वापरा आणि फेका : एक कचकड्याची संस्कृती

    दिनांक  27-Jun-2018   

 
 
 
समाजमनाला उत्तेजनाची चटक लागली आहे. रोज काहीतरी सेन्सेशनल हवे असते. आम्ही त्याचे अॅडिक्ट झालो आहोत. अगदी योजनाबद्ध पद्धतीने तशी मानसिकता घडविण्यात आली आहे. भावनाशील समाजमन ही चांगलीच बाब आहे, मात्र त्या ज्वालाग्राही नकोत आणि आंधळ्याही नकोत. व्यवस्था असते, ती समाजमनाच्या भावना डोळस राहू नयेत याची काळजी घेते. त्यातला विवेक संपविते आणि त्यासाठी भावना गरजांशी जोडते. इथवरही ठीक असू शकते, मात्र व्यवस्थेला हव्या त्या गरजा निर्माण केल्या जातात. तसे करताना सामूहिक विवेक संपेल याची काळजी घेतली जाते. आपल्याला ज्ञात असलेल्या व्यवस्था शासन, सरकार आणि प्रशासन याच असतात. देवांच्या मूर्ती आणि प्रत्यक्ष देव यात जो काय फरक असतो तोच नेमका व्यवस्था आणि आपण देश, समाज, कुटुंब संचालनासाठी निर्माण केलेल्या ज्या काय व्यवस्था आहेत त्यात फरक असतो. ही व्यवस्था स्वार्थी असते आणि म्हणूनच घातकही असते. ती व्यापकही असते. नेमके व्यवस्था म्हणजे कोण हे ओळखता येत नाही. आपल्याही नकळत आपण या व्यवस्थेचा केवळ भागच बनत नसतो तर तिचे संचालकही असतो. ही व्यवस्था वैश्विक आहे अन्‌ अप्रकट असे अस्तित्व तिला आहे. ती बदलण्याची भाषा जगात केली जाते. त्यावरून सत्ता मिळविली जाते, हिसकावली जाते. मात्र, ती बदलता येत नाही. बदलण्याची भाषा एकतर लपोड असते, लबाड असते किंवा ती तळमळीची, प्रामाणिक असली तर तशी गर्जना करणार्‍याला व्यवस्थेच्या ताकदीचा आवाकाच कळलेला नसतो. व्यवस्थेविषयीच्या कमालीच्या अज्ञानातून तिला आव्हान देणार्‍या गर्जना केल्या जातात. त्या अत्यंत प्रामाणिक आणि म्हणूनच तळमळीच्या वाटतात. प्रामाणिकपणाही ज्ञानी, विवेकी आणि त्या अर्थाने तो डोळसही असायला हवा. ज्ञान नसलेला प्रत्येक माणूस हा अंधच समजला पाहिजे. असे आंधळेच बहुसंख्य असल्याने अशी गर्जना करणार्‍याला लोक नेतृत्व देतात, आपल्या आयुष्याचे सुकाणू त्याच्या हातात देतात. व्यवस्था परिवर्तनाच्या क्रांतीची भाषा करणार्‍यांना सत्तेत आल्यावर लक्षात येते की, आपणही या व्यवस्थेचाच एक भाग आहोत आणि
 
 
ते वर्तुळ आपण मोडूच शकत नाही...
ही आतली स्पंदने आहेत. ही उलाघाल कधीकधी मनाच्या पृष्ठभागावर येते. आता ती प्लॅस्टिकबंदी आणि त्यानिमित्ताने ‘जनतेची’ स्पंदने यामुळे वर आली. प्रकट झाली. त्यावर बर्‍याच चर्चा आता झडायला सुरुवात झालेली आहे. पूर्णपणे प्लॅस्टिकबंदी होऊच शकत नाही, यावर लोक ठाम आहेत. वापरा आणि फेका, असे जे काय प्लॅस्टिक आपण वापरतो ते बंद केल्याचे समाधानच काय ते मिळू शकते, ही बंदीही मोडण्यासाठी आणि मोडकळीस येण्यासाठीच घालण्यात आली आहे. ती शाश्वत नाही, अशी ठाम धारणा आहे. ती फार चुकीची आहे, असेही नाही. संवेदनशीलतेने विचार करू शकणार्‍यांना ही बंदी असावी, असे वाटते. त्यासाठी आपण काय करू शकतो, याचाही विचार त्यातले दहा टक्के लोक करतात. बाकींना चुकीचे जे काय घडत असते त्यात आपली काही जबाबदारी आहे, असे कधीच वाटत नाही. चूक दुसरेच करत असतात आणि ती दूर करण्याची जबाबदारीही त्यांची किंवा सरकारचीच असते, अशीच एकुणात मानसिकता असते. ते तसे करतानाही आमची मात्र गैरसोय होऊ नये, याचीही काळजी आम्ही नियुक्त केलेल्या व्यवस्थेने वेळी नियम मोडून किंवा सौम्य करून घेतली पाहिजे, असाही आग्रह असतोच.
 
 
 
लोकशाहीत आपण निर्माण आणि नियुक्त केलेल्या व्यवस्था भ्रष्ट आहेत, कुचकामाच्या आहेत, हादेखील जनतेच्या केवळ विश्वासाचा नव्हे तर श्रद्धेचा विषय असतो. त्यामुळे आता घालण्यात आलेली प्लॅस्टिकबंदी हे कुणाचे तरी नाक दाबून तोंड उघडण्यासाठी आहे. प्लॅस्टिक हा ज्यांच्या धंद्याचा, कमाईचा विषय आहे, अशांची आर्थिक गणिते पुन्हा एकदा नव्याने मांडण्यासाठी ते तोंड उघडतील आणि मग प्लॅस्टिकबंदी उठेल असे नाही मात्र, तिच्या अंमलबजावणीकडे कानाडोळा केला जाईल, अशी स्पष्ट धारणा सामान्यांची आहे. अर्थात आजवरच्या अनुभवातूनच ती आलेली आहे. ही बंदी उपकारक आहे, हे कळते; पण तरीही ते स्वीकारता येत नाही, अशी एकुणात अवस्था आहे. आता हा निर्णय घेण्यात आला आहे आणि आपणच तो तडीस नेऊ शकतो. त्याची पूर्ण अंमलबजावणी केली जाऊ शकते आणि ते तसे करणे हे पूर्णपणे आपल्या हातात आहे, हे मात्र कुणालाच वाटत नाही. कारण पुन्हा तेच की अतिरेकी प्लॅस्टिक वापराची जी काय चूक करण्यात आली ती आपण केलेली नाही. ती व्यवस्थाही सरकार नामक व्यवस्थेनेच आणली होती. ती त्यांची चूक आहे, अशीच धारणा आहे. प्लॅस्टिक वापरले आपणच, हे आपण सपशेल विसरून गेलेलो होतो. सर्वसत्ताधीश, सर्वव्यापी अशी व्यवस्था दुसरीच आहे, याचेही ज्ञान नसते. त्यामुळे आता प्लॅस्टिक बंदीने आमची काय गैरसोय होते आहे, यावरही चर्चा रंगल्या आहेत. त्यातून हा आशावाद आहे की ही बंदी काही फार काळ टिकणार नाही. त्यातून मग प्लॅस्टिकबंदीने कसा अनेकांचा रोजगार हिसकावून घेतला आहे, रोजीरोटी ओरबाडण्यात आली आहे, असा नवाच कनवाळा दाटून यायला सुरुवात झालेली आहे. प्लॅस्टिक साधारण साठच्या दशकात वापरायला सुरुवात झाली.
 
 
अमेरिकेत जहाजावरील दोरखंड प्लॅस्टिकचे पहिल्यांदा तयार करण्यात आले, तो काळ 1959 च्या दरम्यानचा आणि मग बघता बघता प्लॅस्टिकने अनेक रूपे धारण केलीत. हलके, मजबूत, टिकावू आणि स्वस्त म्हणून बघता बघता त्याने भूमंडळ व्यापले आणि तरीही ते दशांगुळे उरलेच. प्लॅस्टिकच्या अवताराच्या आधीही हे जग होतेच आणि सगळे व्यवहार होतच होते आणि म्हणूनच प्लॅस्टिकच्या अवतार समाप्तीनंतरही जग आहे तसेच राहणार आहे, याचे जाणते भान असायला खूप ज्ञान असण्याची तशी काही गरज नाही. मात्र बाजारीकरणाच्या व्यवस्थेने आम्हाला शरणागत बनविले आहे. जागतिकीकरण, उदारीकरणाने शरणागतांना गुलाम केले. त्यांना सवयी लावल्या. कमीतकमी श्रमात कसे जगायचे, याची चटक लावली. तुम्ही केवळ पैसा कमवा, जगण्याच्या सोयींची पूर्तता आम्ही करतो, हे बाजाराने सांगितले. ते खूप खोलवर रुजविले. माणसे मग सारेच कसे पैशांतच मोजायला लागले. पैशाच्या बदल्यात सारेच मिळत असते, आपण केवळ पैसाच कमाविला पाहिजे, हे दृढ झाले. त्या पदार्थांसाठी किंवा गरजांसाठी द्यावा लागणारा पैसा आणि त्या गरजा स्वत:च भागविण्यासाठी द्याव्या लागणार्‍या वेळात आपण कमावू शकतो तो पैसा यातला फरक म्हणजे आपला फायदा आहे, असे गणित मांडले जाऊ लागले. नाहीतर आधीही आपण भाजी, तयार पदार्थ, विविध द्रव आणतच होतो. त्यासाठी विविध वस्तूंचा वापर करतच होतो. त्याहीपेक्षा त्यातील बर्‍याच चिजा आपण घरीच तयार करत होतो.
 
 
पिशवीत डबा टाकून त्यात दळण आणतच होतो. आता इतके श्रम तुम्ही कशाला करता, असे बाजाराने कधीतरी विचारले आणि तयार कणीकच विकायला आली. क्रय आणि विक्रय बाजाराला सोपा जावा यासाठी मग स्वस्त, टिकावू असे माध्यम बाजाराने स्वीकारले आणि आपल्या माथी मारले. आम्ही परावलंबी झालो. ते तसे करण्यात आले. तुम्ही सांभाळून ठेवणे आणि साठा करण्यापेक्षा वापरा, फेका आणि मोकळे व्हा, हा मंत्र बाजाराने दिला. आमचे एकच काम, पैसा कमवायचा, गरजा भागविणार्‍या सार्‍याच सोयी बाजार देत असतो. आता कुठलेही मोठे काय असेल ते इव्हेंट झाले आहे आणि ते कौटुंबिक असले तरीही ते बाजार व्यवस्था साजरे करून देत असते. तुमची काहीच जबाबदारी नाही, कर्तव्यही नाही... फक्त तुमच्याकडे पैसा असायला हवा, ही मानसिकता बाजाराने विकसित केली. तुम्हाला प्रश्नच पडू नये, पडले तर ते विचारण्याची तुमची प्राज्ञा असू नये, हे बाजाराने घडवून आणले. तरीही आपल्याला वाटते की आम्हाला तर प्रश्न पडतात आणि आम्ही त्याची उत्तरेही शोधून काढत असतो... तर तीही फसगतच आहे. तुम्हाला जे प्रश्न पडतात, असा तुम्हाला भास होतो ते बाजाराने तुमच्या मेंदूत घुसविले असतात आणि त्याची रेडिमेड उत्तरेही बाजाराला हवी तीच असतात. ‘प्लॅस्टिक बंद झालेच तर बाजारातून मटन कसे आणायचे?’ हा सवाल बाजार व्यवस्थेने निर्माण केला आहे आणि त्याचे उत्तर म्हणजे बंडखोरी करायची, हेदेखील बाजारच येत्या काळात देणार आहे. वापरा आणि फेका या तंत्राचा वापर आता माणूस माणसावरच करू लागला आहे. माणसं वापरली जातात आणि नको असली की फेकली जातात. नको असलेले चॅनल जितक्या सहज रिमोटने बदलतो ना आपण, तसे आता माणसं नको असलेली माणसं बदलायला लागली आहेत. माणसंच आता प्लॅस्टिकची झाली आहेत, म्हणून ही बंदी आपल्याला अडचण वाटू लागली आहे.