जनकल्याण समिती : वंचितांचे आम्ही सोबती

    दिनांक  26-Jun-2018
 

 
जनकल्याण समिती कल्याण

 

 
आजमितीला शेकडो सेवाकार्ये सुरू आहेत, तर आणखी शेकडो सेवाकार्यांची गरज आहे,” हे ब्रीदवाक्य समोर ठेवत समाजाच्या मदतीसाठी कर्तव्य म्हणून पुढे असे आवाहन करणारी जनकल्याण समिती वंचित घटकांचे खर्‍या अर्थाने सोबती ठरली आहे.


१९७२ च्या दुष्काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने ‘दुष्काळ विमोचन समिती’ या नावाने प्रथम जनकल्याण व मदतीचे काम करण्यात आले. त्यानंतर ‘जनकल्याण समिती’च्या कामाची सुरुवात झाली. आदिवासींच्या जीवनात आरोग्य ग्राम, आरोग्य रक्षक प्रकल्पविकलांग कल्याण-बहुविकलांग मुलांसाठी लातूर शहरात विशेष शाळा, पढो परदेश योजना, जनकल्याण समाजोन्नती अन्याय, भ्रष्टाचार निवारण समिती, कल्याण येथे कार्यरत ‘जनकल्याण समिती’च्या सहकार्यातून जलयुक्त शिवाराची कामे, महाराष्ट्रात पूर्वोत्तर राज्यातील मुलींचे असे १४ ठिकाणी शैक्षणिक प्रकल्प असे उपक्रम राबविण्यात येतात. या संस्थेचे कल्याण तालुक्यातील कामही उल्लेखनीय आहे.संघाच्या ‘जनकल्याण समिती’मार्फत महाराष्ट्रात १२३० सेवाकार्ये चालविली जातात. शहरी भागात संस्कार केंद्रे, वसतिगृहे, रुग्णालये, रक्तपेढ्या, रक्तगटसूची, रुग्णसेवा, रुग्णोपयोगी साहित्य केंद्र, बहुविकलांग पुनर्वसन व विकसन केंद्र, किशोरवयीन मुलींचे सक्षमीकरण, वाचनालये अशी अनेकविध सेवाकार्य जनकल्याण समितीतर्फे सुरू आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रचनेप्रमाणे कल्याण तालुक्यात कल्याण पूर्व, शहापूर, टिटवाळा, आणगाव, अंजूर या ठिकाणी काम सुरू आहे. पाच तालुके व दोन शहरे आहेत. ही संस्था या भागात शिक्षण, आरोग्य व पूरक पोषक आहार या तीन महत्त्वाच्या गोष्टींवर काम करत आहे.

 
 

’विज्ञान प्रयोगशाळा’ हा ’जनकल्याण समिती’चा एक लक्षणीय उपक्रम. वनवासी आणि ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये आजही प्रयोगशाळेची सुविधा उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी, विज्ञानातील प्रयोग त्यांनाही करता यावेत आणि शाळांना, विज्ञान शिक्षकांना अध्यापनात मदत व्हावी, या हेतूने फिरती विज्ञान प्रयोगशाळा हा उपक्रम सुरू आहे. इयता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना विज्ञानाची प्रात्यक्षिके करून दाखविणे व करून घेणे यंदाचे वर्ष या प्रयोगशाळेचे २७ वे वर्ष आहे. सुरुवातीला कल्याण जिल्हा हा एकत्रित असताना सुमारे ४५ शाळा यात सहभागी होत्या. अंबरनाथमणध्ये गेल्या २ वर्षांपासून ही प्रयोगशाळा सुरू आहे. तर शहापूरच्या १८ शाळांमध्ये या प्रयोगशाळा सुरू आहेत. या शिबिराअंतर्गत एक शिक्षक एका गावामध्ये जातो व विज्ञानाचे प्रयोग करून दाखवतो. याशिवाय या प्रयोगशाळेत इतरही प्रोग्राम होतात. यात गुरुपोर्णिमा, रक्षाबंधन, देशभक्तीपर गीत कार्यक्रम, विज्ञान दिन साजरा केला जातो. याच उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विविध शिबिरेही आयोजित केली जातात.

 
 

या शिबिरात येणार्‍या विद्यार्थ्यांची निवड केली जाते. हे विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास शिबिरात सहभागी होतात. या शिबिरात शिकून काही विद्यार्थी पीएचडी करून उच्च पदावर काम करीत असल्याचा सार्थ अभिमान या संस्थेच्या पदाधिकार्‍यांना आहे. श्रीरंग पिंपळीकर यांनी या प्रयोगशाळा सुरू केल्या. ते पूर्ण वेळ प्रचारक होते, तसेच सध्या ते जनकल्याण समितीचे प्रांत निमंत्रक म्हणून काम पाहात आहेत. या प्रयोगशाळेची दखल महाराष्ट्र शासनानेही घेतली असल्याने येथील एका महाविद्यालयात विज्ञान विभाग सुरू करण्यात आला आहे.

 
 

‘ग्राम आरोग्य रक्षक’ हा प्रकल्पही कल्याणकारी असा. शहापूर तालुक्यातील ४० आदिवासी वाड्यांवर हा प्रकल्प राबविण्यात येतो. या अंतर्गत या भागातील ग्रामस्थांना मोफत प्राथमिक उपचार देण्याचे काम केले जाते. यासाठी चौथी पास आरोग्यसेवक नेमण्यात येतो व या भागातील रुग्णांना आयुर्वेदिक औषध देण्याचा उपक्रम केला जातो. येथील चिंध्याची वाडी येथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक चंदुलाल सावंत या प्रकल्पाचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. शासकीय आदेशाप्रमाणे पालघर, वाडा या भागात कुपोषित बालकांचे संगोपन करण्याकरिता दोन पाडेही दत्तक घेण्यात आले आहेत. रोडवहार आणि मोधळवाडी असे या पाड्यांचे नाव आहे. नऊ वर्षांपूर्वी हे काम सुरू झाले. विठ्ठल भरताड व त्यांच्या पत्नी रोडवहार या परिसरातील जबाबदारी सांभाळतात. तर अशोक भला हे मुधोळवाडी येथील जबाबदारी सांभाळतात. ० ते ६ वयोगटातील बालके व गरोदर मातांना या माध्यमातून सकस आहार दिला जातो. या कामात डॉ. आश्लेषा गोखले यांची गेली दोन वर्षे या उपक्रमाला मोलाची साथ लाभली आहे. मुधोळवाडी येथे जाण्यासाठी दळणवळणाचा अभाव असताना या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबीरही भरविण्यात आले आहे. या ठिकाणी अनेक शिक्षित तरुण आहेत, पण नोकरीची संधी उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांच्या दैनंदिन व्यवहारात बेकारीचा फटका त्यांना बसत आहे. अशा तरुणांसाठी येत्या काळात नोकरीची साधने उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचेही येथील पदाधिकार्‍यांनी सांगितले.

 
 

डोंबिवलीमधील शैक्षणिक कार्य

१९८८ सालापासून डोंबिवली येथे शिकवणीवर्ग सुरू करण्यात आला. सदाशिव नरहर साठे यांनी हा उपक्रम सुरू केला. टिळकनगर शाळेत आणि ग्रामीण भागात हा उपक्रम हाती घेण्यात आला. इयता पाचवी वी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम सुरू केला. १९९१ साली आशाताई टकले या शिक्षिकेने जबाबदारी घेतली व मुलींना प्रवेश दिला. १९९२ साली या उपक्रमात कार्यकर्त्यांची संख्या वाढलीच, त्याप्रमाणे एक एक इयत्ताही वाढविण्यात आली. गेल्या कित्येक वर्षांत अनेक विद्यार्थी या उपक्रमाशी जोडले पुढे जाऊन इंजिनिअर, वकील तसेच डॉक्टर झाले,पण आजही त्यांची या संस्थेशी नाळ तशीच जोडलेली आहे. या शिकवणीवर्गात शिकवणारे विद्यार्थी कोणत्याही प्रकारचे मानधन घेत नाहीत. उलट स्वखर्चातून गरजू विद्यार्थ्यांना मदत करतात. तसेच खर्चाची व शिक्षणाची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी, यासाठी या शिक्षण उपक्रमातून विद्यार्थ्यांना कालनिर्णय विकून त्यातून स्वतःची फी भरण्याचा उपक्रम करण्यात आला होता. या शिकवणीवर्गातील विद्यार्थी दरवर्षी रक्षाबंधनाला रुग्णालयातील रुग्णांबरोबर एक अनोखे रक्षाबंधनही साजरे करतात. गेल्या २ वर्षांपासून कनिष्ठ महाविद्यालयाचे ११ वी व १२ वी चे वाणिज्य शाखेचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. या शिकवणीवर्गाचा कार्यभार वासुदेव जांभळे हे पाहतात. याचबरोबर डॉ. हेडगेवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजनही केले जाते.

 
 

’जनकल्याण समिती’चा ’गोळवलकर गुरुजी पुरस्कार’ समारंभ रविवारी डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात गेल्यावर्षी आयोजित करण्यात आला होता. धर्म-संस्कृती या गटातील हा पुरस्कार हभप चैतन्य महाराज देगलूरकर यांना तर संशोधन क्षेत्रातील पुरस्कार बंगळुरूच्या स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्थानचे संस्थापक कुलगुरू डॉ. एच. आर. नागेंद्र यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते डॉ. अनिल काकोडकर आणि प्रमुख वक्ते होते, संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेयजी होसबाळे. अतिशय नियोजनबद्ध, देखणा आणि दिमाखदार असा हा सोहळा झाला. पुरस्कारांचं यंदा बाविसावं वर्ष होतं. मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि एक लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. जनसेवा हीच इश्‍वरसेवा माननार्‍या जनकल्याण समितीच्या कार्याचे महत्त्व शब्दातीत आहे.

रोशनी खोत