'सरसकट प्लास्टिक बंदी कायम' : रामदास कदम

28 Jun 2018 12:06:46

प्लास्टिक बंदीमधून कोणत्याही वस्तू वगळण्यात आलेल्या नाहीत

 पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची माहिती




मुंबई : राज्य सरकारने लागू केलेल्या प्लास्टिक बंदीमधून कसल्याही वस्तू वगळण्यात आलेल्या नसून सोशल मिडिया तसेच माध्यमांमधून चुकीची माहिती पसरवली जात असल्याची अशी माहिती राज्यमंत्री रामदास कदम यांनी आज दिली आहे. कदम यांनी ट्विटरच्या माध्यमातून याविषयी माहिती दिली आहे. तसेच माध्यमांनी सरकारच्या अधिकृत घोषणेची वाट पहावी, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

राज्य शासनाचे काल झालेल्या एका आढावा बैठकीमध्ये प्लास्टिक बंदीमधून काही वस्तू वगळण्यात आल्याच्या निर्णय घेण्यात आला असल्याचे वृत्त कालपासून सोशल मिडीयावरती पसरत आहे. काही माध्यमांनी देखील वृत्त उचलून धरत याविषयी बातम्या प्रसिद्ध केल्या. यावर कदम यांनी आज ट्वीट करून खुलासा केला. आपल्या ट्वीटमध्ये कदम यांनी म्हटले आहे कि.'आमच्या काल झालेल्या आढावा बैठकीत सिंगल युज डिस्पोजल प्लास्टिकबंदीमधून काही वस्तू वगळल्याबाबत चूकीच्या बातम्या मीडियाकडून प्रसिद्ध केल्या जात आहेत. याबाद्दल छायाचित्रांद्वारे माहिती देऊन गैरसमज निर्माण केले जात असून यामधून कसल्याही वस्तू वगळण्यात आलेल्या नाहीत, असे कदम यांनी म्हटले आहे.




तसेच शासकीय यंत्रणा मजबूत करण्यासाठी आम्ही प्लास्टिकबंदीचे स्वरूप वाढवून कुठल्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे आणि कुठल्या वस्तूंवर नाही हे स्पष्ट केले आहे. ज्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली नव्हती, त्या वस्तूंचा पुनर्वापर करणे बंधनकारक केले आहे. याबद्दलची माहिती पुस्तिका लवकरच सरकारकडून प्रकाशित करण्यात येणार असून सर्वांनी थोडी प्रतीक्षा करावी, असे आवाहन देखील त्यांनी आपल्या ट्वीटमधून केले आहे.


Powered By Sangraha 9.0