केरळ : चर्चमध्ये लैंगिक अत्याचार, पाच पाद्री निलंबित

26 Jun 2018 20:08:20





तिरुवनंतपुरम : ईशान्य भारत, गोवा, तसेच दक्षिण भारतातील चर्च गेल्या काही दिवसांपासून चर्चचे प्रमुख अधिकारी व धर्मगुरूंनी घेतलेल्या कट्टर भूमिका, हिंदुविरोधी वक्तव्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधातील वक्तव्ये, विदेशातून संशयास्पद आर्थिक व्यवहार यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. अशातच आता चर्चमध्ये लैंगिक अत्याचार होत असल्याच्या धक्कादायक बाबीही उघडकीस येऊ लागल्या आहेत. असेच एक प्रकरण केरळमध्ये उघडकीस आले असून राज्यातील कोट्टायम येथे चर्चमध्ये एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली चर्चने तब्बल पाच पाद्रींना निलंबित केले आहे. केरळ राज्यासह संपूर्ण देशभरात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

 
 

मलंकरा ऑर्थोडॉक्स सीरियन चर्च असे या चर्चचे नाव आहे. येशू ख्रिस्तासमोर पापक्षालनासाठी आलेल्या महिलेवर या चर्चमधील पाच पाद्रींनी लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप खुद्द त्या महिलेनेच केला आहे. तिने केलेल्या आरोपानुसार ती महिला चर्चमध्ये पापक्षालनासाठी आली असता, तिने येशुसमोर दिलेल्या कबुलीचा या पाद्रींनी गैरफायदा घेत तिला ‘ब्लॅकमेलिंग’ केले व त्यानंतर तिला धमकावत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या चर्चच्या संबंधित निरानाम प्रांताच्या अध्यक्षांकडे दि. ७ मे, २०१८ रोजीच या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, चर्चने या आरोपींवर कारवाई करण्यात चालढकल केल्याचा आरोप या महिलेच्या पतीने केला आहे. तसेच, या पाच पाद्रींविरोधात आपल्याकडे सबळ पुरावे असल्याचा दावा या महिलेने केला आहे. याप्रकरणी चर्चकडून अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली असून या चौकशीचा अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येईल, असे या चर्चचे जनसंपर्क अधिकारी पी. सी. इलियास यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच, सोशल मीडियातून आणखीही अनेक गोष्टी व्हायरल होत असून त्यातही काही तक्रारीही असल्याचीही धक्कादायक बाब इलियास यांनी यावेळी उघड केली. संबंधित पाद्र्यांपैकी तीन पाद्री निरानाम धर्म प्रांताचे असून एक पाद्री दिल्लीतील तसेच, पाचवा पाद्री थुमपामोन धर्म प्रांताचा असल्याची माहिती पिडीत महिलेने दिली आहे.

Powered By Sangraha 9.0