन्स या चार देशांमधून शिक्षणासाठी कॅनडात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व्हिसाच्या अटी सुलभ केल्या गेल्या आहेत.

 

उच्चशिक्षित भारतीयांना अमेरिका ही स्वर्गभूमी वाटते. शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी भारतातून अमेरिकेत जाणाऱ्यांचे प्रमाण खूप आहे. मात्र, अमेरिकेने परदेशातून येणाऱ्या लोकांवर घातलेल्या बंधनांमुळे आता यापुढे भारतातून अमेरिकेत जायला फारसं कोणी उत्सुक नसेल. मात्र, एक वाट खडतर होत असतानाच दुसरी वाट सोपी होणार आहे, ती म्हणजे कॅनडाला जायची. कॅनडाला शिक्षणासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कॅनडाने आता व्हिसाचे नियम शिथिल केले आहेत. ‘इमिग्रेशन, रेफ्युजीज अॅसण्ड सिटिझनशिप कॅनडा’ (आयआरसीके) या कॅनडाच्या संस्थेने याबाबतचा तपशील प्रसिद्ध केला आहे. व्हिसासाठी अर्ज केल्यानंतर व्हिसा मिळण्याची मुदत ६० दिवसांवरून ४५ दिवसांपर्यंत कमी करण्यात आली आहे. यामुळे कॅनडाला जाण्यासाठी व्हिसा मिळण्याची प्रक्रिया गतिमान होणार आहे. योगायोग म्हणजे नुकतेच इंग्लंडनेही व्हिसाच्या नियमांमध्ये काही बदल केले. परदेशातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या व्हिसाबाबत काही अटी शिथिल केल्या. मात्र, यातून भारतीय विद्यार्थ्यांना वगळण्यात आलं. यामुळे भारतीय विद्यार्थ्यांचा इंग्लंडला जायचाही मार्ग कठीण झाला होता, पण लगेच कॅनडाकडून झालेल्या धोरणबदलामुळे एक आशेचा किरण निर्माण झाला आहे. अर्थात, कॅनडाच्या विद्यापीठात प्रवेश मिळण्यासाठी गुणवत्तेचे निकष मात्र अधिक कडकच आहेत. भाषेबाबतच्या अटी अधिक कडक करण्यात आल्या आहेत. इंग्रजी भाषा पात्रतेच्या ‘आयइएलटी’ या परीक्षेत किमान सहा पॉईंट्स मिळवणे क्रमप्राप्त आहे. आरोग्यतपासणीमध्ये पात्र व्हावं लागतं. ज्या कोर्ससाठी प्रवेश घ्यायचा आहे, त्या कोर्सच्या प्रथम सत्राची पूर्ण फी अगोदर भरावी लागते. तसंच, दहा हजार डॉलर्सचं ‘गॅरंटीड इन्व्हेस्टमेंट सर्टिफिकेट’ (जीआयएस) मिळवावं लागतं. हे पात्रतेचे निकष पूर्ण केल्यानंतरच कॅनडातल्या विद्यापीठात वा महाविद्यालयात प्रवेश मिळू शकतो.

 

कॅनडाने ‘स्टुडंट डायरेक्ट स्ट्रीम’ नावाचा एक कार्यक्रम सुरू केला आहे, ज्यात भारत, चीन, व्हिएतनाम आणि फिलिपिन्स या चार देशांमधून शिक्षणासाठी कॅनडात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व्हिसाच्या अटी सुलभ केल्या गेल्या आहेत. या अगोदर अस्तित्वात असलेल्या ‘स्टुडंट्स पार्टनर प्रोग्रॅम’ नुसार वरील देशांतील विद्यार्थ्यांना कॅनडातल्या ठराविक अशा फक्त ४० महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळत होता. नव्या धोरणानुसार कॅनडातल्या कोणत्याही महाविद्यालयात उत्तर माध्यमिक शिक्षणासाठी परदेशी विद्यार्थ्याला प्रवेश मिळू शकतो. अमेरिका आणि इंग्लंडकडून भारतीय लोकांसाठी व्हिसाचे नियम कडक केले गेल्यामुळे बरेच भारतीय कॅनडाला जाणं पसंत करत आहेत. २०१७ या वर्षात ८३ हजार ४१० विद्यार्थी भारतातून कॅनडाला गेले, जो आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत ५८ टक्क्यांनी जास्त आहे. भारतातून शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांमध्ये कॅनडाला जाणाऱ्यांचे प्रमाण हे २६ टक्के आहे.

 

‘कॅनडियन ब्युरो ऑफ इंटरनॅशनल एज्युकेशन’ या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, २०१७ साली ४ लाख ९५ हजार परदेशी विद्यार्थी शिक्षण घेत होते. ही संख्या २०१६ पेक्षा २० टक्क्यांनी जास्त आहे. यांपैकी सर्वाधिक विद्यार्थी हे चीनमधून (१ लाख,४० हजार), त्याखालोखाल भारतातून (१ लाख, २४ हजार), तर त्याखालोखाल कोरियामधून (२३ हजार,५०) गेलेले आहेत. कॅनडात शिक्षणासाठी जाणारे बहुतांश विद्यार्थी हे अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि हॉस्पिटॅलिटी या कोर्सेससाठी जातात. तिथे कोर्स करता करताच त्यांना इंटर्नशिप करायची संधी मिळते. त्यामधून त्यांचा नोकरीचा मार्ग मोकळा होतो. मग कायमस्वरूपी व्हिसा मिळवणं सोपं होतं. सारं जग भारताकडे आदराने पाहतं ते इथे रुजलेल्या बुद्धिमत्तेमुळे. जागतिकीकरणामुळे भारतीयांना आपली बुद्धिमत्ता आजमावण्याच्या ढीगभर संधी निर्माण झाल्या आहेत. काही संधी जातात तेव्हा दुसऱ्या अनेक संधी निर्माण होत असतात. त्यामुळे परदेशी शिक्षणासाठी इच्छुक असणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना युरोप-अमेरिकेपेक्षा कॅनडा हा जास्त चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे.

@@AUTHORINFO_V1@@